नाशिक । ‘उत्तम’ समाजसेवक : अॅड. उत्तम आभाळे ( विधी )

1

लहानपणी खूप कष्ट बघितले. दहावीपर्यंत घरात विजेचे कनेक्शन नव्हते. कंदिल, चिमणीच्या उजेडात अभ्यास करायचो. पुढे वडिलांना हातभार म्हणून पार्टटाईम जॉब करून शिक्षण पूर्ण केले. अगदी वकिलीची सुरुवातीच्या काळात असणारी इंटर्नशिपदेखील पार्टटाईम जॉब करून केली. भावंडांच्या शिक्षणासाठी हातभार लावला. भाऊदेखील स्वतःच्या पायावर उभे आहेत. आम्ही ज्या गरिबीतून दिवस काढले आहेत तसे दिवस कुणावर येऊ नये यासाठी मी समाजकार्यासाठी तत्पर असतो.

मी मूळचा एकलहर्‍याचा. येथील शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला. वडील येथील औष्णिक वीज केंद्रात नोकरीला होते. त्यामुळे आम्ही नाशिकरोडला राहायला आलो. मुलांचे शिक्षण, घरचा उदरनिर्वाह यामुळे आर्थिक चणचण क्षणोक्षणी भासत होती. मग वडिलांनी नाशिककरोडला एक इलेक्ट्रॉनिक दुकान सुरू केले. त्यातून हातभार लागत होता. मी मोठा असल्यामुळे मीही वडिलांना मदत करू लागलो. मिळेल तिथे पार्टटाईम जॉब केला, परंतु शिक्षण थांबवले नाही. यामुळे वडिलांनाही आधार मिळाला. घरातील कर्ता व्यक्ती म्हणून सर्व जबाबदार्‍या पार पाडू लागलो. आज दोन्ही भावंडे स्वतःच्या पायावर उभी आहेत. पुढे मी एनबीटी लॉ कॉलेजला प्रवेश घेत वकिलीचे शिक्षण पूर्ण केले.


आमच्या घरात दहावीपर्यंत वीज नव्हती. मग आम्ही दिवसा अभ्यास करायचो तसेच परीक्षा काळात अगदी कंदिल आणि चिमणीच्या प्रकाशात अभ्यास केला. शहरातील केटीएचएम महाविद्यालयात माझा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला. त्याचवेळेस मी एनसीसी (नॅशनल कॅडेट कोर्स) मध्ये सहभागी झालो. या काळातच मला समाजकार्याची आवड निर्माण झाली. तेव्हापासून आजपर्यंत मी कुठल्या ना कुठल्या प्रकारे समाजाचे काहीतरी देणे लागतो ही भावना डोळ्यासमोर ठेवून समाजकार्य करत आहे.

मुंबई विद्यापीठातून सायबर लॉमध्ये पदवी मिळवली. दिवंगत अ‍ॅड. बाबूराव गणपतराव ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन मी वकिलीचा सराव त्यांचे पुत्र अ‍ॅड. नितीन बाबूराव ठाकरे यांच्या सान्निध्यात राहून केला. वेळोवेळी त्यांनी मला मार्गदर्शन केले. अनेक केसेस हाताळताना त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळाले. पुढे सरकारी वकील सुधीर शिवाजी कोतवाल यांच्याकडे वकिलीच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली.

घरची परिस्थिती हलाखीची होती. त्यामुळे जीवनात काहीतरी करायचे, यासाठी प्रचंड कष्ट घेत होतो. एका ठेकेदाराच्या कार्यालयातही मी वकिलीची इंटर्नशिप सुरू असताना काम केले. कधीही वेळ वाया जाऊ दिला नाही. तद्नंतर माझ्या वकिलीच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. सिव्हील प्रॅक्टिस हे माझे क्षेत्र आहे. कोटक महिंद्रा, टाटा कॅपिटल, एसबीआय कार्डस्, नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेच्या अनेक केसेस हाताळल्या. कनव्हेंसिंग, टायटल व्हेरिफिकेशन आणि कायदेशीर बाबी समजावून सांगण्यासाठीही मी काम करत आहे. कलम 136 मध्ये आलेल्या चेक बाऊन्सच्या केसेस हाताळून माझ्या अनेक पक्षकारांना न्याय मिळाला आहे.

आतापर्यंत अनेक गरीब पक्षकारांना मोफत सल्ला तसेच त्यांच्या केसेसही लढलो. एकदा एका आजीची केस माझ्याकडे होती. ती मी लढलो. आजीला न्याय मिळवून दिला. आजीच्या चेहर्‍यावर खूप समाधान दिसत होते. केसचा निकाल तर आपल्या बाजूने लागला, मात्र ज्या वकिलाने आपली केस जिंकली त्याला देण्यासाठी आपल्याकडे दमडीसुद्धा नाही, असे त्या आजीला वाटायचे. मात्र परत जाताना शेतातील कोबीचा कंद आणि एक फ्लॉवरचा कंद त्या आजीने मला दिला होता. तो कंद मी अगदी आनंदाने स्वीकारला. अनेक दिवस ते कुटुंब चांगल्या संपर्कातदेखील राहिले. विधी क्षेत्रामुळे मी अशी माणसे जोडू शकलो. रोज नवनवीन केस हाताळणे, त्यातून मार्ग काढणे ही आता सवय झाली आहे. वकिली करत असताना मी ‘आई’ या सोशल ग्रुपशी जोडलो गेलो. या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप तसेच त्यांच्या शिक्षणाची फीदेखील भरतो.

गरजवंतांना हिवाळ्यात ब्लँकेट तसेच कपड्यांचे वाटपदेखील करतो. मी या क्षेत्रात ज्युनिअर असताना मला अनेकांनी खूप सहकार्य केले. तोच वसा मी पुढे चालवत असून माझ्याकडे आलेल्या प्रत्येक विद्यार्थी वकिलास मी माझ्यापरीने सहकार्य करतो. मी कष्ट करून इथवर पोहोचलो आहे. त्यामुळे कुठलाही गर्व न बाळगता मी नातेवाईक असो वा मित्र परिवार त्यांना योग्यप्रकारे मार्गदर्शन करतो. अनेकांना वेळोवेळी आर्थिक मदतही करत असतो. वकिलीस सुरुवात करण्याआधी कुठल्यातरी वकिलाकडे विद्यार्थ्यांना इंटर्नशिप करावी लागते. याकाळात फक्त वकिलीचे प्रत्यक्ष शिक्षण घेता येते. त्यापलीकडे एक रुपयादेखील मिळत नाही. त्यातून अनेक विद्यार्थी नैराश्यात जातात, परंतु याकाळात केलेल्या कष्टाचे फळ हे नक्की मिळते. वकिलीत सुरुवातीचेे चार ते पाच वर्षे खूप संघर्षाची असतात. ती एकदा तुमच्या जिद्द आणि कौशल्याच्या जोरावर पार केली की पुढे आपोआप तुमचे नाव होत जाते.

वकिली करत असताना मी एकलहरे येथील शेतीदेखील करतो. दर आठवड्याला गावाकडे जाऊन पुढील आठवड्याची तयारी करत खत, खाद्य, बी-बियाणांत लक्ष घालून संपूर्ण शेती बागायती केली आहे.

( शब्दांकन : दिनेश सोनवणे )

1 COMMENT

  1. उत्तम हे अतिशय मृदुभाषी सडेतोड आणि प्रामाणिक व्यक्तिमत्व असून चांगले कामे करायची प्रचंड क्षमता त्याच्यात आहे।

LEAVE A REPLY

*