नाशिक । ‘समुपदेशनाचे’ एक तप : अॅड. सुवर्णा पालवे-घुगे ( विधी )

0

कमी खर्चात कायद्याचे शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहता येईल या उद्देशाने वकिली पेशाकडे आली. वडिलांना वकील व्हायचे होते. त्यांचे स्वप्न मी वकील होऊन पूर्ण केले. वडिलांनंतर दुसरे गुरू अ‍ॅड. जयसिंग सांगळे. त्यांच्यामुळेच वकिलीची योग्य दिशा मिळाली. कौटुंबिक वाद कोर्टाच्या पायरीच्या बाहेरच मिटवण्याचा प्रयत्न करते. आज अनेकांचा संसार सुखात सुरू आहे. आई-वडिलांनंतर मला सासू, सासरे आणि पतीने खूप पाठिंबा दिला. त्याशिवाय हे सगळे शक्यच नव्हते.

मी मूळची सिन्नर तालुक्यातील आशापूरची. वडील अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात वीज महामंडळात नोकरीला होते. त्यामुळे मी लहानाची मोठी संगमनेरमध्येच झाले. घरची परिस्थिती मध्यमवर्गीयच होती; पण वडिलांनी कधी कुठल्याही गोष्टीची कमी भासूू दिली नाही.


माझे संपूर्ण शिक्षण संगमनेरमध्येच झाले. दहावीला चांगले मार्क्स मिळाले म्हणून अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. अभ्यासात सातत्य आणि काहीतरी करायचे अशा प्रचंड इच्छाशक्तीने मी बारावीत चांगले गुण मिळवले. माझा भाऊदेखील हुशार होता. दोघांचे शिक्षण वडिलांना पेलवणार की नाही त्यामुळे मी बारावीनंतर वकिलीचे शिक्षण घेण्याचे ठरवले. मी सरळ वकिलीच्या पाच वर्षीय अभ्यासक्रमाला संगमनेरमधील एस. एस. लॉ महाविद्यालयात प्रवेश घेतला. बीएसएल एललबी हे पाच वर्षे वकिलीचे शिक्षण पूर्ण केले. एलएलएमच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतला. नंतर लग्न झाले. मग एलएलएम करायचे राहिले. सासरे सुरेंद्र घुगे पोलीस खात्यात असल्यामुळे वडिलांनंतर माझ्या वकिलीसाठी त्यांच्याकडून मला वडीलकीचा पाठिंबा मिळाला.

माझे पती सचिन घुगे ऑटोमोबाईल इंजिनिअर आहेत. लग्नानंतर घरात पोलीस आणि वकील असल्यामुळे नियमित वेगवेगळ्या घटनांवर चर्चा होत होत्या. यादरम्यान वेगवेगळ्या कायद्यांचा अभ्यास केला. पुस्तके वाचली. सासर्‍यांनीही मला वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्यांची बदली सिन्नरला होती म्हणून आम्ही सहकुटुंब सिन्नरला आलो. सिन्नर न्यायालयात पहिल्यांदाच पाऊल ठेवले. याकाळात मी एक वर्ष येथील नामवंत वकील जयसिंग सांगळे यांच्याकडे प्रॅक्टिस केली. तेथे त्यांनी अनेक वेगवेगळ्या गोष्टींची मला माहिती दिली. कंपनीच्या लिगल विभागापासून ते वेगवेगळ्या घटनांची माहिती जाणून घेण्यासाठी मला ते नियमित मदत करत राहिले.

सिन्नरमध्ये असताना मला एक सरकारी नोकरावर हल्ला केल्याची केस हाताळण्याची संधी मिळाली. घटना तशी वाईट होती. मात्र कुणीही गुन्हा जाणूनबुजून करत नाही. गुन्हा घडल्यानंतर पश्चाताप हा प्रत्येकालाच होत असतो. त्यामुळे पक्षकाराची बाजू मांडताना खूप वेगळा अनुभव मला या प्रकरणात मिळाला. याकाळात मला अनेक सीनियर्सनी मार्गदर्शन केले. मला प्रकरण जवळून हाताळता आले. अंतिम निकालाची तारीख जसजशी जवळ येत होती तसतशी मनात धडकी भरली होती. अखेर दिवस उजाडला. न्यायालयात हजर झाले. नेहमीप्रमाणे न्यायाधिशांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले. मी पक्षकाराच्या बाजूने बचाव करत वेगवेगळी कौशल्ये वापरून केस जिंकली. या केसमध्ये वेगवेगळ्या पैलूंंचा अभ्यास करायला मिळाला. केस जिंकल्यानंतर मला माझ्या जीवनातील सर्वात जास्त आनंद त्याच दिवशी झाला होता.

दरम्यान, अनेक केसेस लढताना आलेल्या अडचणी अ‍ॅड. सांगळे यांनी दूर केल्या. तेव्हापासून मी लोकांचे प्रश्न, अंतर्गत वाद, मुलीच्या संसारात मुलीच्या आई-वडिलांचा हस्तक्षेप यावरून झालेली भांडणे, क्षुल्लक कारणावरून चव्हाट्यावर आलेले कौटुंबिक वाद यांचा मला जवळून अभ्यास करता आला. त्यांचे प्रश्न जाणून घेताना आपण, आपले सासरची परिस्थिती बघून खूप सुखी आहोत असे वाटे. मग मी माझ्यावर झालेल्या दोन्ही घरांच्या संस्कारांचे कौशल्य वापरून प्रकरण हुशारीने हाताळू लागले.

सासर्‍यांची बदली नाशिकमध्ये झाल्यानंतर आमचे सर्व कुटुंब नाशिकमध्ये आले. त्यानंतर मी नाशिक जिल्हा न्यायालयात वकिलीला सुरुवात केली. माझ्यावर वकिलीचे जे संस्कार झाले, ज्या सीनियर्सने मला वकिलीचा मार्ग दाखवला अगदी तशाच प्रकारे मी वकिली करत आहे. अनेकदा माझ्याकडे कौटुंबिक वादावरून नोटीस पाठवण्यासाठी किंवा समोरच्या व्यक्तीला कोर्टात खेचण्यासाठी अनेक महिला येतात. मग मी त्यांना घरात चाललेला संपूर्ण घटनाक्रम लिहावयास सांगतेे. ते लिहून झाल्यानंतर अनेक महिला स्वतःहून सांगतात की, आम्हाला नोटीस द्यायची नाही. माझ्या घरातील अडचणी मी सुधारण्याचा प्रयत्न करते. तसेच अनेक महिलांच्या नवर्‍यांना मी भेटते. त्यांना गंभीर पाऊल उचलल्यानंतर काय होईल याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करते. याची कुठलीही फी नसते. एक समाजसेवा म्हणून मी करते आहे.

अलीकडच्या काळात तर तो माझा छंदच झाला आहे. महिलांमध्ये आपण समजावून सांगितल्यास बदल घडतो. एखादा गुन्हेगार आक्रमक पाऊल उचताना भान विसरतो. गुन्हा घडल्यानंतर पश्चाताप करतो. त्यामुळे कौटुंबिक वादात मी शक्यतो समुपदेशन करण्यावर भर देते. गेल्या 12 वर्षांपासून हे काम करत आहे. आजवर अनेक महिलांना तेव्हा सांगितलेले पटले आहे, अनेकजणी आजही चांगल्या संपर्कात आहेत. त्यांच्याकडे बघून समाधान वाटते. काही घटनांमध्ये नवर्‍याचीदेखील चूक असते. एखाद्या सुशिक्षित मुलीशी लग्न केले आणि त्याने तर तिला खेडेगावात चूल पेटवायला सांगितली तर हे वाद उफाळून येणार. त्यामुळे स्त्रीलादेखील चांगली वागणूक दिली गेली पाहिजे. मग सासू, सून, मुलगा, मुलीचे आई-वडील यांची वेगवेगळी वेळ घेऊन मी समजावून सांगते.

माझे सासर नाशिक जिल्ह्यातील इंदोरे येथील आहे. सासर्‍यांची सेवानिवृत्ती मूळ गावी होणार होती. त्यामुळे 2008 साली आम्ही नाशिकमध्ये आलो. तेव्हापासून मी नाशिक जिल्हा न्यायालयात अ‍ॅड. जालिंदर ताडगे यांच्याकडे शिकते आहे. ताडगे सरांनी मला मोलाचे मार्गदर्शन केले. कुठलीही शंका असेल तर ते दोन्ही बाजू समजावून सांगतात. नाशिकमध्ये आल्यानंतर मला काहीच माहिती नव्हते. मात्र यावेळी माझ्या सीनियर्सने मला खूप मदत केली. आजही काही शंका असतील तर ते मार्गदर्शन करण्यासाठी तत्पर असतात. वकिलीत खूप संधी आहेत. समाजसेवा सर्वच करतात. फक्त मार्ग वेगळे राहतात. मला ज्या सीनियर्सने मदत केली तशीच मदत मीदेखील माझ्या ज्युनियर्सला तसेच करत आहे.

अनेक वकील होऊ पाहणारे विद्यार्थी भेटतात. त्यांना योग्य ते मार्गदर्शन माझ्याकडून वेळोवेळी केले जाते. अनेकांची परिस्थिती फारशी चांगली नसते. मग त्यांना सुरुवातीचे दिवस खूप अवघड जातात. हे दिवस खुप संघर्षाचे असतात. यात फारसा पगार मिळत नाही. हे शिकण्याचे दिवस असतात. स्वतःला सिद्ध करण्याची ही सुवर्णसंधी असते. त्यामुळे नवोदित विद्यार्थ्यांनी हार न मानता याकाळात सर्व गोष्टी समजून घ्याव्यात. नवोदित वकील विद्यार्थी असो वा विद्यार्थिनी असो, माझे नेहमीच त्यांना मार्गदर्शन असेल.

(शब्दांकन : दिनेश सोनवणे )

LEAVE A REPLY

*