नाशिक । समाज जाणीवांचे ‘युवा अस्तित्व’ : किरण पाटील ( समाजकारण )

2

शिक्षणाची आस असणार्‍या आदिवासी पाड्यावरील मुलांना नवे दफ्तर, वह्या-पुस्तके भेट दिल्यानंतर त्यांच्या चेहर्‍यावर फुलणारे निरागस हास्य, रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना रक्त मिळाल्यानंतरचा आनंद, नोकरीसाठी  वणवण भटकल्यानंतर छोट्या मदतीमुळे तरुणांना नोकरी मिळाल्यानंतरचा हर्ष आणि रस्त्यावर थंडीत कुडकुडणार्‍या वयोवृद्धांच्या अंगावर अनाहुतपणे ब्लँकेट पडते, तेव्हा मिळणारी उब जेव्हा मी पाहतो तेव्हा तो माझ्यासाठी जगातील सर्वोच्च पुरस्कार असतो. तरुणाईने अशा पुरस्कारांचा आनंद अनुभवला पाहिजे.

माझ्या शिक्षक वडिलांकडून सामाजिक कार्याची प्रेरणा मिळाली. ज्या गोष्टी विनासायास मिळाल्या त्या वंचित समाजातील मुलांनी कधीच पाहिल्या नाही, ही जाणीव शालेय जीवनातच झाली. पण शिक्षणातून स्वावलंबन आणि अर्थाजन करून त्यातील काही भाग जिथे अंधार आहे, तिथे दिवा लावण्यासाठी खर्च करायचा, असे भान वडिलांनी दिले. ते बाळकडू घेऊन सोशल माध्यमांवर प्रथम ‘युवा अस्तित्व’ नावाचा ग्रुप तयार केला आणि समाजभान जपण्याचा प्रयत्न सुरू झाला. ‘सोशल’ माध्यमांतून तरुणाई, अधिकारी, डॉक्टर यांच्याशी संवाद सुरू झाला आणि सामाजिक उपक्रमाचा श्रीगणेशा केला. त्यावेळी या संस्थेची नोंदणी केली नव्हती. मात्र, कार्याला कायदा, नियमांचे अधिष्ठान असावे म्हणून ‘युवा अस्तित्व फाऊंडेशन’ची मुहूर्तमेढ रोवली.

त्र्यंबक रोडवरील अनाथ बालकाश्रमातील शाळेत पहिल्यांदाच उपक्रम राबवला. चार मुलांना घेऊन सुरू झालेली युवा फाऊंडेशन कार्यातून आपले काम समाजासमोर मांडू लागलो आणि एक एक करत माणसे जोडली गेली. संस्थेच्या माध्यमातून आदिवासी पाड्यावरील आश्रमशाळेसह इतर शाळेत साहित्य, पावसाळ्यात रेनकोट वाटपाचे उपक्रम घेत गेलो. गरीब, गरजू मुले केवळ पैसा नसल्यामुळे शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून त्यांना आर्थिक मदत करणे, थंडीच्या दिवसांत रस्त्यावरील भिकारी, गरिबांना ब्लँकेटचे वापट, पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण, पक्ष्यांसाठी कृत्रिम घरटे लावणे, उन्हाळ्यात दाणा-पाण्याची सोय करणे यासह होतकरू, मुलांना नोकरीसाठी संदर्भ घेऊन मुलाखतीपर्यंत मदत करत गेलो. इतकचे नव्हे तर नोकरी लागल्यानंतरही त्यांना हव्या त्या गोष्टीत मदत करण्याचा आमचा प्रयत्न असतो. महिला सक्षमीकरण उपक्रमांतर्गत मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देणे असे उपक्रम संस्थेच्या माध्यमातून राबवत आहोत.

संतोष वैद्य यांच्या सुख, समृद्ध केअर सेंटरच्या मदतीने आजवर आम्ही रस्त्यावरील 15 हूून अधिक मनोरुग्णांना कर्जत येथील ललवाणी यांच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करतो. एकदा सिव्हिल हॉस्पिटलजवळ एक वयोवृद्ध मनोरुग्ण महिला विपन्नावस्थेत वस्त्रहीन होऊन पडल्याची माहिती मिळाली. तिला हॉस्पिटलला घेऊन जाणे, हे मोठे आव्हान होते. त्यावेळी आम्ही जो अनुभव घेतला, तो अत्यंत आव्हानात्मक होता. कारण अशा रुग्णांना कसे ‘हॅण्डल’ करावे, कुठे न्यावे, काही त्रास झाल्यास काय करावे, याची काहीच माहिती नव्हती. त्या सर्व गोष्टींवर मात करून आम्ही त्या मनोरुग्ण महिलेला रुग्णालयात दाखल केले. पुढे कर्जत मनोरुग्णालयात दाखल करत तिचे पुनर्वसन केले. काही काळातच ती महिला नंतर पूर्णपणे बरी झाली आणि वर्षभरातच त्यांनी आमच्याशी संवाद साधला, असे अनेक प्रसंग आम्हाला समाधान देऊन गेलेत.

मालेगावजवळील जळगाव येथील एका मुलीला रक्ताचा कर्करोग झाला होता. तिला रक्ताची गरज होती. ‘युवा अस्तित्व’ ने याकामी पुढाकार घेत सोशल माध्यमांतून रक्तदात्यांना आवाहन केले आणि अल्पावधीतच इतका प्रतिसाद मिळाला की, रक्तपेढीची रक्तसाठवण क्षमतेपेक्षा जास्त रक्त संकलित झाले होते. त्यानंतर त्या चंद्रमोैळी घरात राहणार्‍या कुटुंबाने आमच्या ‘टीम’ला घरी आमंत्रित करत भोजनाचा आस्वाद दिला. आमचा शाल आणि श्रीफळ देऊन केलेला सत्कार आमच्यासाठी जगातील ‘सर्वोच्च पुरस्कार’ होता.

आजवर आम्ही 3 हजारहून अधिक लोकांपर्यंत संस्थेच्या माध्यमातून पोहोचलो आहोत. नवीन लोकांना संस्थेचा सदस्य म्हणून स्वीकारत नाही. त्यांना कामाचे स्वरुप समजावून देऊन मग आम्ही मदत, निधी स्वीकारतो. प्रारंभीच्या काळात किशोर पाटील, मिनाद लेवे, राहुल बच्छाव या चार मित्रांमुळे मी ‘युवा अस्तित्व’ निर्माण करू शकलो.

माझे वडील माणिक व आई शोभा पाटील तसेच युवा अस्तित्व फाऊंडेशनमधील प्रत्येक 42 सदस्यांमुळे मला समाजसेवा करण्याचे समाधान मिळत आहे. त्यामुळे ‘युवा अस्तित्व’ टिकून आहे. आजवर माझ्या कार्याची दखल घेऊन अनेक पुरस्कार मिळाले आहे. मात्र, आदिवासी पाड्यांवर शिक्षणाची आस धरणार्‍या मुलांना नवे दफ्तर, वह्या-पुस्तके भेट दिल्यानंतर त्यांच्या चेहर्‍यावर फुलणारे निरागस हास्य, रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना रक्त मिळाल्यानंतरचा आनंद, नोकरीसाठी वणवण भटकल्यानंतर छोट्या मदतीमुळे तरुणाला मिळालेल्या नोकरीचा आनंद आणि थंडीत कुडकुडणार्‍या वयोवृद्धांच्या अंगावर अनाहूतपनणे ब्लँकेट पडते तेव्हा मिळणारी ‘मायेची उब’ जेव्हा मी पाहतो, तेव्हा मला त्या प्रत्येक क्षणात जगातला ‘सर्वोच्च पुरस्कार’ मिळत असतो.

आज वृद्धाश्रमातील वयोवृद्धांचे हाल पाहून मला भरून येते. जिथे आई-वडिलांना देव मानले जाते, तिथे वृद्धाश्रमाची गरजच काय? हा प्रश्न मला छळतो. त्यामुळे भविष्यात वृद्धासाठी आश्रम नव्हे तर मायेची उब देणारे घर करण्याचा माझा मानस आहे.

तरुणांनी मौजमजा, एशोआराम सर्व गोष्टी कराव्यात, मात्र त्यातला काहीवेळ समाजोपयोगी कार्यासाठी नक्कीच काढला पाहिजे. नोकरीतून मिळणार्‍या समाधानापेक्षा अशा कार्यातून मिळणारे समाधानाची किंमत पैशांपेक्षा अधिक असते. ‘युवा अस्तित्व फाऊंडेशन’चे कार्य सर्वदूर पोहोचवत महाराष्ट्रात तरुणाईची फौज उभी करायची आहेे. इतकेच नव्हे तर युवांचे अस्तित्व देशव्यापी करण्याचा माझा मानस आहे.

(शब्दांकन : नील कुलकर्णी)

पुढील अंकात – हर्षवर्धन देवधर ( स्टार्ट अप्स )

2 प्रतिक्रिया

  1. अप्रतिम किरण …आम्हाला तुझा अभिमान आहे
    पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा 🌷🌷🌷

LEAVE A REPLY

*