नाशिक सायकलिस्ट्ची एनआरएम सायकल राईड उत्साहात; अबालवृद्धांसह 130 सायकलिस्ट्सचा सहभाग

0

नाशिक । नाशिक- ते नांदूरमध्यमेश्वर दरम्यान आज नाशिक सायकलिस्टकडून नाशिक रँडोनर्स मायलर्स (एनआरएम) सायकल राईडचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी सहा वाजता निघालेल्या या सायकलीस्टने चांदोरी मार्गे नांदूरमध्यमेश्वर – निफाड – सायखेडा ते नाशिक असे 100 किमीचे अंतर पूर्ण केले. नाशिकमधील तब्बल 130 सायकलिस्टने या राईडमध्ये सहभाग घेतला होता.

डिसेंबर 2016 मध्ये ज्या राईडमधून एनआरएम या संकल्पनेचा उदय झाला होता, ती सेंच्युरी राईड आज पार पडली. यावेळी मोठ्या प्रमाणात महिलांसह 12 ते 72 वयोगटातील सायकलिस्ट्स सहभागी झाले होते.

यात पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस निरीक्षक मधुकर कड, डॉ. राजेंद्र नेहेते, नाशिक सायकलिस्ट्सचे अध्यक्ष प्रविणकुमार खाबिया, एक्साईजचे उपायुक्त प्रसाद सुर्वे व त्यांची पत्नी सोनाली यांच्यासह डॉ. मनीषा आणि नितीन रौंदळ, रवींद्र आणि साधना दुसाने अशा दांपत्यांनी सहभाग घेतला होता.

आज सकाळी 6 वाजता जुना गंगापूर नाका येथील फायरफॉक्स सायकल्स येथून या राईडला सुरुवात झाली. चांदोरी येथे गोदाकाठ सायकलिंग क्लबचे डॉ. आबा पाटील यांनी स्वागत केले. त्यानंतर सर्व सायकलिस्ट्सने नांदूरमध्यमेश्वरकडे मार्गक्रमण केले. येथील तलाव आणि पक्षी अभयारण्याला भेट दिली. परतीचा प्रवास करताना सायखेडा येथे सायखड्याचे सरपंच यांनी सायकलिस्ट्सचे स्वागत केले.

या राईडदरम्यान जिल्ह्यात वाढलेल्या थंडीच्या ज्वरात सायकलिंगचा पूर्ण आनंद लुटला. राईड यशस्वी होण्यासाठी एनआरएम प्रमुख धीरज छाजेड, गणेश पाटील, विकाश जैन यांनी प्रयत्न केले.

2016 साली 3 डिसेंबर रोजी नाशिक सायकलिस्ट्सचे दिवंगत अध्यक्ष जसपालसिंग विर्दी यांनी जास्तीत-जास्त सायकलिस्ट्सने मोठ्या राईड्स कराव्यात या उद्देशाने सेंच्युरी राईडचे आयोजन केले होते.

याच संकल्पनेतून एनआरएमचा जन्म झाला. मागील वर्षी या राईडमध्ये 110 सायकलिस्ट्सने सहभाग घेतला होता.

LEAVE A REPLY

*