Type to search

Breaking News Featured गणेशोत्सव नाशिक मुख्य बातम्या

देशदूत गणेशोत्सव २०१९ : गणेशोत्सव मंडप उभारण्यात कार्यकर्ते दंग

Share

नाशिक । प्रतिनिधी
गणपतीचे आगमन पुढील पंधरा दिवसांनी म्हणजेच सोमवारी (दि.2) सप्टेंबर रोजी होत आहे. घरगुती गणेशाच्या प्रतिष्ठापनेसाठी आकर्षक मखरीसह सजावट करण्यास नागरिकांनी घरोघरी सुरुवात केली आहे. शिवाय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची धामधूमही सुरू झाली असून मंडळांचे कार्यकर्ते मंडप उभारण्यात दंग असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

बहुतांशी मडंळांनी स्टेज आणि अंतर्गत सजावट व्यवस्था करण्यास सुरुवात केली आहे. मित्र मंडळांच्या मंडपांशेजारी लगबग वाढायला लागली असून मंडप डेकोरेशनमध्ये रोजंदारी करणार्‍या आदिवासी बहुल भागातील तरुणांकडून उचांवर असलेल्या कमानी व मंडप बांधणी सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यातून त्यांना रोजगार मिळत आहे. दरम्यान, नोकरी आणि व्यवसाय सांभाळत संध्याकाळी विविध मित्र मंडळांचे कार्यकर्ते मंडळाच्या ठिकाणी एकत्र येऊन कोणती कामे तातडीने उरकण्याची गरज आहे, त्याची चर्चा करून मार्गीही लावत आहे.

गणरायाच्या आगमनासाठी शहरातील बाजारपेठाही सज्ज झाली आहे. शहरातील महत्त्वाची गणेशोत्सव मंडळे व उपनगरातील गणेश मंडळांनी मंडप टाकण्याच्या कामाला वेग दिला आहे. घरगुती गणपतीच्या आगमनादिवशीच बहुतांशी सार्वजनिक मंडळे श्रींच्या प्रतिष्ठापनेचे नियोजन करतात. सध्या मंडप डेकोरेटर्सकडून राजमहल, आकर्षक मंदिराची प्रतिकृती उभारण्यात येत आहे. शहर परिसरातील मंडळांत मंदिराची आकर्षक प्रतिकृती आणि तांत्रिक देखावे उभारण्याची तयारी सुरू झाली आहे.

विशेष बाब म्हणजे मित्र मंंडळांनी परवानगी मिळवण्यासाठी पोलीस ठाणे व मनपाकडे मागणी सुरू केली आहे. तसेच हा गणेशोत्सव निर्विघ्न व कोणत्याही कुरबुरीशिवाय पार पडण्यासाठी होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन पुरुष आणि महिलांच्या स्वतंत्र रांगा करण्याचे नियोजन सुरू केले आहे. मोठ्या मंडळात व मौल्यवान ऐवज असलेल्या मंडळांत सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. मंडळ परिसरात प्लास्टिक आणि अन्य कचरा होऊ नये, यासाठी मंडळांकडून विशेष दक्षता घेतली जाणार आहे. कार्यकर्त्यांचे शेकडो हात श्रींच्या स्वागताच्या तयारीत गुंतले आहे.

यासाठीही लगबग सुरू
मंडप सजावटीसाठी झालर, पडदे, कंठी, मखर, आयुधे, भक्तिगीतांच्या सीडी, दिव्यांच्या माळा व इतर साहित्य बाजारपेठेत येण्यास सुरुवात झाली आहे. पांरपरिक वाद्यांचे पथक, बेंजो, ढोल-ताशा वाजविणार्‍या कलाकारांच्या वेळेचे नियोजन, मंडप उभारणी, प्रकाश व्यवस्था, पडदे, सजावट, मिरवणुकीची तयारी सर्वत्र सुरु असल्याचे चित्र शहरभर पाहायला मिळत आहे.

लाकडी मखरसह गणेशोत्सवात डिजिटल प्रिटिंग, थ्रीडी इफेक्ट, फोम मखर खरेदी, वजनाने हलकी, हाताळायला सोपी, वाजवी दरामुळे विविध प्रकारची मंदिरे, राजमहाल आणि डिजिटल मखर, टिकल्यांचे नक्षीकाम, रेशमी, वेलवेट या प्रकारातील झालरी, झेंडे, विविध प्रकारचे दिवे, तोरण याचबरोबर पाश, कुर्‍हाड या आयुधांच्या प्रतिकृतीं घेण्यासाठी शोधाशोध केली जात आहे.

अवघे १११ अर्ज
सार्वजनिक गणेश मंडळांना उत्सवासाठी मंडप, स्टेज, आरास, कमानी उभारण्याची परवानगी देण्यासाठी महापालिकेने केलेल्या आवाहनाला शहतील गणेश मंडळांनी अल्प प्रतिसाद दिला आहे. महिनाभरापासून महापालिकेच्या सहाही विभागीय कार्यालयांमध्ये सुरू केलेल्या एक खिडकी योजना कक्षाकडे अवघ्या १११ गणेश मंडळांनी परवानगीसाठी अर्ज केले आहेत.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!