Type to search

maharashtra गणेशोत्सव नाशिक मुख्य बातम्या

देशदूत पर्यावरणपूरक गणेशोत्सव २०१९ : इको फ्रेंडली आरास काळाची गरज : सावंत

Share

नाशिक । प्रतिनिधी
प्रत्येकाचा लाडका गणपती बाप्पा हा वेगळा असतो, तशीच प्रत्येकाची त्याच्या प्रती असलेली श्रद्धाही वेगळी असते. घरात वा सार्वजनिक ठिकाणी गणेशोत्सव साजरा करताना प्रत्येकाने इको फ्रेंडली गणपतीची प्रतिष्ठापना करणे काळाची गरज आहे. शाडू मातीपासून बनवलेली गणपतीची लहान मूर्ती त्यासाठी परिपूर्ण आहे, असे मत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार राजेश सावंत यांनी मांडले.

कागद, शाडू, पुठ्ठ्यापासूनही गणपती मूर्ती बनवता येतात. झाडाची पाने अन् फुलांपासूनही गणपती बाप्पाची आरास आकर्षक तसेच मनमोहक स्वरुपात साकारता येते. उत्सव काळात बाप्पाची मूर्ती, सजावट, आरती, प्रसाद आणि बाप्पासोबत आपल्या सर्वांचे आवडते मोदक सर्वांची रेलचेल असते.

गणेशोत्सवात लाडक्या गणरायासाठी दरवर्षी जागा सजवण्याकरिता नवनवीन क्लृप्त्या वापरण्यात येतात. सर्वांमध्ये आपल्याच बाप्पाची सजावट कशी भारी आहे अशी चढाओढच लागते. घराला आनंददायी आणि सुंदर बनवण्यासाठी आपण छानशी सजावट करतो, तर कधी वेळेच्या समस्येमुळे नाईलाजास्तव बाजारात उपलब्ध असलेले तयार सजावट साहित्य वापरतो.

परंतु योग्य मार्गदर्शन आणि योग्य विचार आणि सर्वांनी एकत्र घेऊन घर सजवण्यात एक वेगळीच मजा आहे. त्यासाठी सर्वात आधी सजावटीकरिता एखादी संकल्पना ठरवावी लागते. एखादा विषय घेऊन त्याअनुषंगाने सुरुवात करावी लागते.

घरगुती गणपतीसाठी प्रामुख्याने रिबिन्स, गिल्टर, मखर फ्रेम्स्, वॉलपेपर्स, फुले (असली/नकली), विविधांगी रंगीत प्रकाशयोजना मालिका, रंंगीत जाळी, थर्माकोलचे शिट आणि खांबे, हार, गजरे आदी बाबींची आवश्यकता लागते. सध्या पर्यावरणपूरक अशी मूर्ती आणि सजावट याकडे लोकांचा कल जास्त आहे आणि हे एकाअर्थी चांगले आहे, कारण सण साजरे करून प्रदूषणात भर टाकणे वाईटच. सृजनतेची आद्य देवता असलेल्या गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी काही इको फ्रेंडली आणि घरगुती सजावटही आपल्याला करता येते.

घरातील हिरवळ
आपल्या घरातील झाडे यांचादेखील बाप्पाच्या सजावटीकरिता उपयोग करता येईल. यामुळे ताजेपणा आणि हिरवळ याची सुंदर सांगड घातला येईल. बाबूंची झाडे आणि इतर शोभिवंत वनस्पतींचा वापर करू शकतो.

कागदाची सजावट
कागदाचा उपयोग करून सजावट करता येईल. रंगीबेरंगी कागदाची छत्री, फुले, चांदण्या, तोरण तयार करून सजवता येईल आणि त्यात लहानग्यांना सोबत घेतल्याने त्यांनाही सजावटीचा आनंद घेता येईल आणि त्यांच्याही कल्पकतेत भर पडेल. वृत्तपत्र आणि मासिकांचादेखील उपयोग करून लोकांना आश्चर्यचकित करणारी सजावट करता येईल.

झाडाची पाने, फुलांची सजावट
दीड दिवसाच्या गणपतीकरिता झाडाच्या पानांसह फुलांची सजावट करता येते. फुलांची आकर्षक रंगसंगती करून त्यांचा पाळणा, सिंहासन किंवा मखर तयार करता येईल.

नारळाची सजावट
नारळाची करवंटी फेकून न देता त्याला कल्पकतेने चिकटवून विविध रंगाने रंगवून विविध आकार देऊन त्याचा उपयोग सजावटीकरिता करता येईल. शिवाय ही पर्यावणास अनुकूल अशी सजावट असेल.

शाडूचीच मूर्ती असावी
शाडूपासून बनवलेली लहान गणेशाची मूर्ती उत्सवासाठी पुरेशी असते. मी लहान असताना म्हणजेच माध्यमिक ते महाविद्यालयापर्यंत घरीच गणेशमूर्ती बनवायचो. त्यासाठी वडील शाडू आणून देत असत. आम्ही घरी 7 ते 8 वर्षांपासून इको फ्रेंडली गणपतीची स्थापना करतो. गणेशभक्तांनी शाडूचीच लहान मूर्ती बसवावी. तिचे विघटन होते.
-राजेश सावंत, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!