नाशिक । भूषण पगार : ‘भूषण’ कृषिवैभवाचे (कृषी)

1

शहरात राहिलेल्या शेतकरी तरुणाने गावाकडच्या वडिलोपार्जित पडीक जमिनीवर सोने उगवायचे स्वप्न पाहिले. अन् शेतीतील अनुभवाची शिदोरी नसतानाही शून्यातून कृषिवैभव उभे केले. डाळिंब, टोमॅटो पिकांतील विविध प्रयोगांबरोबरच निर्यातक्षम द्राक्षांचीही पेरणी केली. कळवणच्या भूषण पगार यांची अशी वाटचाल तरुणांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरावी.

‘खेड्यायाकडे चला, खेडी समृद्ध करा, तिथेच देशाचा खरा चेहरा आहे’. या महात्मा गांधी यांच्या संदेशाचे तंतोतंत पालन करायचे ठरवले. वडिलांची नोकरी नाशिकमध्ये असल्याने शहरात वाढलो, बी.एस्सी.चे पहिले वर्ष झाल्यावर माझ्या कळवण गावातली काळी माती खुणावू लागली.

सटाणा तालुक्यात माझ्या मामांची शेती असल्याने त्यांच्या प्रयोगांबद्दल कुतूहल वाटायचे. पारंपरिक जमीन असताना शहरात नोकरी करणे पटत नव्हते. त्यामुळे शेती करण्यासाठी कळवण गाठले. शेती करण्यायोग्य परिस्थितीच नव्हती. काळी माती, पाण्याची सोय काहीच नाही, करणार काय? सुरुवातीला जमिनीचे लेव्हलिंग करणे, पाण्याचे स्त्रोत उभे करणे महत्त्वाचे होते.

वडिलांनी दिलेल्या अर्थसहाय्यातून विहीर खणली. विहिरीसाठी पाण्याचा स्त्रोत शोधून देण्याचे काम कोल्हापूर येथील भूजलपातळीतज्ज्ञांनी केले. त्यानंतर हंगामी मक्याचे पीक घेतले. विहिरीला पाणी लागल्यानंतर कांद्याचीही लागवड केली. उन्हाळी कांदा आणि पावसाळी मका ही कमी जोखमीची पिके घेतली. कांद्याचे रोप तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले. हा प्रयोग यशस्वी झाल्यावर चौथ्या वर्षी डाळिंब लावला. त्यामध्ये खूप अडचणींचा सामना करावा लागला. विरोध पत्करून भांडवल उपलब्ध झाल्यावर डाळिंबाची लागवड केली.

पाच एकर क्षेत्रावर वार्षिक एकच पीक घेता येते. त्यामुळे दुसर्‍या शेतकर्‍यांचे चार एकर क्षेत्र वार्षिक करारावर कसायला घेतले. अडीच एकर क्षेत्रावर डाळिंबाचे पीक लावले. उरलेल्या अडीच एकरात टोमॅटो आणि कांद्याचे पीक हंगामी घेतले. डाळिंबाबरोबर आंतरपीक म्हणून कोबी लावला. या कोबीने आर्थिक हात दिला आणि डाळिंबाचा एक वर्षाचा खर्च निघाला. साडेसातशे डाळिंबाच्या झाडांमधून 20 ते 22 टन उत्पादन मिळाले. डाळिंब उत्कृष्ट होते; पण विक्रीचा अनुभव नव्हता. त्यासाठी व्यापार्‍यांना गाठले.

व्यापार्‍यांनी ‘थोडे थांबा, आपण डाळिंबाची निर्यात करू’ असे आमिष दाखवले. पण नंतर स्थानिक बाजारपेठेसाठी 55 रुपये इतका दर देऊन मला वाटेला लावले. डाळिंब हे नाशवंत फळ असल्याने दुसरा पर्यायही नव्हता. डाळिंबाचे पहिले वर्ष व्यावसायिकदृष्ट्या हालाखीचे गेले. त्याचवेळी ‘कृषी समर्पण ग्रुप’चे शास्त्रज्ञ विनायक शिंदे-पाटील संपर्कात आले. डाळिंब हे कोरडवाहू पीक असूनही कळवणसारख्या अतिपावसाच्या क्षेत्रात काळ्या मातीत त्याचे चांगले उत्पादन कसे घेतले, याचे त्यांना आश्चर्य वाटत होते.

त्यांच्या समूहात मला सामील करून घेऊन माझ्या डाळिंबांची यशोगाथाही प्रसिद्ध केली. आता मी या ग्रुपचा अ‍ॅडमीन असून चार ते पाच हजार शेतकरी संपर्कात आहेत. अतिपाण्यामुळे डाळिंबात मर रोग येण्याची शक्यता असते. डाळिंब लागवडीत पाण्याचे नियोजन आवश्यक असते, ते मी केले. यशस्वी झालो. तिसर्‍या वर्षी घेतलेल्या डाळिंबातून 61 रुपये दर याप्रमाणे 32 टन डाळिंबाचे पिकातून आर्थिक लाभ झाला. कटू अनुभवातून शिकतच सुमारे तीन वर्षांपूर्वी अडीच एकर क्षेत्रात निर्यातक्षम द्राक्ष लागवडीचा निर्णय घेतला.

कळवणमधल्या घरापासून एक किलोमीटर अंतरावर शेती होती. द्राक्ष आणि डाळिंब ही जोखमीची पिके असल्याने मळ्यात पत्र्याचे घर बांधले. रात्री 8 तास वीज असल्याने तिथे थांबणे गरजेचे होते. कमी खर्चात द्राक्षाचे चांगले उत्पादन घेण्याचे कौशल्य मित्र विजय पिंगळे याच्याकडून घेतले. द्राक्षलागवडीला एकरी चार ते पाच लाख रुपये खर्च येतो. रोप लावण्यापासून पीक निघेपर्यंत दीड वर्षांचा कालावधी जातो. यासाठी ट्रॅक्टरने स्प्रे मारण्याची अत्याधुनिक यंत्रणा वापरली. एकूण 15 लाखांची गुंतवणूक केली. ट्रॅक्टरसाठी कर्ज काढावे लागले.

पुणे येथील एनआरसीजीने सुचवलेल्या चार्टनुसार द्राक्षाचे व्यवस्थापन केल्यास निर्यातक्षम रसायनविरहित द्राक्ष मिळतात. या पिकाची फ्लॉवरिंग स्टेज महत्त्वाची असते, त्या काळात घड आणि मण्यांची निर्मिती होते. याच काळात पंधरा दिवस सलग पावसात मळ्यात गुडघाभर पाणी होते. ते अहोरात्र उपसून बाग जिवंत ठेवली, त्याचदरम्यान माझ्या गावातल्या 90 टक्के द्राक्षबागा तोट्यात होत्या. एकरी 90 क्विंटल थॉमसन जातीची द्राक्ष युरोप व रशियाला नीरज एक्पोर्टच्या माध्यमातून निर्यात केली. चांगला भाव मिळाला तर वार्षिक टर्नओव्हर 22 ते 25 लाख रुपये असतो.

टोमॅटोच्या लागवडीसाठीही लागवडीचे अंतर 6 फूट ठेवले. खेळत्या हवेमुळे उत्पादन दीडपट मिळाले. हे पीकही किफायतशीर ठरतेय. जोडव्यवसाय म्हणून दुग्धव्यवसायही करतोय. सहा गायींचे 15 ते 20 लिटर दूध रोज ‘अमूल’ला जाते आणि शेणखताचीही व्यवस्था होतेय. गरज असल्यासच रासायनिक खते वापरतो. गरीब शेतकर्‍यांना अल्पदरात रोपे उपलब्ध करून देण्यासाठी रोपवाटिकाही तयार केली होती; पण कटू अनुभवांनंतर वाण, रोपनिर्मितीचे प्रयोग माझ्यापुरतेच करतो आहे.

आमचा ‘अ‍ॅग्रीकॉस्ट हा व्हॉट्सअ‍ॅप समूह राज्यभरातील कृषी क्षेत्रातील दिशाहीन तरुणांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतोय. सध्या वार्षिक करारावर दोन जोड्या माझ्याकडे काम करत आहेत. कुटुंबाची साथ आहेच. गावाकडच्या मोकळ्या हवेत स्वाभिमानाने जगण्याचा आनंद त्यांना मिळतोय. आता पत्र्याच्या घराजवळ दुमजली घरही बांधलेय. स्वबळावर साताठ वर्षांत एवढे कमवल्याचा आनंद आहेच. निराश होणार्‍या युवा शेतकर्‍यांना मला शहरात जाण्यापासून रोखायचेय. नोकरी करून मिळतात त्याहून अधिक पैसे शेती किंवा पूरक व्यवसायातून मिळू शकतात.

शब्दांकन : ( शिल्पा दातार-जोशी )

पुढील अंकात – गोकुळ जाधव (कृषी)

1 COMMENT

LEAVE A REPLY

*