नाशिक । वकिलीचा अनुभव वेगळा : अॅड. महेश लोहिते ( विधी )

0

वकिली व्यवसाय म्हणण्यापेक्षा ते एक व्रत आहे, असे मला वाटते. त्यामुळे आजतागायत मी चांगल्याप्रकारे ते व्रत पार पाडत आहे. वकिली व्यवसायात वावरत असताना अनेक माणसांचे चेहरे नजरेभोवती असतात. त्यांच्या चेहर्‍यावरून त्यांची आर्थिक अवस्था समजते. त्यांचा चेहरा वाचता येतो. त्यामुळे कदाचित वकिलीमध्ये वाचनाला अधिक महत्त्व दिले आहे. त्यामुळे मी वाचनावर अधिक भर देत असतो.

असे म्हटले जाते शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये. त्यापेक्षा ती चढायला लागू नये यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपण जे काम करतो तेव्हा तुमची पार्श्वभूमी काही असो लोकांच्या निरीक्षणातून आपली जडणघडण होत असते. मी माझ्या घरातील पहिला वकील असून मला सांगायला अभिमान वाटतो की माझी पत्नीही वकील म्हणून कार्यरत आहे.
मी मूळचा पिंपळगाव बसवंतचा. वडील एसटी महामंडळात कामाला असल्याने माझ्या शिक्षणात कोणतीही कसर झाली नाही. माझे प्राथमिक शिक्षण नाशिकमधील नवभारत शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण पेठे विद्यालय अन् उच्च माध्यमिक शिक्षण वाणिज्य शाखेतून बीवायके ला केले. पुढे व्यावसायिक दृष्टिकोनातून वकिली करण्याचा निर्णय घेतला अन् एनबीटी लॉ महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि वकिली शिक्षण सुरू केले. नाशिकमध्ये सी.डी. कुलकर्णी यांच्याकडे 2007 ते 2010 पर्यंत जुनिअरशिप केली.

पुढे घरच्यांना हातभार लागावा म्हणून नाशिकच्या डेटामॅटिक्स या कंपनीत ‘लिगल अ‍ॅनालिसिस’ म्हणून काम केले. काही दिवसांनी कंपनीत मन रमत नसल्याने पुन्हा वकिलीला सुरुवात केली. पुन्हा कुलकर्णी सरांकडे प्रॅक्टिस करण्यास सुरुवात केली. 3 जुलै 2007 रोजी मी वकील झालो अन् 7 जुलैला पहिली केस हातात आली आणि खर्‍या अर्थाने वकिलीला सुरुवात झाली. दिवाणी स्वरुपाचे खटले चालवण्यास प्रारंभ केला. परिणामी त्या क्षेत्रात आवड निर्माण झाल्याने पुढे दिवाणीतच वकिली करण्याचा निर्णय घेतला. पहिली केस घेतली असताना खर्‍या अर्थाने वकिली काय असते, तिचे महत्त्व, आजच्या घडीला लोकशाहीला कशी तारक आहे या गोष्टी लक्षात आल्या.

वकिली व्यवसाय म्हणण्यापेक्षा ते एक व्रत आहे, असे मला वाटते. त्यामुळे आजतागायत मी चांगल्याप्रकारे ते व्रत पार पाडत आहे. वकिली व्यवसायात वावरत असताना अनेक माणसांचे चेहरे नजरेभोवती असतात. त्यांच्या चेहर्‍यावरून त्यांची आर्थिक अवस्था समजते. त्यांचा चेहरा वाचता येतो. त्यामुळे कदाचित वकिलीमध्ये वाचनाला अधिक महत्त्व दिले आहे. त्यामुळे मी वाचनावर अधिक भर देत असतो. वकिली शिकता शिकता मी वकिली ज्या ठिकाणी शिकलो त्या एनबीटी कॉलेजमध्ये गेस्ट लेक्चरर म्हणून जात असतो. त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचे समाधान मला यातून मिळते.

वकिली व्यवसायात प्रत्येक दिवस हा वेगळा अनुभव देऊन जात असतो. नव्या संकल्पना, नवी माणसे, असंख्य विचार यातून वकिली घडत असते. त्यामुळे सुरुवातीपासूनच मला यातून अनेक गोष्टी शिकावयास मिळाल्या. एकदा फौजदारीच्या संदर्भात एक केस आली होती. त्यावेळी दोघांचा युक्तिवाद झाल्यावर असे लक्षात आले की या केसमध्ये खोटी तक्रार करण्यात आली होती. परंतु या गोष्टी तेव्हा लक्षात आल्या जेव्हा आम्ही या केसचा उलट तपास केला. त्यामुळे अशा केसेस हाताळताना या बाबी लक्षात ठेऊन आम्ही काम करत असतो.

नुकताच आम्ही मित्रांच्या माध्यमातून बुक रीडिंग नावाचा उपक्रम सुरू केला आहे. तसेच दर रविवारी आम्ही न्यायनिवाड्याचे वाचन करीत असतो. त्यास ‘बेअर अ‍ॅक्ट रीडिंग’ असे म्हणतात. वकिली व्यवसाय करीत असताना सामाजिक कार्यास वेळ देता येत नाही.परंतु माझ्या वाढदिवसाच्या दिवशी एक रोपटे लावत असतो. त्याची वाढ करीत असतो. घरातील इतरांचे वाढदिवस असल्यास त्यांच्याही नावाने रोपटे लावतो. तसेच रक्तदान शिबिरे भरवून अप्रत्यक्षरीत्या समाजाचे काम करीत असतो. मागील वर्षी नाशिक बार असोसिएशनच्या निवडणुकीसाठी मी सदस्य पदाचा उमेदवार होतो. त्यानिमित्ताने वकिली व्यवसायातील बारकावे चांगल्या पद्धतीने लक्षात आले. सध्या मी नाशिक तसेच निफाड व सिन्नर तालुका कोर्टात प्रॅक्टिस करीत असून यापुढे आणखी चांगल्या पद्धतीने काम करण्याचा मानस आहे.

( शब्दांकन : गोकुळ पवार )

LEAVE A REPLY

*