डिफेन्स हब नाशिकलाच होणार

0

नाशिक । संरक्षण अन् हवाई उत्पादन क्षेत्रातील संशोधनाला चालना मिळावी म्हणून नाशिकमध्ये ‘डिफेन्स इनोव्हेशन हब’ची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यामुळे नाशिकच्या औद्योगिक विकासाला चालना मिळून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल, असा विश्वास केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी व्यक्त केला. ‘डिफेन्स इनोव्हेशन हब’ नाशिकलाच होणार असून त्याबाबतची घोषणा व अंमलबजावणीला सुरुवात एका महिन्यातच होईल, असे स्पष्टीकरण प्रसिद्धी पत्रकाद्वारे त्यांनी दिले.

देशात संरक्षण सामुग्रीच्या उत्पादनाला चालना देत भारताला उदयोन्मुख संरक्षण उत्पादनाचे हब बनवण्याची भूमिका केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने घेतली असून तीन महिन्यांपूर्वी नाशिक येथे संरक्षण व हवाई उत्पादन क्षेत्रातील संधी या विषयावर आयोजित चर्चासत्रात डॉ. भामरे यांनी नाशिकमध्ये डिफेन्स इनोव्हेशन हबची घोषणा केली होती. त्यानंतर कार्यक्रम घेऊन अंमलबजावणी करण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र मध्यंतरीच्या काळात हे ‘डिफेन्स हब’ नाशिकऐवजी नागपूरला होणार असल्याचीही चर्चा होती.

यासंदर्भात स्पष्टीकरण देताना खा. भामरे म्हणाले, निवडणूक आचारसंहितेमुळे सदर कार्यक्रम घेता आला नाही. त्यामुळे मधील काळात सदर केंद्र नागपूरला जाण्याबाबत चर्चा सुरू होत्या. मात्र तसा कोणताही प्रकार नसून संरक्षण मंत्रालय नाशिकला सदर इनोव्हेशन हब सुरू करण्याच्या दिशेने काम करीत आहे. भारतात लघुउद्योजकांना संरक्षण क्षेत्रातून प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या माध्यमातून ‘डिफेन्स इको सिस्टीम’ तयार व्हावी यासाठी भारत सरकारने डिफेन्स इनोव्हेशन हब विविध ठिकाणी स्थापन करण्याचा निर्णय घेतला.

सहा महिन्यांपूर्वी चेन्नई येथे झालेल्या डिफेन्स एक्स्पोमध्ये केरळ राज्यातील कोईम्बतूर येथे डिफेन्स इनोव्हेशन हब देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. या माध्यमातून संरक्षण क्षेत्रात लघुउद्योजक, संरक्षण उद्योग, इनोव्हेटर्स, स्टार्टअप, अ‍ॅकेडमी यांना संशोधन आणि विकासासाठी प्रस्तावित करायचे व त्यांना आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्यायच्या तसेच त्यासाठी आवश्यक निधीही उपलब्ध करून द्यायचा, अशी घोषणा यावेळी करण्यात आली. यासंदर्भात पंतप्रधान मोदी आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे डिफेन्स इनोव्हेशन हब नाशिकला करण्याबाबत आग्रह धरला होता. यानंतर सदर हब नाशिकला स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

‘कॅट’ नाशिकलाच
लष्करी अधिकार्‍यांना हेलिकॉप्टरचे प्रशिक्षण देणारे देशातील एकमेव केंद्र असलेल्या नाशिक येथील ‘कॅट’ अर्थात आर्मी कॉम्बॅक्ट एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल नाशिकमधून अन्यत्र हलवण्याबाबतची चर्चा होती. मात्र आर्मी कॉम्बॅक्ट एव्हिएशन ट्रेनिंग युनिट नाशिक येथून हलवण्याबाबतचा कुठलाही प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाकडे आलेला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

*