नाशिक-मुंबई सायकल रॅली उत्साहात; गेटवे ऑफ इंडिया येथे आज होणार कार्यक्रम

0

नाशिक | महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व नाशिक सायकलिस्ट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने २ ऑक्टोबर गांधी जयंती हा दिवस इंडियन सायकल डे म्हणून साजरा करताना नाशिक ते मुंबई सायकल रॅलीला आज मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.

नाशिकचे पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांच्या हस्ते आज सकाळी ६ वाजता रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी लायन्स क्लब नाशिक कॉर्पोरेटचे अध्यक्ष के.डी. पाटील, सिटीझन बँकेचे चेअरमन शेखर सोनवणे, नाशिक सायकलिस्टसचे अध्यक्ष प्रवीणकुमार खाबिया आदी उपस्थित होते.
या रॅलीमध्ये एकूण ६० सायकलिस्ट्सने सहभाग नोंदविला आहे. विशेष म्हणजे नाशिक शहर पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, शहर अभियंता युबी. पवार, किरण चव्हाण यांनीसुद्धा या रॅलीमध्ये सहभाग घेत इगतपुरी पर्यंत सायकल चालवली. पहिल्या दिवशी भिवंडी फाटा येथे शांग्रीला रिसॉर्ट येथे हे सायकलीस्ट मुकामी आहेत.
 
त्यानंतर २  ऑक्टोबर रोजी सर्व सायकलिस्टस गेटवे ऑफ इंडिया येथे पोहोचतील. रॅलीच्या प्रथम टप्प्यात घोटी येथे रॅलीत सहभागी नाशिक सायकलिस्ट्सच्या सदस्यांचे रिमझिम ग्रुप तर्फे जंगी स्वागत करण्यात आले.
यावेळी रिमझिम ग्रुपचे अध्यक्ष निलेश काळे, पुरुषोत्तम राठोड, समाधान जाधव, घोटी ग्रामपालिका सरपंच माणिक खांब, हरीश चव्हाण, ओम कंदकुरीवार, निलेश पदमेरे, रमेश बोराडे, संतोष व्यवहारे यांनी औदार्याने सगळ्यांची चौकशी करत हारतुरे घालत प्रत्येकाचे स्वागत केले.
नाशिक सायकलिस्ट्स गेल्या ६ वर्षापासून २ ऑक्टोबर गांधी जयंती हा दिवस इंडियन सायकल डे म्हणून साजरा करीत आहे. या दिवशी जनतेस पर्यावरण, स्वच्छता व नागरी कर्तव्य असे संदेश दिला जातो. नाशिक शहरात विविध रॅलीचे आयोजन केले जात होते. मात्र ही चळवळ देशभरात नेण्याच्या उद्देशाने संपूर्ण देशात २ ऑक्टोबर इंडियन सायकल डे साजरा व्हावा असा मानस ठेवून वर्ष २०१६ पासून नाशिक ते मुंबई सायकल रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे.
 
आज होणार गेटवे ऑफ इंडिया येथे कार्यक्रम : 2016 सालापासून २ ऑक्टोबर हा दिवस इंडियन सायकल डे साजरा व्हावा या उद्देशाने नाशिक मुंबई सायकल रॅलीचे आयोजन होत आहे. या सायकल चळवळीतीळ रॅलीच्या दुसऱ्या पर्वामध्ये नाशिक सायकलिस्ट्सला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची साथ मिळत आहे.
गेटवे ऑफ इंडिया येथे सोमवारी ११ वाजता होणाऱ्या कार्यक्रमात एमटीडीसीचे सह व्यवस्थापक आशुतोष राठोड तसेच अन्य अधिकारीवर्ग यांच्या उपस्थितीत नाशिक सायकलिस्टसच्या सदस्यांकडून स्वच्छता, पर्यावरण आणि मानवी कर्तव्ये यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे.
२ ऑक्टोबर हा इंडियन सायकल डे म्हणून या आशयाचे निवेदन संबंधित खात्याला देण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

*