Type to search

Breaking News गणेशोत्सव नाशिक मुख्य बातम्या

देशदूत पर्यावरणपूरक गणेशोत्सव : तुरटीमिश्रित गणेशमूर्ती

Share

निशिकांत पाटील
पर्यावरणाचा समतोल साधण्याकरिता गणेशोत्सवाचे पावित्र्य कायम ठेवत शाडूमातीचा सोबतच अंकुर बीजनिर्मिती व तुरटीमिश्रित श्री गणेशाची मूर्ती मंगलमूर्ती आर्टस्च्या मूर्तिकार मोरे कुटुंबीयांनी बाजारात आणली आहे.

गेल्या तीन पिढ्यांचा वारसा लाभत मोरे कुटुंबीयांची चौथी पिढी आता श्री गणेशमूर्ती बनवण्याची परंपरा कायम ठेवत आहे. ब्रिटिशकाळात 1934 सालात कै. हरिभाऊ त्र्यंबक मोरे यांनी कलेची आवड म्हणून आपल्या भाजीपाल्याच्या व्यवसायासोबतच गोदावरीच्या काळ्या मातीपासून श्री गणेशाची मूर्ती बनविण्यास सुरुवात केली.

त्यानंतर काळानुरूप बदल घडवत त्यांचे पुत्र शंकर हरिभाऊ मोरे यांनी 1952 साली नाशिकमध्ये प्रथमच शाडूमातीपासून श्री गणेशाची मूर्ती बनविण्यास सुरुवात केली. त्यांची हीच परंपरा त्यांचे पुत्र शांताराम शंकर मोरे यांनी कायम ठेवत शाडूमातीच्या गणपती मूर्तीसोबतच त्यात काळानुरूप बदल घडवत नवीन प्रयोग करायला सुरुवात केली. या प्रयोगाला त्यांची तिन्ही मुले मयूर, गणेश, ओमकार यांनी साथ दिली.

गेल्या दहा वर्षांपासून मोरे यांनी श्री गणेश मूर्तीमध्ये एक नवीन प्रयोग सुरू केला, त्यात शाडूमातीमध्ये प्रत्येक मूर्तीत बेल, कारले व अर्जुन यांची आठ ते दहा बी टाकण्यास सुरुवात केली. त्यामुळे घरी अथवा नदीपात्रात श्री गणेशाच्या मूर्तीचे विसर्जन केल्यानंतर त्यामध्ये असलेले बी नदीलगत कुठेतरी जाऊन रुजेल व त्यापासून सुंदर अशा रोपट्याचे निर्मिती होईल व पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल, हा त्यामागील मूळ उद्दिष्ट.

अंकुर बीजनिर्मिती गणेशमूर्तीसोबतच गेल्या वर्षभरापासून मोरे यांचा मुलगा मयूर याने नवीन संशोधन करीत श्री गणेशाच्या मूर्तीमध्ये तुरटीचा वापर सुरू केला. त्याचा हा प्रयोग यशस्वी झाल्याचा विश्वास मोरे कुटुंबीयांनी दाखवला आहे. त्यामध्ये 3 किलो मूर्तीला 85 मिलिग्राम तुटीचे प्रमाण त्यांनी निश्चित केले आणि त्यामुळे तीन ते साडेतीन हजार लिटर पाणी शुद्ध होते.

सध्या बाजारात पीओपीच्या मूर्तीमध्ये असलेल्या विषारी रासायनिक द्रव्यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात होणारे प्रदूषण टाळण्याकरिता त्याची निश्चितच मदत होईल. 90 वर्षांची परंपरा कायम ठेवत मोरे कुटुंबीयांनी महाराष्ट्रात प्रथमच केलेला प्रयोग त्यात शाडूमातीत अंकुर बीज, पंचगव्य मिश्रित ( स्वदेशी गायीचे गोमूत्र, दूध, दही, शेण, तूप ) पाणी शुद्धीकरणासाठी तुरटी यामुळे पर्यावरणाचा होणारा र्‍हास कमी होण्यास निश्चितच मदत होईल. सध्या नाशिकच नव्हे तर देश व परदेशात या श्री गणेशमूर्तींची मागणी वाढत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!