नाशिक । सॉफ्टवेअरमधील ‘गरुडझेप’ : सोहम गरुड (स्टार्ट अप्स)

0

नाशिकमध्ये शालेय शिक्षण घेतलेल्या एका मुलाचे कार्यक्षेत्र दहावीनंतरचे ठरते. दहावीनंतर गॅप घेऊन एक वर्ष जर्मनीत राहिल्यावर हा मुलगा देश-परदेशात सॉफ्टवेअर क्षेत्रातले ज्ञानाचे आणि अनुभवाचे इमले चढत जातो. पण नाशिक आणि मायभूमीसाठी कर्तृत्व दाखवण्यासाठी आस त्याला स्वस्थ बसू देत नाही आणि त्यातून दहा नेटवर्किंग प्रोग्रॅम्स सामावणारे ‘डिगमीअप’ हे फेसबुकसारखे वापरता येणारे मोठे नेटवर्क उभे राहते. सोहं गरुड हे नाव भविष्यात नाशिकचा युथ आयकॉन ठरेल यात शंका नाही.

लहानपणी स्वप्नातही वाटले नव्हते, आपण सॉफ्टवेअर क्षेत्रात काहीतरी वेगळे करून दाखवू. पण संधी मिळत गेल्या, तशी आवड निर्माण होत गेली. सॉफ्टवेअर, संगणक कोडिंग, प्रोग्रॅमिंगमधले संशोधन हे माझे कार्यक्षेत्र कधी झाले ते कळलेच नाही. मी मूळचा नाशिकचा. बाबा सीए तर आई आर्किटेक्ट आहे. दहावीपर्यंतचे शिक्षण इथेच झाल्यावर रोटरी इंटरनॅशनलच्या ‘स्टुडंट एक्चेंज प्रोग्रॅम’ अंतर्गत एक वर्ष जर्मनीला गेलो. खरे तर हा सांस्कृतिक देवाणघेवाणीचा प्रश्न असतो; पण आपल्याला हवे ते तिथे शिकता येते. मला संगणक आणि सॉफ्टवेअरमध्ये रस होता, तसेच जर्मनी हे जागतिक सॉफ्टवेअर हब असल्याने मी तिथे त्या गोष्टी अधिक शिकलो. प्रोग्रामिंग कोडिंग याही गोष्टींचा त्यामध्ये समावेश होतो. जर्मनीतला वर्षभराचाच पण समृद्ध अनुभव घेऊन नाशिकला परतलो.

अकरावी- बारावी नाशिकमध्ये शिकलो. त्यानंतर चार वर्षे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग करण्यासाठी मुंबईला गेलो. दहावीनंतरच्या अनुभवाने माझे क्षेत्र मी आधीच निवडले होते. सौमय्या महाविद्यालयात संगणक अभियंत्याचे शिक्षण घेऊन परत पाच वर्षे अमेरिकेला गेलो. तिथे पुढचे शिक्षण म्हणजे मास्टर्स डिग्री घेतली. त्यानंतर कॅलिफोर्नियामधील बे एरियामध्ये आरोग्याशी संबंधित काम करण्याची संधी मिळाली. तो अनुभव फारच विलक्षण होता. माझा छंद आणि व्यवसायही सॉफ्टवेअरशी संबंधित झाला. अमेरिकेसारख्या देशात पुढे राहण्याच्या अनेक संधी होत्या. पण माझे नाशिक, माझा देश मला खुणावत होता. माझ्या घरापासून मी कितीतरी काळ लांब होतो. कुटुंबियांना भेटण्याची आस आणि माझ्या शहरातच वेगळे काही करून दाखवण्याची संधी यामुळे 2015 मध्ये नाशिकला परतलो. आता माझ्यापाशी डिग्री आणि अनुभवाची मोठी शिदोरी होती. आणि कुटुंबासमवेत रमायलाही मिळणार होते. देशात, परदेशात कमी वयातच घरापासून लांब राहिल्यामुळे जास्त ओढ वाटत होती.

सुरुवातीचे एक वर्ष मी स्टार्ट अपची सेवा देण्याचे काम केले. हे वैयक्तिक पातळीवरचे होते. लोकांची अ‍ॅप्स किंवा संकेतस्थळे विकसित करून द्यायचा तो व्यवसाय होता. नंतर मी ‘प्रॉडक्ट बेस्ड स्टार्ट’अपमध्ये काम करायचे ठरवले. ‘डिगमीअप’ हे सोशल नेटवर्क तयार केले. हे नेटवर्क फेसबुकसारखे काम करते; पण फेसबुकसारखे मर्यादित नाही. यामध्ये माझी सहनिर्माती देवयानी लाटे हिचेही मोलाचे योगदान आहे. तिचे शिक्षण इटलीला झाले आणि नंतर काहीतरी करण्याच्या उद्देशाने तीही भारतात परतली. हा आमच्यामध्ये समान दुवा होता.

हे नेटवर्क तयार करायला दीड वर्ष इतका कालावधी लागला. तसेच ते डिझाइन करायला आमच्यातली सर्व कौशल्ये आम्ही पणाला लावली आहेत. आता आमच्यासोबत सहा जणांची टीम काम करते आहे. सगळ्या गोष्टी एकाच अ‍ॅपमध्ये मिळतील अशी यामागची संकल्पना आहे. हे अ‍ॅप अँड्रॉइडसाठीही तयार केले आहे. यामध्ये फेसबुक, लिंक्डइन, ट्विटरसारखे एकशे दहा नेटवर्क तयार केले आहेत, ते तुम्ही या एका अ‍ॅपद्वारे ऑपरेट करू शकता. त्यामुळे एखाद्याला व्यवसायाची जाहिरात करणे लोकांना सहज शक्य होईल. एकाच वेळी अनेक व्हर्चुअल ठिकाणांची माहिती समजेल. त्यामुळे भरपूर वेळ वाचेल. म्हणजे आता आपल्याला फेसबुक बंद करून लिंक्डइन चालू करावे लागते. त्यातल्या नोंदी तपासाव्या लागतात. त्यात वेळ जातो. पण आमच्या ‘डिगमीअप’ या नेटवर्कमुळे सर्व गोष्टी एकाच ठिकाणी समजतील. त्यासाठी 10-15 अ‍ॅप डाऊनलोड करावी लागणार नाहीत. कमीतकमी वेळात जास्तीत जास्त देण्याच्या ध्येयातून हे काम उभे राहिले आहे.

या नेटवर्कचे लाँचिंग खासगी स्तरावर केले होते; उद्देश एकच होता, त्यातल्या त्रुटी समजाव्यात. फीडबॅक मिळाल्यावर आता त्यात सुधारणा करत आहोत. महिनाभराच्या आतच हे नेटवर्क सर्वांसाठी खुले करणार आहोत. नवीन काहीतरी करण्याच्या ऊर्मीमुळे हे साध्य होतेय, याचा आनंद होतोय. नाशिककरांना अभिमान वाटेल, असेच वेगळे काही देण्याचा नेहमी प्रयत्न राहील.

(शब्दांकनः शिल्पा दातार-जोशी )

पुढील अंकात : पंकज घाडगे

LEAVE A REPLY

*