नाशिक । सहजशिक्षणाची ‘आनंद’ शाळा : स्वाती थोरात ( शिक्षण )

0

भाषेचे खेळ, विज्ञानातले प्रयोग, व्यवहारातले गणित सोप्या पद्धतीने सांगणारी मराठी माध्यमाची ‘विद्यार्थिकेंद्री’ शाळा- आनंदनिकेतन. गेली 16 वर्षें वेगळ्या प्रयोगांतून मुलांना शिकवणार्‍या स्वातीताई थोरात यांची निवड ‘सीईक्यूयूई’ या संस्थेतर्फे झालेल्या प्रयोगशील शिक्षकांमध्ये झाली.

बिनभिंतीची उघडी शाळा, लाखो इथले गुरू
झाडे, वेली, पशू, पाखरे यांसी गोष्टी करू’
हे बडबडगीत आनंदनिकेतनच्या बाबतीत लागू होते. शाळेच्या भिंतींवरच निसगार्र्ची कल्पकतेने काढलेली चित्रे लक्ष वेधून घेतात. शाळा पाठ्यपुस्तकांबरोबरच निसर्गातीलंही शिक्षण मुलांना देते. त्यामुळे विद्यार्थी ‘गुण आणि नोकरीकेंद्रित’ शिक्षण न घेता परिसरातलेही ज्ञान घेतात. आपापल्या क्षेत्रात निपुण होत असतानाच ती आत्मभान असलेली म्हणूनही चमकतात.

वीस वर्षांपूर्वी अरुण ठाकूर आणि विनोदिनी काळगी यांनी शालेय शिक्षणावर विचारमंथन, संशोधन करून स्वयंअर्थसहाय्यातून उभ्या केलेल्या आनंदनिकेतनचे नाव जगभरात गेलेय. गुवाहाटीपासून मुंबई, लंडनहून आलेले पालक आपल्या पाल्यांसाठी आनंदनिकेतनला प्राधान्य देताहेत. ही शाळा कोणत्याही शिक्षणसम्राटाची नाही, तरीही आम्ही, 35 ताई केवळ मानधनावर आमच्या आनंदासाठी काम करताय. शाळेच्या आठवी ते दहावीच्या वर्गांच्या मान्यतेसाठी लढा देऊन ‘वुदरिंग हाईट्स’ सारखी शाळा दिमाखाने उभी राहिलीय. सर्व आर्थिक स्तरातील मुलांना सामावून घेत असतानाच पालकांकडून देणगी घ्यायची नाही, हे ब्रीदवाक्य कसोशीने पाळलेय.

माझा जन्म मनमाडजवळ वंजारवाडी गावातल्या शेतकरी कुटुंबातला. तिथे पहिली ते सातवीपर्यंतच शाळा होती. पुढचे शिक्षण मामांकडे देवळ्याला झाले. मामा-मामी प्राध्यापक असल्यानें शिक्षणक्षेत्राबद्दल ओढ होती. बीए, डी.एड., बी.एड. केलें. 2001 साली लग्नानंतर नाशिकला आले. आई-वडील, डॉक्टर पती, सासरची मंडळी विचारांनी पुरोगामी आहेत. आमचे नोंदणी पद्धतीने लग्न झाल्यावर खर्चाची रक्कम सासर्‍यांनी गुजरातच्या भूकंपग्रस्तांना दिली. गावात किमान दहावीपर्यंतची शाळा असावी, अशी आई-वडिलांची इच्छा असल्याने त्यांनी एक एकर जागा शाळेसाठी विनामूल्य दिली. तिथे दीडशेहून अधिक मुले आहेत. म्हणूनच की, काय आनंदनिकेतनशी जोडली गेले. बाळ दीड वर्षांचे असतानाच आम्ही दोघेही शाळेत जाऊ लागलो.

‘मी केले, मला समजले’ शाळेचे ब्रीदवाक्यच आहे. आनंदनिकेतनने मला शिक्षिका म्हणून घडवले. इथे मुले पाठ्यपुस्तकाला पूरक असलेल्या गोष्टी, ओरिगामी, पानांवरून झाडांची ओळख, प्रकल्प, क्षेत्रभेटी यातून घडतात. त्यावर शाळेत चर्चा, लेखन करतात, चित्र काढतात. पाठ्यपुस्तकाबरोबर सर्जनशील लेखनावर भर दिला जातो. नाटक लिहिणे, भाषण, कविता, परीक्षेतही… तुझे मत मांड, एखाद्या धड्याचा शेवट पटला का, असे वेगळे प्रश्न विचारले जातात.

मुलांची शिक्षणाची वाटचाल मूर्ताकडून अमूर्ताकडे झाल्याने गणिती संकल्पना स्पष्ट होतात. डॉ. मीनल परांजपे यांचा इंग्रजी अभ्यासक्रम वापरून शिकवले जाते. चित्रातील व्यक्ती, प्राणी एकमेकांशी काय बोलत असतील, ते लिहा असे सांगितले जाते. पहिली ते चौथी विज्ञानासाठी होमी भाभा यांची पुस्तके वापरली जातात. शिक्षिका झाले की, शिक्षण संपत नाही, उलट प्रयोगशील शाळांना भेटी, जून महिन्यात शिक्षकांसाठी निवासी शिबिर याद्वारे अधिक वेगानें चालू राहते. डॉ. आनंद नाडकर्णी, डॉ. अनिल अवचट, मेधा पाटकर, सोनम वांगचुक अशा नामवंत व्यक्तींचे मार्गदर्शन मिळते. परिपूर्ण शिक्षक कसा असावा, यासंदर्भात दर शनिवारी शाळांतर्गत सभा होतात.

कुतूहल कट्टा, शाळेच्या स्वयंपाकघरातील प्रयोग, पावसाळी-शेतावरची सहल, मंडई-स्मशानभूमीला भेट असे नवीन प्रयोग आम्ही राबवतो. दुकानजत्रेतून व्यवस्थापन, विक्रीकौशल्याबरोबरच सर्जनशीलता वाढीस लागते. स्वतः तयार केलेल्या वस्तूंची विक्री करून स्वकमाई मुले शाळेला देतात. आपण मिळवलेय, त्यातून दुसर्‍याला काही देण्याची सवय लागते. सहनशीलता, सहकार्य, शोधकवृत्ती वाढते. स्वतःचा विचार कृतीतून मांडता येतो. याचा उपयोग गणित, विज्ञान, भाषा, इतिहास शिकताना होतो. रात्रनिवास या अभिनव उपक्रमात पहिलीपासूनची मुले सहभागी होतात. गप्पागोष्टी, गाणी, तार्‍यांशी गूज अशा अनेक आकर्षणांमुळे मुलांना ताईंबरोबर रात्र जागवायला आवडते. स्वतःचे अंथरूण घालणे, त्याच्या घड्या घालणे, यामुळे मुले स्वावलंबनही शिकतात. हिरव्या कचर्‍यातून गच्चीवर भाजीपाला पिकवताना खतप्रक्रिया, तयार झालेल्या मातीचा सुगंध, शेतकर्‍यांचे कष्ट आणि सृजनाचा आनंद या गोष्टी अनुभवतात. त्यातून एखादा कृषिशास्त्रज्ञ, वैज्ञानिक, अभियंता, उत्तम खेळाडू, कलाकारही होऊ शकतो.

आनंदनिकेतनमध्ये गुणांवर आधारित तुकड्यांची उतरंड नाही. एककल्ली मुलांना सामावून घेतले जाते. मुलांच्या न्यूनगंडाचे मूळच आम्ही कमी केले. स्वयंशिस्तीवर भर देताना धाक नसतो. एखादेे मूल विचित्र वागत असेल, तर त्याच्या वर्तनसमस्येच्या मुळाशी जाऊन, आम्ही त्याला त्यातून बाहेर काढतो. आई-बाबांशी मोकळे न बोलणारी मुले इथे व्यक्त होतात. शिकताना मुलांमध्ये मोकळेपणा आणि मनात असंख्य प्रश्न असतात. आम्ही मुलांचे ऐकून, त्यांना समजून घेतो.

या वाटचालीत मलाही इथे ज्ञानाचा खजिनाच सापडला. विद्यार्थिसंख्या कमी असल्याने प्रत्येकाशी नाते जोडले जाते. वरच्या वर्गांत शिकताना मुले पाठ्यपुस्तकाचा आधार घेऊन स्वतः उत्तरे शोधतात. प्रत्येकाला समजेपर्यंत एखादा विषय शिकवला जातो. आईच्या कामाविषयी आदर, वयात येतानाचे आत्मभान, समाजाभिमुखता या ‘मूल्यशिक्षणाचा’ तास वेगळा घेतला जात नसल्याने आनंदनिकेतनचे ‘शाळाः सजा नाही, मजा’ ही स्लोगन सार्थ ठरते. शिक्षणपद्धतीत केलेल्या प्रयोगाचे इथेच चीज होते.

(शब्दांकन : शिल्पा दातार-जोशी )

पुढील अंकात – वैशाली पवार

LEAVE A REPLY

*