Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

टोमॅटोला मागणी वाढल्याने शेतकर्‍यांची चांदी होणार; मात्र पावसाने उत्पादन घटले

Share
tomato

अजित देसाई । नाशिक
कांद्यापाठोपाठ उच्चांकी भाव गाठणार्‍या टोमॅटोची लाली आणखी वाढणार असल्याची चिन्हे आहेत. शेजारच्या बांगलादेशसह अखाती देशातून मागणी वाढत असली तरी सततच्या पावसामुळे देशांतर्गत विशेषकरून महाराष्ट्रातील उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे मागणी पुरवठयाच्या सूत्राचा ताळमेळ बसणे आगामी शक्य होणार नसल्याने अर्थातच शेतकर्‍यांची चांदी होणार आहे. आज सरासरी साडेतीनशे तेपाचशे रुपयांच्या घरात असणारे टोमॅटोचे दर डिसेंबरअखेर चढेच राहणांर असल्याचा अंदाज आहे.

ऐन दिवाळीच्या तोंडावर पन्नाशीचा दर गाठलेल्या टोमॅटोमुळे महिलांचे स्वयंपाकघरातील बजेट कोलमडायला सुरुवात झाली होती. हे दर आता काहीशे खाली आले असले तरी आगामी काळात ते पुन्हा वधारण्याची शक्यता आहे. सतत सुरु असलेल्या पावसाने उत्पादनात घट येत असून बाजारातील मागणी वाढू लागल्याने शेतकर्‍यांना टोमॅटो विक्रीतून उत्पन्नाची हमी आहे.द्राक्ष, कांदा या पिकांपाठोपाठ टोमॅटो उत्पादनातदेखील नाशिक अग्रेसर आहे. मात्र महिनाभरापासून सतत सुरु असणार्‍या पावसाने या तीनही प्रमुख नगदी पिकांची वाट लावली आहे.

यंदाच्या हंगामात टोमॅटोची सुरुवातीपासूनच बर्‍यापैकी पैसा मिळवूंन द्यायला सुरुवात केली होती. उत्पादन जोमात असताना नैसर्गिक बदलांच्या प्रभावाने शेतकर्‍यांच्या अपेक्षेवर पाणी फिरले असून सतत पडणार्‍या पावसाने अन्य पिकांसोबतच टोमॅटोचे देखील मोठे नुकसान केले आहे. परिणामी सातशे-आठशे रुपयांवर असणारे भाव थेट निम्म्याने खाली आले आहेत. अर्थात पावसाने दरातील ही घसरण सुरु असली तरी बांगलादेश व आखाती देशातून वाढती मागणी शेतकर्‍यांसाठी फायदेशीर ठरू पाहत आहे. शेतकर्‍यांकडे असणारा माल पावसाने खराब होत असल्याने बाजारात काहीसा तुटवडा निर्माण झाला असल्याने सध्यातरी टोमॅटोचे दर पाचशे रुपयांवर स्थिरावले आहेत.

साधारण महिनाभरापासून ही परिस्थिती कायम असून या कालावधीत सुरु असलेल्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान केले आहे. टोमॅटो उत्पादकांना देखील याचा फटका बसला आहे. पावसाच्या मार्‍याने झाड कमकुवत बनले असून यापुढील काळात आश्वासक उत्पादनाची हमी शेतकरी घेऊ शकत नाहीत. ज्या ठिकाणी एकरी 500 जाळ्या अपेक्षित होत्या तिथे उत्पादन केवळ 50 जाळ्यांवर आले आहे.

परिणामी ज्या शेतकर्‍याचा माल चांगला त्याला पैसा मिळणार हे सरळ सूत्र बाजारातील आहे. पावसाने राज्यातील तसेच टोमॅटो उत्पादक प्रमुख प्रदेशात नुकसान केले असले तरी अखाती देशांकडून मागणी वाढत असल्याने उत्पादकांसाठी आशेचा किरण आहे. अर्थात या अल्प उत्पादनातून शेतीचे झालेले नुकसान भरून येणार नसले तरी किमान खर्च तरी काही प्रमाणात सुटेल अशी आशा शेतकर्‍यांना आहे.

किरकोळ बाजारात प्रतिकिलो 40 ते 80 रुपयांपर्यंत टोमॅटोला भाव मिळत आहे. बदलत्या हवामानाचा परिमाण म्हणून ही दरवाढ असली तरी त्यातून अन्य शेतीपिकांची नासाडी झालेल्याटोमॅटो उत्पादक शेतकर्‍यांना फायदा होताना दिसत आहे. पिंपळगाव बसवंत येथील बाजार समिती आवारात सोमवारी सुमारे 2 लाख 10 हजार क्रेट्सची आवक झाली होती. यावेळी 20 किलोच्या जाळीचे भाव 70 ते 580 रुपये तर सरासरी 350 रुपये इतके राहिले.

नेमक्या वेळी पावसाने टोमॅटोच्या पिकांची हानी केली आहे. सध्याचा कालावधी टोमॅटो पिकासाठी पोषक नसल्याने व पुढील काळात परिस्थितीत सुधारणा होणार नसल्याने आज उभ्या असणार्‍या पिकावरचा हंगामाची मदार असणार आहे. आज चांगल्या प्रतीचा निर्यातक्षम माल साडेपाचशे रुपयांच्या घरात नाशिक, पिंपळगावला खरेदी होतो आहे. तर पांढुर्ली (सिन्नर) येथेही सहाशे रुपयांपर्यंत उच्चांकी भाव मिळत आहेत. असे असले तरी सरासरी साडेतीनशे ते चारशे रुपयांच्या घरात आहे. साधारण डिसेंबर अखेरपर्यंत आपल्या मालाला बांगलादेश किंवा आखाती देशांमध्ये उठाव राहणार असून तेवढाच कालावधी शेतकर्‍यांना बर्‍यापैकी भाव मिळेल अशी शक्यता पांढुर्ली येथील खरेदीदार प्रभाकर हारक यांनी व्यक्त केली.

पावसाच्या मार्‍याने फळाची प्रत घसरली असून महिनाभर टिकणारे हे फळ आठवड्यात खराब होत असल्याने त्याचा मोठा फटका देखील शेतकर्‍याला बसला आहे. परिणामी व्यापारी खरेदीला काहीसा अनुत्सुक आहे.दोन वर्षांपूर्वी टोमॅटोची शेतकर्‍यांना चांगले पैसे कमावून दिले होते. यंदाच्या हंगामात देखील असेच वाटत असताना पावसाने खो घातला आहे. असंख्य बागा पाण्यात असून शेतकर्‍यांना औषधफवारणीचा खर्च देखील परवडणारा नाही. दिवाळीनंतर नवीन माल बाजरात दाखल झाल्यास दर आणखी खाली येतील अशी भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. पावसाने देशातील बाजारात मागणी कमी झाली असून आवकदेखील घटल्याने काही प्रमाणात दर टिकून आहेत.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!