नाशिक । ‘कृतिशील’ शिक्षणाने राष्ट्रनिर्माण : सचिन जोशी ( शिक्षण )

1

‘घोका आणि ओका’ शिक्षणपद्धती बंद होऊन कृतिशील शिक्षणानेच विद्यार्थ्यांचा पर्यायाने राष्ट्रविकास होणार आहे. टेक्नॉलॉजीवर आधारित ‘व्हर्च्यूअल’ शिक्षणाला माझा विरोध आहे. गरीब मुलांना तंत्रज्ञान आणि दृक-श्राव्य माध्यमातून आधुनिक टेक्नॉलॉजीने शिक्षण द्यावे तर शहरी मुलांना कृतीतून शिक्षण असावे. अशा शिक्षणातून अधिकाधिक सर्जनशील आणि सामाजिक संवेदना असलेले सुजाण नागरिक नव्हे तर ‘माणूस’ तयार करणे माझे ध्येय आहे.

पुण्याला कायद्याचे शिक्षण घेताना पु. गो. वैद्य यांच्या ‘नापासांची शाळा’ या संस्थेत समुपदेशनाची संधी मिळाली. त्यातून अध्यापन, शिक्षण क्षेत्रात रस वाढला. वयाच्या 24 व्या वर्षी पहिल्यांदा पूर्व प्राथमिक पहिली शाळा सुरू केली. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात दहावीच्या विद्यार्थ्यांना व्याख्यान देऊ लागलो. ‘ग्रीन इंडिया’ शाळेतून नाशिकमध्ये शिक्षण क्षेत्रात उतरलो. काही तांत्रिक कारणास्तव ही शाळा बंद झाली. मात्र, त्यावेळी ग्रीन इंडियामध्ये शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या पालकांनी ‘तुम्ही शाळा सुरू करा, आमची मुले तुमच्याकडेच शिकतील’ असा विश्वास मला दिला. मटाले मंगल कार्यालयात नाशिकमधील पहिली शाळा 2010 साली ‘द इस्पॅलिअर स्कूल’ नावाने सुरू झाली. माझे शिक्षण अत्यंत सामान्य शाळेमध्ये झाले आहे म्हणून मी एक चांगली शाळा काढू शकलो.


इंग्रजी माध्यमातून उपक्रमशील शिक्षण काढणारे आम्ही ‘पायोनिअर’ ठरलो. एकेकाळी दीडशे विद्यार्थ्यांना घेऊन सुरू झालेला शिक्षणाचा यज्ञ अवघ्या दहा वर्षांत अकराशे विद्यार्थ्यांवर पोहोचला आहे. उपक्रमशील शिक्षणात पारंपरिक अभ्याक्रमातील शिक्षणासह स्त्री-पुरुष समानता प्रत्यक्ष विद्यार्थ्यांमध्ये रुजावी, यासाठी प्रत्येकांच्या नावामध्ये वडिलांसह आईचे नाव टाकण्याचा पहिला प्रयोग आम्ही केला. अगदी आधार कार्डमध्येही विद्यार्थ्यांनी आईचे नाव नोंदवले. रहदारीचे नियम बालपणापासूनच रुजावे, यासाठी दुचाकी मोटारसायकलचे नियम सायकलसाठी तयार केले.

‘आरटीओ’कडून सायकलचा परवाना काढणारा भारतातील पहिला उपक्रम म्हणून आमच्या शाळेचे नाव आहे. अंबर चरख्यावर विद्यार्थ्यांनी सूत कताई करून 55 मीटर कापड तयार केले. शेतीची माहिती मिळावी म्हणून विद्यार्थ्यांना शेतीत नेऊन तांदूळ लावण्याची अनुभूती दिली. गोविंद पानसरे यांच्या पुस्तकांवर आधारित ‘शिवाजी विदीन मी’ हे सहा तासांचे महानाट्य विद्यार्थ्यांनी तयार केले. गोदावरीतून शेवाळे काढणारी सायकल विद्यार्थ्यांनी तयार केली. असे एकूण सहाशे प्रयोग आम्ही करून घेतले. आमच्या विद्यार्थ्यांना सायकल चालवण्याचा परवाना दिला. भूत नसते, हे सांगण्यासाठी विद्यार्थ्यांना अमावस्येच्या रात्री स्मशानभूमीला भेट देऊन भीती दूर केली.

सामाजिक संवेदना आणि ‘क्रियेटिव्ह कोशंट’ हे आमच्या उपक्रमशील शिक्षणाचे मुख्य ध्येय तसेच ‘यूएसपी’ आहे. शाळेचा 50 टक्के शिक्षणक्रम संगीत वापरुन रेकॉर्ड केला आहे. 20 टक्के नाटकामधून तर 20 टक्के कृतिशील उपक्रमातून विद्यार्थ्यांना शिकवले जाते. शाळेचा स्वत:चा रेकॉर्डींग स्टुडिओ आहे.
दरम्यान, ‘स्वदेश’ चित्रपट पाहून शाहरुख खानची ‘व्हॅन’ पाहून मला ‘फिरती शाळा’ ही कल्पना सुचली. झोपडपट्टीत राहणार्‍या मुलांना शाळेत ने-आण करण्यासाठी कुणीही उपलब्ध नसते. आई-वडील कामावर जातात. त्यामुळे ते शिक्षणापासून वंचित राहतात. शाळाच अशा मुलांपर्यंत गेली पाहिजे, अशी अत्यंतिक जाणीव मला झाली आणि त्यातून ‘एज्युकेशन ऑन व्हिल’ संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. भारतातील पहिली फिरती शाळा काढून झोपडपट्टीतील साडेपाच हजार मुलांना मुख्य प्रवाहात आणू शकलो, याचे मला समाधान वाटते. याची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्येही झाली. या कार्याबद्दल ज्येष्ठ विचारवंत संदीप बासलेकर यांनी भेट घेत गौरवोद्गार काढले.

दरवर्षी झोपडपट्टीतून किती मुले गुन्हेगार आणि शार्पशूटर होतात, याबद्दल माहिती देऊन ते म्हणाले, सचिन तू साडेपाचशे मुले गुन्हेगार होण्यापासून वाचवले. त्यातले पाचजण शार्पशूटर होण्यापासून वाचले यापेक्षा मोठे काम कुठले असू शकेल? त्यावेळी बासलेकर यांची ही प्रतिक्रिया मला सुखावून गेली. झोपडपट्टीत शाळाबाह्य मुले कशी शोधावी याचा अभ्यास, सर्व्हे करून मी त्याचा विस्तृत अहवाल तयार करून मी शासनाला दिला आहे. नाशिक मनपा हद्दीतील 133 झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन तेथील शाळाबाह्य मुले शोधण्याचे काम आम्ही करत आहोत. मालेगावचे असेच काम आम्हाला मिळाले आहे. पेठ रोडवरील सय्यद कम्युनिटीमध्ये जाऊन तिथल्या मुलांना शिकवण्याची संधी मला फिरत्या शाळेच्या माध्यमातून मिळाली. गेल्या 2 वर्षांपासून आम्ही हे काम करत असून तेथील अनेक बालविवाह होण्यापासून वाचवले. याशिवाय अनेक बालविवाह रोखले आहे.

वारांगणाच्या मुलांना शाळेत शिक्षण घेताना अपमानाची वागणूक मिळते म्हणून अशी मुले शाळा सोडतात. या मुलांची नावे बदलून त्यांना मुख्य प्रवाहातील आश्रमशाळेत आणण्याचे काम आमच्या संस्थेने केले. ‘रेड लाईट’ एरियातील सुमारे 17 ते 20 महिलांनी त्यांची नावे बदलून आपल्या मुलांना शाळेत टाकले आणि सरकारी योजनाचा लाभ घेतला. भिकार्‍यांच्या 17 मुलांना आम्ही नवी ओळख देऊन शाळेच्या-शिक्षणाच्या वाटेवर आणले.

फ्रान्स येथे झालेल्या युरोपीयन पार्लमेंटमध्ये ‘लोकशाही आणि शिक्षण’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत 17 मिनिटांचे भाषण देण्याची संधी मिळाली. हा अत्यंत आनंददायी अनुभव होता. उपक्रमशील शिक्षणावर दोन पुस्तकेही लिहिली आहेत.
‘मेंदू आधारित शिक्षण पद्धती’ यावरील प्रबंध ‘बीएड’ शिक्षणक्रमातही अंर्तभूत केला गेला. शिक्षण क्षेत्रात काम करण्यार्‍या तरुणांना दिला जाणारा ‘एज्यू युरो अ‍ॅवॉर्ड’ही मला मिळाला आहे. आमच्या शाळेवर संशोधन करण्यासाठी देश-विदेशातून अनेक शिक्षकतज्ञ येत आहेेत. स्व. डॉ. भीष्मराज बाम आणि श्याम मानव यांना मी गुरू मानतो. शिक्षण क्षेत्रातील प्रयोग हा माझा जगण्याचा भाग झाला आहे. तरुणांना त्यांच्या क्षेत्रातील संपूर्ण माहिती आणि सर्व क्षेत्रातील थोडी माहिती हवीच, हा माझा संदेश आहे.

(शब्दांकन : नील कुलकर्णी )

पुढील अंकात – किरण पाटील ( समाजकारण )

 

1 COMMENT

LEAVE A REPLY

*