नाशिक । पर्यटकांना आवडलेले ‘जस्ट नाशिक’ : ओंकार वाळिंबे (स्टार्ट अप्स)

0

टुरिस्ट गाईडच्या पलीकडचेही नाशिक आहे आणि ते अधिक सुंदर आहे, हि माहितीच नाशिककर किंवा बाहेरील लोकांना नव्हती. ती देण्यासाठी ओंकार वाळिंबे यांनी ‘जस्ट नाशिक डॉट कॉम’ हे संकेतस्थळ सुरु केले.

माझा जन्म पुण्याचा; पण सर्व शिक्षण नाशिकमध्ये झाले. वेबसाईट डेव्हलपमेंटची आवड होती. एमसीए केले. शिकत असतानाच मी आणि तीन मित्रांनी छंद म्हणून अ‍ॅप सुरू केले. तेव्हा शिकत असल्याने कुटुंबाच्या जबाबदार्‍या नव्हत्या. आवड आणि अनुभव असल्याने आवडत्या कामाचे प्रयोग सुरू केले. त्यावेळी तो आमचा व्यवसाय नव्हता, फक्त एक वेगळा उपक्रम होता. मी तांत्रिक गोष्टी बघायचो, एक उत्तम छायाचित्रकार, एक लिहिणारा आणि एक मार्केटिंगमधला तज्ज्ञ होतो. खरे तर हे सुरू करण्यामागे आणखीही काही कारणे होती.

नाशिकबद्दल पर्यटकांना ठराविक गोष्टींपलीकडे काहीच माहीत नसते. नाशिकमधील प्रसिद्ध नसलेल्या पण चांगल्या दर्जाच्या तीन-चार रेस्तराँची नावे सांगा, असे कुणी विचारल्यावर द्यायला ठराविक नावापलीकडे उत्तरे नसायची. या भूमीत अशा कितीतरी गोष्टी आहेत, ज्या त्यांना आवडू शकतात. विद्यार्थिदशेत असल्याने पॉकेटमनीवरच काम चालायचे. हा उपक्रम लेखी माध्यमात करणे शक्य नव्हते. त्यामुळे आम्ही अशा गोष्टींची माहिती अ‍ॅपच्या माध्यमातून द्यायचे ठरवले. अ‍ॅप किंवा वेबसाईटवरील माहिती लोक जगाच्या कानाकोपर्‍यातून पाहू शकतात; त्याला जागेचे बंधन नसते.

त्याचा वापर करायचे ठरवले. आंतरजालाची ही क्रांती सकारात्मकदृष्ट्याही चांगली ठरते, ती अशी! आम्हाला वाटले होते, हे फक्त नाशिकमधलेच लोक पाहतील. पण ज्यावेळी आमचे अ‍ॅप आणि वेबसाईट देश-परदेशातल्या लोकांनी पाहिले, तेव्हा त्यांच्याकडून प्रतिक्रिया आल्या, ‘हे नाशिक आम्हाला माहीत नव्हते, ते तुम्ही दाखवलेत’. त्यानंतर हुरूप वाढला आणि व्यावसायिकदृष्ट्या यात उतरायचे ठरवले. आमचा अस्तित्वाचा झगडा विद्यार्थिदशेतच संपल्यामुळे नंतर या उपक्रमासाठी फार अडचणी आल्या नाहीत.

कॉलेजचे शिक्षण संपले आणि माझे मित्र व्यवसाय-नोकरीच्या निमित्ताने देश-परदेशांत स्थलांतरित झाले. मी नाशिकमध्ये राहून हे काम चालू ठेवायचे ठरवले. त्याकाळी वेबसाईट ही संकल्पना सर्वसामान्यांच्या परिचयाची नव्हती. 2013-14 साली ‘फूड, इव्हेंट्स व लाईफस्टाईल’ या तीन सेगमेंटमध्येच ‘जस्ट नाशिक डॉट कॉम’च्या माध्यमातून काम करायचे ठरवले. त्याची वेगळी जाहिरात केली नाही. सोशल मीडिया आणि डिजिटल मार्केटिंग केले. मी आता तांत्रिक बाजू सांभाळतो आणि चिन्मय उत्कृष्ट फोटो काढतो. दृश्य आणि लेखन या दोन्हीचा चांगला परिणाम साधला जातो.

नाशिकमध्ये घडणारे कार्यक्रम बरेचदा नाशिककरांनाच माहीत नसतात; त्यांचेही अपडेट्स देत राहायचा निर्णय घेतला. या अ‍ॅपवर एखाद्या गोष्टीची फक्त ठिकाण, नाव, दूरध्वनी क्रमांक इतकीच सीमित माहिती नसते, तर चारशे शब्दांचा लेख छायाचित्रासहित प्रसिद्ध केला जातो. हे करत असताना, आम्ही प्रसिद्ध करणार असलेल्या ठिकाणाच्या विश्वासार्हतेची तीन -चार वेळा खात्री करून घेतो. उदा. एखाद्या रेस्तराँविषयी लेख आणि फोटो प्रसिद्ध करण्याआधी रीतसर त्यांचे व्यवस्थित पैसे देऊन ते चांगले असल्याची खात्री करून घेतो, त्यानंतर वेबसाईटवर प्रसिद्ध केल्यावरच ते त्यांना कळते. त्यांच्याकडून प्रसिद्धीचे पैसे घेत नाही. आम्ही वाचकांना आमचे अनुभव सांगतो. नाशिकमध्ये देश-परदेशातून पर्यटक येतात, त्यांना इथली निसर्गरम्य ठिकाणे, तसेच नाणे संग्रहालय, जुनी वाचनालये, रामशेज किल्ला, पहिला चित्रपट, गारगोटी संग्रहालय यांबद्दलही उत्कंठा वाटू शकते, ते सर्व आम्ही उपलब्ध करून देतो. चांगले लिहिणार्‍या व्यक्तींना इथे मानधनासहित लिहिते केले जाते. एखाद्या मुलीला फॅशनविषयी लिहायचे असेल, तर ती इथे लिहू शकते, एखाद्याला चांगल्या उपाहारगृहाविषयी लिहायचे असेल, तर त्यांनाही संधी आहे. तसेच अनेक धडपड करणारे व्यावसायिक आहेत, ज्यांच्याकडे पैसा आणि प्रसिद्धीही नाही, अशा लोकांवरही इथे विनामूल्य मी लेख लिहितो.

आता आमच्याकडे ‘डाटा बँक’ तयार झाली आहे. नाशिकबाहेरील लोकांनी ‘फेमस फूड’ असे इंटरनेटवर शोधल्यावर त्यांना आमची साइटवरच्या क्रमांकावर दिसते. सध्या आमच्याकडे शंभरेक रेस्तराँची माहिती असेल. तसेच फॅशनबद्दलही मजकूर दिसतो. नाशिकमधला प्रत्येक इव्हेंट सेकंदासेकंदाला अपडेट होते. गटारी अमावास्येच्या काळात नाशिकमधील पाच चांगली मांसाहारी हॉटेल्स किंवा श्रावणात पाच चांगली शाकाहारी हॉटेल्स यांची माहिती ऋतुमान, सणवार किंवा इतर औचित्याच्याप्रसंगी इथेच मिळते.

तुम्हाला वाटेल, इतक्या चांगल्या सेवा मी मोफत कसा देतोय? किंवा अप्रत्यक्षरीत्या जाहिरात करूनही कुणाकडून पैसे का घेत नाही? पण त्याचे उत्तर ‘अ‍ॅडव्हर्टोरियल’ हे आहे. ज्यांना आपले उत्पादन बाजारात आणायचेय आणि तसा चांगला पैसाही आहे, अशा लोकांच्या जाहिराती दिल्या जातात. त्यात दूरध्वनी क्रमांकासहित माफक माहिती असते. महिन्याला 50 हजार लोक या संकेतस्थळाला भेट देतात, त्यातून ग्राहक आणि व्यावसायिक जोडलेही जातात.

नाशिकहून बंगळुरूला स्थायिक झालेले अनेक जण आहेत; त्यांचा आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळतोय. आमचे ऑनलाईनवरचे नाशिक त्यांना खूप सुखावतेय. ते म्हणतात, ‘आम्हाला तुमच्यामुळे नाशिकच्या घडामोडी चांगल्या प्रकारे समजताहेत. पुणे-मुंबई इथेही हा प्रयोग करून पाहिला; पण आर्थिकदृष्ट्या मोठे पाठबळ हवे, असे वाटले. भविष्यात जयपूर, कोची, इंदूर अशा ठिकाणी असे मॉडेल विकसित करण्याचा विचार आहे. सगळे काम ऑनलाईन असल्याने तिथे वेगळा सेटअप न करता इथूनच काम करता येईल. पण त्यासाठी हवी आहेत, प्रामाणिक माणसे!

( शब्दांकनः शिल्पा दातार-जोशी )

पुढील अंकात- सोहम गरुड

LEAVE A REPLY

*