Photo/ Video: नाशिकमध्ये युद्धभूमीचा थरार; देशाच्या सामर्थ्याची जगाला चुणूक, तोफांची प्रात्यक्षिके

0

नाशिक । प्रतिनिधी
नव्याने दाखल झालेल्या हॉवित्झर-77, 360 अंशात फिरून बॉम्ब हल्ला करणारी वज्र, ‘बोफोर्स’, वीस सेकंदात चाळीस अग्निबाण दागण्याची क्षमता ठेवणार्‍या रॉकेट लॉन्चरने केलेला रॉकेट हल्ला, तर उखळी मारा करणार्‍या सॉल्टम, मॉर्टर, 130-एम.एम. रशियन तोफांसह एकूण सात अत्याधुनिक तोफांचा कानठळ्या बसविणारा व परिसर हादरून सोडणार्‍या बॉम्ब हल्ल्याने नाशिकच्या देवळाली येथील भारतीय तोफखाना प्रशिक्षण केंद्राचा (स्कूल ऑफ आर्टिलरी) गोळीबार मैदानाने युद्धभूमीचा थरार अनुभवला.

त्यास निमित्त ठरले देवळालीच्या स्कूल ऑफ आर्टिलरीच्या वतीने आयोजित ‘तोपची’ या खास प्रात्यक्षिकांचे. आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करीत युद्धासाठी भारतीय सैन्य दल सक्षम होत असून, याद्वारे जगाला भारताच्या सामर्थ्यांचे दर्शन घडवले.अत्याधुनिक यंत्रणांनी सुसज्ज असलेल्या भारतीय तोफखाना भविष्यात कुठल्याही उद्भवलेल्या युद्धाप्रसंगी सैन्याचे सामथ्यर्र् सिद्ध करत, निर्णायक भूमिका बजावण्यासाठी सज्ज असल्याचा संदेश या प्रात्यक्षिक सोहळ्यातून देण्यात आला.
या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून अतिविशिष्ट सेवा मेडल लेफ्टनंट जनरल वाय. व्ही.के. मोहन, कमांडंंट स्कूल ऑफ आर्टिलरी लेफ्टनंट जनरल रणविरसिंग सलारिया, उप कमांडंट तथा आर्टिलरीचे मुख्य प्रशिक्षक मेजर जनरल ब्रिजेश वशिष्ठ आदींसह संरक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

देवळाली कॅम्पलगतच्या फायरिंग रेंजवर सलग दीड तास चाललेल्या कार्यक्रमात तोफखाना दलाची मुख्य भिस्त सांभाळणारी 155 एम. एम. बोफोर्स, 120 एम. एम. मॉर्टर, 105 एम. एम. इंडियन फिल्ड गन आणि 105 एम. एम. लाईट फिल्ड गन या तोफा सहभागी झाल्या होत्या. तसेच एकाचवेळी 40 रॉकेट डागण्याची क्षमता असणारे 122 एम. एम. मल्टी बॅरल रॉकेट लाँचर, चित्ता आणि चेतक हेलिकॉप्टरच्या कामगिरीचे दर्शन घडविण्यात आले. हेलिकॉप्टर, खेचरावरून मैदानात आणलेल्या तोफांच्या सुट़्या भागांची जवानांंनी काही मिनिटांत बांधणी केली.

त्यानंतर भडिमार सुरू झाला. यावेळी उपस्थितांच्या अंगावर शहारे आले, तर अनेकांनी आपल्या कानावर हात ठेवले. या प्रात्यक्षिक सोहळ्यासाठी अमेरिका, रशिया, इजिप्त, मंगोलिया, केनिया, श्रीलंका, व्हिएतनाम, नेपाळ या देशांच्या सैनिकांनाही पाहुणे म्हणून खास या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. तसेच भारतीय वायू दलाच्या सैनिकांच्या तुकडीनेही तोफखान्याची क्षमता यावेळी अनुभवली.

प्रहारक क्षमतेचे दर्शन
प्रात्यक्षिकात विविध क्षमतेच्या तोफा, रॉकेट लाँचर सहभागी झाले होते. प्रारंभी हलक्या व कमी क्षमतेच्या तोफांंनी लक्ष्यभेद केला. हॅवित्झर-77, 360 अंशांत फिरून बॉम्ब हल्ला करणारी वज्र, ‘बोफोर्स’, ही तोफखाना दलाची महत्त्वाची आयुधे ठरली.त्यांनी आग ओकत व लक्ष्य भेदत आपले वेगळेपण अधोरेखित केले. एका मिनिटांत आठ ते 10 स्मोक किंवा ‘हाय एक्स्प्लोझिव्ह बॉम्ब’चा मारा करू शकणार्‍या 120 एम. एम. मॉर्टर गनने आपली क्षमता सिद्ध केल्यानंतर 105 एम. एम. इंडियन फिल्ड गन, लाईट फिल्ड गन यांनी भडिमाराचे कसब दाखविले. प्रत्येकीच्या क्षमतेनुसार डागलेले गोळे अवघ्या 20 ते 45 सेकंदात लक्ष्यावर जाऊन आदळले. त्यानंतर रॉकेट लाँचरने एका पाठोपाठ एक केलेल्या फायरिंगने सर्वाना आश्चर्यचकित केले; तर यापुढे भारतीय बनावटीच्या धनुष तसेच सारंग लवकरच दलात दाखल होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

अग्निवर्षांव..                                                                                                            कार्यक्रमात बिनतारी यंत्रणेद्वारे विशिष्ट संदेश देण्यात आला. त्यामुळे सावध झालेले तोफांवरील जवान अवघ्या तीन ते पाच मिनिटांत सज्ज झाले. पाचव्या मिनिटाला विविध तोफांनी लक्ष्यावर जोरदार भडिमार केला. त्यास ‘अग्निवर्षांव’ असे म्हटले जाते. यामुळे फायरिंग रेंजचा डोंगर धुराने वेढला गेला. अल्प काळात तोफखाना दल कसे कार्यान्वित होते ही बाब दर्शविली गेली. डागलेल्या तोफगोळ्यांवर जमिनीवरून दिसू न शकणारी वैमानिकरहित विमाने लक्ष ठेवून होती. अचूक लक्ष्यभेद झाल्याची माहिती लगेच त्यांच्याकडून छायाचित्रांद्वारे उपलब्ध करून देण्यात आली.

संरक्षक आयुधांनी वेधले लक्ष
आज झालेल्या प्रात्यक्षिकांमध्ये स्वाती रडारासह इतर रडार यंत्रणा, लक्ष्य तसेच शत्रूच्या हद्दीत सुरू असलेल्या सूक्ष्म हालचाली रात्रीही स्पष्टपणे टिपणारा कॅमेरा, लक्ष्यांची अचूक माहिती देणारी यंत्रणा यांनी प्रात्याक्षिकांदरम्यान लक्ष वेधले. स्वाती रडारची क्षमता 50 किलोमीटर असून. त्याच्या टप्प्यात आलेला तोफगोळा, कोणत्या दिशेने, किती अंतरावरून व किती क्षमतेच्या तोफेतून डागला गेलाय यासह सूक्ष्म माहिती लष्कराला देण्याची क्षमता असल्याचे यावेळी सांंगण्यात आले.

लढाऊ हेलिकॉप्टरच्या चित्तथरारक कसरती
गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग सेंटरचे चित्ता, चेतक, ध्रुव या हेलिकॉप्टरद्वारे युद्धभूमीवर सैनिकांना रसद पुरविणे, अतिरिक्त सैन्याला पाचारण करणे, जखमींना युद्धभूमीवरून हलविण्याचे प्रात्यक्षिक यावेळी सादर करण्यात आले. ‘ध्रुव’ हेलिकॉप्टरने अतिशय वेगवान पद्धतीने शत्रू ठिकाणांची अचूक माहिती आपल्या सैन्याला देण्याच्या प्रात्यक्षिकाचे उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाटात स्वागत केले.

LEAVE A REPLY

*