Type to search

Breaking News आवर्जून वाचाच नाशिक मुख्य बातम्या

सायकल चळवळ भरकटतेय का?

Share

नाशिक । प्रतिनिधी
राज्यात नाशिकपासून सुरू झालेल्या सायकल चळवळीने आज देशभरात काहीअंशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. याच सायकल चळवळीने आरोग्याचा संदेश देत समाजात जनजागृती करण्याचे मौलिक काम केले आहे. मात्र सध्या हीच सायकल चळवळ हौस आणि मजेखातर केली जात आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे सायकल चळवळीचा मूळ उद्देश भरकटतो आहे, असे बोलले जात आहे.

नाशिकककर एकवेळ मोटारसायकलवर हेल्मेट वापरणार नाही; पण सायकलसाठी खास हेल्मेट परिधान करतील, अशी परिस्थिती आहे. शहरातील अशा सायकलवीरांचा सगळा थाट पाहिल्यावर वाटते, नाशिकमध्ये सायकल चळवळ रुजली आहे. मात्र तसे पाहिल्यास सायकलसाठी नाशिकमध्ये मूलभूत सुविधाच नाहीत.

त्यामुळे छोट्या स्वरुपात का होईना सुरू झालेली ही चळवळ ‘कोपहेगन’च्या तोडीस तोड होण्यासाठी येथील संघटना, पदाधिकारी, महानगरपालिका व प्रशासन यांनी मोठा पाठपुरावा करण्याची नितांत गरज आहे. आमदनी वाढल्याने किंवा मौज म्हणून महागड्या सायकल मिरवल्याने शहरात सायकल चळवळ रुजू शकत नाही. मोठमोठे सायकल इव्हेंट घेतल्याने आणि सायकल टूर काढूनही काही साध्य होणार नाही.

तरीही गेल्या काही वर्षांपासून सायकलिंगच्या नावाखाली स्वछंद चमकोगिरी सुरू असल्याचे पाहायवयास मिळत आहे. सध्या नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात सायकलिस्ट तयार होत आहेत. यासह विविध सायकल संघटनांचीही त्यात कमतरता नसून त्यातून माझी आणि तुझी संघटना ‘मोठी’ असे म्हणण्यातच पदाधिकारी अर्धा वेळ खर्ची करीत असल्याचे पाहायला मिळत आहे.

सायकल चळवळ नेमकी काय असते हे जर पाहायचे असेल तर परदेशातील डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगन नजरेखाली घालावी लागेल. येथे खरा सायकलींचा स्वर्ग आहे, असे म्हणायला वावगे वाटायला नको. या शहराने दहा वर्षांचे सायकल धोरण आखून सायकल मार्ग तयार करण्यास प्राधान्य दिले. तसेच तब्बल 85 ते 90 हजार कोटी रुपये निव्वळ सायकलींच्या पायाभूत सुविधांवरच खर्च केले. शिवाय शहर प्रदूषणमुक्त आणि स्वच्छ आहे.

त्यामुळेच कोपेनहेगन हे जगातील पहिल्या स्थानावरील सायकलींचे शहर म्हणून ओळखळे जाते. खरीखुरी सायकल चळवळ रुजवण्यासाठी मूलभूत सुविधा महत्त्वाच्या आहेत. सायकलसाठी आवश्यक एकही सुविधा नाशिकमध्ये नाही आणि त्यादृष्टीने कुणाचे प्रयत्नही सुरू नाहीत. त्यामुळे नाशिकमध्ये खर्‍या अर्थाने सायकल चळवळ आणि नाशिकचे कोपेनहेगन करायचे असेल तर सर्व सायकल संघटना व पदाधिकार्‍यांनी आपापसातील हेवेदावे बाजूला सारून महानगरपालिका व राज्य शासनाकडे सायकल ट्रॅक, सुरक्षित रस्त्यांसाठी पाठपुरावा करणे गरजेचे आहे. तसेच स्वतंत्र सायकल धोरणासाठी प्रयत्न आवश्यक आहे.

सायकलिस्ट संघटनांनी इव्हेंटवर प्रचंड खर्च केला तरीही सायकल वापरणार्‍यांचे प्रमाण वाढणार नाही. यासाठी संघटनांनी फक्त आणि फक्त पाठपुरावा, चिकाटी, प्रयत्न व एकीचे बळ दाखवण्याची गरज आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!