नाशिक । समाजोत्कर्षासाठी ‘ज्ञान’यज्ञ : वैशाली पवार ( शिक्षण )

0

छोट्या शहरातील मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून सुरू केलेल्या आमच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्कूलमध्ये आज मालेगाव आणि आसपासच्या खेड्यातील शेतकरी, श्रमिक, कामगारांची मुले चांगले शिक्षण घेत आहेत. शिक्षणाने समाज, देश अधिक झपाट्याने विकसित होतो. सशक्त राष्ट्राच्या निर्मितीसाठी उद्याचे सक्षम नागरिक घडावेत म्हणून शिक्षणातून समाजोन्नतीचा आमचा यज्ञ सुरूच राहिल.

मालेगावसारख्या ठिकाणी शिक्षणासाठी परिपूर्ण संस्था नसल्यामुळे माझ्या मुलांना इतर शहरात शिकण्यासाठी पाठवावे लागले. मालेगावकरांना चांगले शिक्षण गावातच मिळावे, यासाठी शैक्षणिक संस्था काढून आपणच शिक्षणाचा यज्ञ सुरू करावा, असे वाटले आणि त्यातूनच दाभाडी येथे सन 2010 मध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल स्कूलची मुहूर्तमेढ रोवली.
प्रारंभी आम्ही एसएससी बोर्डाचा शिक्षणक्रम आणि नंतर सीबीएससी अभ्यासक्रम सुरू केला. दीड वर्षे भाड्याच्या जागेत ज्ञानदानाचा अध्याय सुरू झाला.

सुरुवातीच्या काळात जागा, प्रशिक्षित आणि हुशार शिक्षकांची निवड करणे यासह पालकांना ‘सीबीएससी’ शिक्षणक्रमाचे महत्त्व पटवून सांगत यामध्ये वळते करून घेणे अशी अनेक आव्हाने होती. प्रारंभी शिक्षकांसह शिक्षकेतर सेवक केवळ 16 इतके होते. आज आमचा चमू 40च्या वर गेला असून संंस्थेत 560 विद्यार्थी ज्ञानार्जन करत आहेत. पुस्तकी, व्हर्च्यूअल शिक्षणासह कृतिशील शिक्षणातून संस्थेत विद्यार्थी घडवले जातात. स्मार्टबोर्डच्या माध्यमातून त्यांच्या शिक्षणक्रमातील विषय शिकवतो. शिक्षणक्रमाला व्यावहारिक शिक्षणाची जोड मिळावी म्हणून बँक, अग्नीशामक दल, हॉस्पिटल्स अशा ठिकाणी विद्यार्थ्यांच्या भेटी आयोजित करून तेथील कार्यपद्धती, रचना याची अनुभूती दिली जाते. विद्यार्थ्यांनी शाळेतच भाजीपाला लावला असून शेतीचे प्रत्यक्ष ज्ञान विद्यार्थी अनुभूतीतून घेत आहेत.

वाचन संस्कृती रुजावी म्हणून शिक्षक्रमातील अभ्यासासोबत ‘लायब्ररी लेक्चर’चा खास तास आम्ही मुलांसाठी सक्तीचा केला आहे. ग्रंथालयात जाऊन मग मुले हवे ते पुस्तक वाचून त्यावर नोेंदी काढतात. त्यामुळे वाचनाची गोडी वाढते. शाळेचा प्रत्येक वर्ग डिजिटल स्मार्ट क्लासरुममध्ये रुपांतरीत करून दृक-श्राव्य माध्यमातून आम्ही शिक्षण देत आहोत. टचस्क्रिन बोर्ड हे आमच्या शाळेचे वैशिष्ट्य. प्रत्येक वर्गात केवळ 25 विद्यार्थी संख्या मर्यादित ठेवली, त्यामुळे मुलांकडे वैयक्तिक लक्ष दिले जाते.

मुलांना भविष्यात ‘आयआयटी’ची कवाडे उघडली जावी, यासाठी शिक्षणक्रमासोबतच शाळेत सातवीपासूनच मुलांना फिजिक्स, केेमेस्ट्री आणि गणित हे विषय आठवड्यातील दोन दिवस शिकवले जातात. त्यासाठी राजस्थानमधील कोटा येथील खास शिक्षक बोलावून आम्ही शिक्षण देत आहोत. सर्वधर्मसमभाव जोपासना, सामाजिक जाणिवा फुलाव्यात म्हणून सर्व धर्मातील सण-उत्सव साजरे करून त्यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम घेतो. पूर्व प्राथमिक विभागासाठी गुरुकुल पद्धतीने शिक्षण देणारी जिल्ह्यातील आमची एकमेव संस्था असेल. संस्थेत शिक्षण घेणारे विद्यार्थी- पालक आणि शिक्षक यांच्यात सुसंवाद राहावा म्हणून शाळेचे विशेष मोबार्ईल अ‍ॅप, वेबसाईट आणि सोशल मीडिया गृप तयार केले. या माध्यमातून शाळेतील उपक्रम, कार्यक्रम, मुलांची प्रगती यासह पालक-शिक्षक संवादाचा सुरेख पूल तयार केला आहे.

संस्थेच्या स्कूल बस, व्हॅनला जीपीएस यंत्रणा लावलेली आहे. त्यामुळे मुलांच्या सुरक्षेसह पालकांचाही वेळ वाचत आहे.
इनरव्हिल क्लबच्या माध्यमातून केवळ आमच्याच नव्हे तर आसपासच्या गावे आणि तालुक्यात शाळेत शिकणार्‍या पौंगडावस्थेतील मुलींमधील शारीरिक बदल, समस्या याबद्दल जागृती करणारा ‘कळी उमलताना’ हा उपक्रम घेत आहोत. शिक्षणात इतर मुलांपेक्षा थोडे मागे पडलेल्या सर्वसामान्य बुद्धिमत्तेच्या मुलांसाठी ‘रेमेडियल’ क्लासरुम म्हणजे विशेष वर्ग भरवून त्यांना हुशार मुलांप्रमाणे प्रगतीच्या वाटेवर आणतो. यासह मुलांची भाषा, उच्चार स्पष्ट, खणखणीत व्हावे म्हणून ‘लँग्वेज लॅब’चा अभिनव उपक्रम राबवला. हेडफोन देऊन मुले उच्चार सुधारत आहेत. मुलांमध्ये खेळ, कला, सामाजिक संवेदना रुजाव्यात म्हणून वर्षभर उपक्रम घेतले जातात. योग, ध्यान, प्रार्थना यासह पालकांसाठी विशेष समुपदेशनही केले जाते. सामाजिक जाण, मूल्यांची रुजूवात, नेतृत्वगुण, संभाषण कौशल्य, कौशल्य विकास, त्यासाठी निबंध, वक्तृत्व, वादविवाद, चित्रकला अशा विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते.

आमच्या शाळेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे आम्ही आंतर शालेय संवाद हा उपक्रम राबवत आहोत. त्या अंतर्गत आमच्या शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि सर्व स्टाफ इतर शाळांना भेटी देत तिथले वातावरण, उपक्रम शिकतात. शाळेतील कृतिशील शिक्षणाचे प्रयोग इतर शाळांनी अंगीकारावे म्हणून म्हणून खास भेटी आयोजित करतो. एकूणच आंतरशालेय संवादाचा हा प्रयत्न यशस्वी ठरत आहे. विद्यार्थ्यांसह शिक्षकांचे नियमित ट्रेनिंग प्रोग्राम आम्ही घेत असतो. त्यामुळे शिक्षकही ‘अपडेट’ राहतात.

‘गुुरुकुल’ पद्धतीने पूर्व प्राथमिक शिक्षण देणारी मालेगावातील आमची पहिली शैक्षणिक संस्था आहे.
शैक्षणिक सुविधांनी परिपूर्ण शिक्षणसंस्था मालेगावी उपलब्ध झाल्याने येथील पालकांना आपल्या मुलांना शिक्षणासाठी दूर ठेवण्याची गरज राहिली नाही. आज दाभाडी, लखमापूर यासह रावळगाव, सतमाने, पिंपळगाव, मुंगसे येथील शेतकर्‍यांची मुले आमच्या संस्थेत शिक्षणासाठी येत आहेत.

आजच्या पिढीने शिक्षण घेऊन आपले शहर, गाव, देशासाठी कार्य करावे. येथून शिक्षण घेऊन विदेशात स्थिरावणारी ‘ब्रेन ड्रेन’ करून घेणारी पिढी निर्माण होऊ नये. आपली माणसे, मातीसाठी नव्यापिढीने कार्य करावे, हा संदेश मी देईन. नजिकच्या भविष्यात राजीव गांधी इंटरनॅशनल स्कूलचा विस्तार करत 12 वीपर्यंत महाविद्यालय सुरू करण्याचा मानस आहे. मालेगावी वैद्यकीय तसेच अभियांत्रिकी असे व्यावसायिक शिक्षण देणारे महाविद्यालय सुरू करण्याचेही माझे स्वप्न आहे.

(शब्दांकन : नील कुलकर्णी )

पुढील अंकात – सचिन जोशी

LEAVE A REPLY

*