नाशिक । ‘समाजकार्याचा’ वसा : अॅड. अर्चना भूसनार-महाबळ ( विधी )

0

परिस्थिती हालाखीची असतानादेखील वकिलीचे शिक्षण पूर्ण करून आज या क्षेत्रात कार्यरत आहे. वकिलीतील सिव्हिल क्षेत्रात काम करते. कायदेशील सल्लागार म्हणून अनेक कंपन्या आणि बँकांशी जोडली गेली आहे. कौटुंबिक वाद कोर्टाच्या बाहेर मिटवण्यासाठी प्रयत्न करते. जिल्ह्यातील अनेक गरीब महिलांचे वकीलपत्र हाती घेऊन त्यांना न्याय मिळवून दिला.

मूळ गाव चांदवड तालुक्यातील गोहरण. वडील वनविभागात नोकरीला असल्यामूळे नियमित ग्रामीण भागात बदली होत असायची. माझ्या जन्मानंतर वडिलांची नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे बदली झाली होती. त्यामुळे माझे दहावीपर्यंतचे शिक्षण सातपुडा विद्यालयात झाले. पुढे मी बारावीचे शिक्षणदेखील शहाद्यातच पूर्ण केले.


त्यानंतर वडिलांची बदली नाशिकला झाली. आम्ही नाशिकला आलो. सुरुवातीपासून स्पर्धा परीक्षा देण्याची आवड होती. म्हणून शहरातील केटीएचएम महाविद्यालयात पदवीचे शिक्षण इंग्रजी विषयातून पूर्ण केले. स्पर्धा परीक्षांची याकाळात तयारी सुरूच होती. मग मी नवजीवन लॉ कॉलेजमधून वकिलीचे शिक्षण पूर्ण केले. 2009 साली मला सनद मिळाली. पुढे मी जेएमएफसी (न्यायाधीश)ची परीक्षा दिली. त्यात यशाला गवसणी जरी घालता आली नाही तरी मागे न हटता मी नाशिकच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात वकिली करण्यास सुरुवात केली.

सुरुवातीचे तीन ते चार वर्षे अ‍ॅड. दीपशिखा भिडे यांच्याकडे ज्युनियरशिप केली. याकाळात अनेक कंपन्या, बँकांची कामे, कायदेशीर सल्ल्याबाबतची वेगवेगळी प्रकरणे हाताळण्याची संधी मला मिळाली. यावेळी अनेक प्रश्न समजले. त्यातून अनेक मार्ग कसे काढता येतील याबाबत अ‍ॅड. भिडे यांनी मला योग्य मार्ग दाखवला.

काही दिवसांनी मी माझ्या वैयक्तिक कामाला सुरुवात केली. सिव्हील क्षेत्रातील सर्व कामे मी करू लागले. अनेक कौटुंबिक वाद कोर्टाच्या दाराबाहेर सोडवण्यासाठी मी प्रयत्न करू लागले. त्यातून ओळखी वाढल्या तसे कामही वाढले. न्यायदेवतेकडे न्याय मागण्यासाठी खेड्यापाड्यातील अनेक महिला, पुरुष मी बघितले. अनेकांच्या मुली लग्न होऊन त्याही घरी आलेल्या होत्या. त्यांची प्रकरणे हाताळली. अनेकांना समुपदेशन करून पुन्हा सासरी पाठवले. आज त्यांचा संसार गुण्यागोविंदाने सुरू आहे. त्यांच्याकडे बघितले की तेव्हाची परिस्थिती आणि आपल्या पुढाकाराने आज त्यांचा सुखाचा संसार अगदी आनंदात सुरू असताना पाहिले की समाधान वाटते.

अनेक कंपन्यांचे कायदेशील सल्लागार म्हणून काम बघावे लागते. आपल्या सल्ल्यामुळे कंपनी अडचणीत येणार नाही ही काळजी जबाबदारीने घेऊन सल्लामसलत करावी लागते. वकील क्षेत्रात तशी पावलोपावली स्पर्धा आहे. तुमच्या कौशल्याने तुम्ही करिअर घडवू शकतात. सिव्हील क्षेत्रात जरी कमी अवघड असणारे प्रकरण येत असले तरी प्रत्येकाच्या अनुभवावर आणि अभ्यास कौशल्यावर सर्वकाही अवलंबून असते.

अनेक वकिलांकडे आज इंटर्नशिपसाठी विद्यार्थी आहेत. आयुष्याला कलाटणी देणारा हा काळ असतो. याकाळात जितकी तुम्ही मेहनत घ्याल तितकेच लवकर या पेशात स्थिर होता येते. युवा पिढीला मी असे सांगेल की, नक्कीच वकिली पेशाकडे या, परंतु अभ्यास करून स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करत राहा. चुकीची कामे न करता सदैव कष्ट करण्यासाठी तयार राहा. वकिलीत राहून सामाजिक कामे करता येतात. तुमच्या समाजकार्याची समाजातील अनेकांना गरज भासेल. ती तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करत राहा. एखाद्या व्यक्तीचे उद्ध्वस्त होऊ पाहणारे आयुष्य तुमच्या योग्य निर्णयामुळे आणि समुपदेशनामुळे जगण्याचा नवा मार्ग दाखवू शकते.

नाशिकमध्येही वकिलीचे शिक्षण देणारे अनेक महाविद्यालये आहेत. त्यात गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते. अनेक वकिलांशी याकाळात संवाद होतात. वकिली पेशातील अनेक वेगवेगळ्या पैलूंचा अभ्यास याकाळात होतो. वेगवेगळे कायदे अभ्यासत असताना वकील म्हणून तुमचे योगदान कसे असावे याची इत्यंभूत
माहिती मिळते.

(शब्दांकन – दिनेश सोनवणे )

LEAVE A REPLY

*