Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

पारावरच्या गप्पा : कसं फेडू पांग तुझे ..कसं होऊ उत्तराई

Share

(गावात बैलपोळ्याची तयारी चालूय …वावरात दाम्या बायकोसंग मशागत करतांना )

दाम्या : (आपल्या स्वरात … है.. है … है ..मोत्या ) अय रखमे कुठं कुठं राहिलीस ….
दाम्याची बायको : आव…अख्खा दिस मी इथंच घालवू व्हय … चला मी जाते घरी .. तुम्ही घ्या आवरून
दाम्या : रखमे थांब कि.. मोत्या (बैल) जाम झालाय… व्हतंय थोडं हळू हळू … असं करून चाललं का?
दाम्याची बायको : एक काम करा.. पाटलाच्या इथून पेरणीपुरता एक बैल घेऊन या..
दाम्या : अंग उद्यावर पोळा आलाय अन आता कुठं तो पाटील बैल देणार हाय व्हय.. अय मोत्या अर चाल ना बाबा ..थोडसच राहिलंय रे…

(रात्रीच्या वेळी घरातील मंडळी जेवणानंतर चर्चा करतात. )
तान्या (दाम्याचा मुलगा ) : दादा , आता कव्हर मोत्याला धरून बसता …विकून टाका कि आता
दाम्याची बायको : खरंच तान्या म्हणतोय ते?
दाम्या : अगं असं कसं … म्हातारपणी त्याला विकायचं … अगं एवढे दिस आपल्याकडं राहिलं, दोन वेळच पोटबी त्यांनीच भरलंय हे इसरू नका ..अन आता त्यालाच इकायचं …
तान्या : वह्य दादा, एक माणूस त्यालाच लागतुया .. मग कस व्हायचं .. मला बी जॉबवर जाया लागतंया ….अन टॅक्टर हाय कि शेतकामाला…
दाम्या : आर तू न्हवता तवा त्यांनीच आम्हांसनी मदत केलीया.. आर तू जसा पोरगा हायना माझा तसंच ते बी माझं पॉर हाय. कुणी स्वतःच पॉर इकतंया व्हय..
तान्या : आव दादा, तुम्ही बी म्हातारा झालया. … या वयात काम ..कस झेपेल तुम्हाला..थोडा इचार करा…
दाम्याची बायको : आव पर त्यो आता म्हातारा झालाय. ..म्हणून इकायचं म्हणतुया
दाम्या : व्हय … मग म्या बी म्हातारा झालूया.. त्याच्यासकट मालाबी इका मग… एखाद्या दलालाकडे इकु नका म्हणजे झाल….
दाम्याची बायको : सणासुदीला असं वंगाळ बोलू नका… जा बैलास्नी धुवून आणा… उद्याचाला मिरवणूक हाय गावात

(गावात बैलपोळ्याचा सण जोरात साजरा होतो…… . गोठ्यात सायंकाळी दाम्या मोत्या बैलापाशी बसतो…)

दाम्या : (मोत्या बैलाला) आर पोरा लय केलंस रे आमच्यासाठी … पर तुझ्यासाठी न्हाय काही करता आलं. ऐन पोळ्याला तुझी अशी अवस्था बघवत नाही रे.. लोक म्हणत्यात आता तुझी जागा टॅक्टरने घेतली… पर तुझ्या हंबरण्याची सर त्याला येणार य व्हय…. पर तुला मी इकणार न्हाय … तुझी सुरवात इथनं झाली ना तर शेवटही झाला पाहिजे…
(तेवढ्यात मोत्या बैल मटकन खाली बसतो, अन दाम्या धाय मोकलून रडू लागतो..)

तान्या : आई , दादा तरी म्हणत व्हता….माझ्या पोरावानी हाय मोत्या … मला सोडून कुठंबी जायचा न्हाय … चल मोत्याला निरोप देऊ…
( गावातली समदी जण दाम्याच्या घरासमोर गोळा व्हत्यात… )

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!