‘व्हॅलेंटाईन’दिनी ‘डिव्हाइन सायक्लोथॉन’चे आयोजन

0
नाशिक | एकमेकांच्या प्रती प्रेमभावना व्यक्त करण्याचा दिन म्हणून व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. समाजामध्ये बहुसंख्येने असलेल्या दिव्यांग व्यक्तींप्रती सामान्य जनतेचा स्नेहभाव जोडला जावा, दिव्यांगांबद्दल समाजात जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड, नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन आणि एसकेडी ग्रुप चे एसकेडी कन्सल्टंट आणि एसकेडी इंटरनॅशनल स्कुल यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी ‘डिव्हाइन सायक्लोथॉन’चे आयोजन करण्यात आले आहे.

नाशिक सायकलीस्टस फाउंडेशनचे दिवंगत अध्यक्ष जसपाल सिंग विर्दी यांच्या संकल्पनेतून सुरु झालेला उपक्रम त्यांच्या स्मृतींना अर्पण केला जाणार आहे.

सलग तिसऱ्यावर्षी आयोजित करण्यात आलेल्या या डिव्हाईन सायक्लोथॉनमध्ये अंध मुले-मुली,अस्थिव्यंग, मतीमंद, सेलेब्रल प्लासी, बहुविकलांग, डिफ-ब्लाइंड स्त्री पुरुष सहभागी होणार आहेत.

नेहमीच दुर्लक्षित राहणारे समाजघटक, हेल्मेट वापरण्याबाबतची जागृती, सायकल आणि गाडी चालवताना मोबाईलवर बोलू नका, पर्यावरणाचे रक्षण करा, वाहतुकीचे नियम पाळा असे संदेश देताना या ‘डिव्हाइन सायक्लोथॉन’ मध्ये १०० दृष्टिहीन आणि बहुविकलांग हौशी सायकालिस्ट सहभागी होणार असल्याची माहिती नाशिक सायकलीस्ट फाउंडेशनचे उपाध्यक्ष श्रीकांत जोशी यांनी दिली आहे.

नाशिकला सायकलिंग कॅपिटल बनविण्याचा प्रयत्न करताना अंध-अपंगांचे सबलीकरण, हेल्मेटचा वापर, पर्यावरण संतुलन आणि निरोगी आयुष्य आणि प्रदूषणमुक्त शहरासाठी सायकलचा वापर याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

या सायक्लोथॉन साठी प्रमुख अतिथी शहर पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल उपस्थित राहणार आहेत. उपक्रम यशस्वी होण्यासाठी नॅब महाराष्ट्राचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री, मानद महासचिव गोपी मयूर, सहसचिव शाम पाडेकर, मुक्तेश्वर मूनशेट्टीवार, मंगला कलंत्री, प्रशासकीय संचालक विनोद जाधव, नाशिक सायकलीस्टचे अध्यक्ष प्रविणकुमार खाबिया, उपाध्यक्ष श्रीकांत जोशी, योगेश शिंदे, सचिव नितीन भोसले, स्नेहल देव, वैभव शेटे, किशोर काळे, नीता नारंग, सोफिया कपाडिया​, पल्लवी पवार आदी प्रयत्नशील आहेत.

व्हॅलेंटाईन डेचे औचित्य साधून समाजातील अंध अपंग व जनमानसात स्नेहभाव निर्माण व्हावा व एकमेकांप्रती मैत्रीचे नाते जोडले जावे हा या रॅली आयोजनामागे प्रमुख उद्देश आहे. तरी या रॅली साठी नाशिककरांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

असा असेल मार्ग : सकाळी ठीक ८ वाजता ही ‘डिव्हाइन सायक्लोथॉन’ सुरु होणार असून महात्मानगर क्रिकेट ग्राउंड ते भोंसला मिलिटरी स्कुल गेट, कॉलेज रोड असा मार्ग असेल. विशेष म्हणजे या राईड मध्ये टॅंडम सायकल्स, तीन चाकी सायकल्स, व्हीलचेअर वापरण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

*