Video : नाशिक | राहुल आंबेकर : संगीतातून ‘रॉकिंग’ करियर

( कला आणि संस्कृती )

0

मी पिंपळगाव बसवंतचा. घरी संगीताची पार्श्वभूमी नाही. सहा वर्षांचा असताना वडिलांनी पहिल्यांदा की-र्बोड भेट दिला. टीव्हीवरील गाणे ऐकून, पाहून मी हे वाद्य शिकलो. तिथून संगीत प्रवासाला प्रारंभ झाला. पुढे शालेय जीवनात ढवळे सरांनी माझ्यातील सांगीतीक गुण हेरला आणि संंगीत कला अधिकच फुलवत प्रोत्साहन दिले. मात्र तरीही औपचारिक म्हणावे असे माझे कुणीही गुरू आजही नाहीत. शिक्षणासोबत चोरी-छुपे नवीन प्रयोग करत संगीत शिकणे मी सुरूच ठेवले. संगीताची हीच पॅशन मला नाशिकचा पहिला बॅण्ड करण्यापर्यंत घेऊन गेली.

महाविद्यालयीन जीवनात आर्ट सर्कलमध्ये संगीत क्षेत्रात विविध प्रयोग करता आले. प्रारंभी की-बोर्ड वाजवून मी गाणी वाजवत असे. त्यासाठी हेडफोनवर गाणी ऐकत वाद्ये शिकलो. त्यावेळी मी गाणी गात नसे. केवळ वादनात प्रयोग करत गेलो. पिंपळगावसारख्या छोट्या शहरात कला मंचची स्थापना केली. त्या माध्यामातून गावच्या विद्यार्थ्यांना संगीत वाद्ये तसेच नृत्य शिकवत गेलो. की-बोर्ड प्रारंभीपासून वाजवत. नंतर वाद्ये शिकण्याची आवड आणि संस्थेची गरज म्हणून गिटार शिकलो. वाद्य वाजवताना कान तयार होता गेला. सूर, ताल लयीशी गट्टी जमली ती कायमचीच. प्रारंभी वादनापासूनचा प्रवास पुढे गाणी गाण्याकडे झाला. वादनातून सूर तालाचे ज्ञान गाण्यात कामी येत होते. माझा हार्मोनियम आणि की-बोर्ड वादनाचा अनुभव गायकीसाठी महत्त्वपूर्ण ठरत होता. त्यामुळेच गायकीचे बारकावे लगेच आत्मसात होत गेले.

सुमारे 300हून अधिक कार्यक्रमात मी गिटार आणि की-बोर्ड वादक म्हणून साथसंगत केली. के. के. वाघ इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये एकदा संगीत कार्यक्रमासाठी विचारणा करण्यात आली. त्यावेळी जमलेले सर्व वादक-गायक कलाकार एकत्र येत गाण्याचा गु्रप तयार केला. आमच्या चमूमध्ये माझ्यासह विनेश नायर, गणेश जाधव आणि एक मित्र असे मिळून मोफत कार्यक्रम करू लागलो आणि व्यावसायिक बॅण्ड म्हणून आम्ही कार्यक्रमाचा श्रीगणेशा केला. नाशिकमध्ये अशा प्रकाराचा आमचा पहिला बॅण्ड चमू आहे हे सांगताना विशेष अभिमान वाटतो.

विविध माध्यमे, टीव्ही चॅनल्स, रिअ‍ॅलिटी शो आणि नाशिकसह पुणे, मुंबई अशा महानगरांमध्ये आजवर आम्ही 800हून अधिक सांगीतीक कार्यक्रम केले. आम्ही छोट्या मुलांपासून ते अगदी सत्तरीच्या पुढील ज्येष्ठ नागरिकांची आवड लक्षात घेऊन ‘ऑडियन्स’प्रमाणे गाण्यांची निवड करून सादरीकरण करत आहोत. त्यामुळे अल्पावधीतच आमचा बॅण्ड थोरामोठ्यांपासून सर्वांचाच आवडता बॅण्ड झाला.

गुरूंचे मार्गदर्शन नसताना माझी प्रयोगशीलता मला नवे शिकण्यास प्रेरणा देऊ लागली. माझ्या बॅण्डमधील इतर कलाकार माझ्या चुका, त्रुटी सांगून घडवत गेले. संगीत ऐकून तुम्ही घडू शकतात. त्यासाठी गुरू नसला तरीही तुम्ही उत्तम श्रोता आधी व्हावे, असे मला वाटते. तरीही गणेश आणि विनय हे माझे मित्र त्या अर्थाने ‘गुरू’ झाले. हे दोघेही संगीताचे औपचारिक शिक्षण घेऊन आले होते. त्यामुळे त्यांनीही माझ्या गाण्याला पैलू पाडले. अनुभव आणि नवनवीन प्रयोग करून मी गाण्यातही नैपुण्य आणण्याचा प्रयत्न करत गेलो.

आजवर सातहून अधिक मराठी-हिंंदी गीतांना मी स्वतंत्रपणे संगीत दिले आहे. एका मराठी गाण्याला युुनिव्हर्सल बॅनरअंंतर्गत जगभर प्रसिद्ध केले. संगीतात नवे प्रयोग, नवनिर्मिती करताना देहभान विसरायला होते. मी भोजपुरी, मल्याळम, गुजराती, बंगाली, पंजाबी, राजस्थानी भाषेतून गाणी गात आहे, हे सांगताना विशेष आनंद होतो. कलेमुळे बहुभाषिक होण्याचे समाधान मिळते. हिंदी चित्रपटातील विविध लोेकप्रिय गाणी देशातील विविध प्रादेशिक भाषेतून रसिकांसाठी आणण्याचा आमचा मानस आहे. यासाठी गाणे ऐकण्याचा माझा छंद कामी येतो. नाशिकमध्ये होणार्‍या आंतरराष्ट्रीय वाईन महोत्सवामध्येही विदेशी नागरिकांना आम्ही देशी संगीताचा आनंद देत आहोत.

सांगीतीक पॅशन जपताना शिक्षणाकडे कधीही दुर्लक्ष केले नाही. कलाकाराने आपल्या कलेला करिअर म्हणून निवडताना शिक्षणाची एक बाजू भक्कम करून ठेवावी या मताचा मी आहे. कारण हे चढउताराचे क्षेत्र आहे. काहीशी शाश्वत नाही. अशावेळी तुमचे इतर करिअर साथ देते. त्यासाठी कलेची पूजा करताना मी बीसीए, एमसीए शिक्षण पूर्ण केले. एमसीएला विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालो. अन्ड्रोएड डेव्हलपर म्हणून मी काम केले.

‘व्हाईस ऑफ नाशिक-2015’ पुरस्कार मिळाल्याचा आनंद माझ्यासाठी खूप मोठा होता. त्यातून घरच्यांचा माझ्यावरील विश्वास वाढला. प्रत्येकाने आपल्यातील उपजत कला केवळ छंद म्हणून नव्हे तर ध्यास म्हणून जोपासावी. इतर कलाकारांशी इर्षा नसावी. रसिकांच्या आवडीनुसार बदलणारे कलेचे हे जग आहे. त्यामुळे रसिक श्रोते यामध्ये महत्त्वाचे असतात, हे मनात पक्के करावे. ‘लाईमलाईट’मध्ये न्हाऊन निघताना डोक्यात यशाची हवा जाऊ न देणे हेच कलाकारांसाठी पुढे जाण्यासाठी यशाचे गमक आहे.

दहा वर्षांच्या संगीत प्रवासात अनेक कार्यक्रम केले. माझ्या एमएच-15 बॅण्डमध्ये अधिक नवनवीन प्रयोग करत ‘व्हर्सेटाईल’ बॅण्ड असा नावलौकिक मला मिळावयचा आहे. मी संगीतबद्ध केलेले काही व्हिडीओ गिते लवकरच रसिकांच्या भेटीला येत आहेत. वाद्य संगीतातूनही नवे देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. संगीत संस्थेत शिकणार्‍या माझ्या विद्यार्थ्यांना कलेतील सर्व गोष्टी शिकवून प्रसंगी स्टेज संधी देत कलाकारांची पिढी घडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. प्रारंभी आवड असलेले संगीत आज माझा श्वास झालेय. कलेशिवाय जीवनात आनंद, परिपूर्णता नाही.

(शब्दांकन – नील कुलकर्णी )

LEAVE A REPLY

*