Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

जिल्हाधिकार्‍यांनी पीककर्ज वाटपावरून बँकांना झापले; गती वाढवण्याचे आदेश

Share

नाशिक । प्रतिनिधी
खरीप हंगाम सुरू झाला असताना जिल्हा बँकेकडून शेतकर्‍यांना मात्र सढळ हाताने पीककर्जवाटप केले जात नसल्याचे समोर आले आहे. बँकेकडून 13 हजार शेतकर्‍यांना 167 कोटी 24 लाख इतकचे कर्जवाटप करण्यात आले आहे. या प्रकरणी जिल्हाधिकार्‍यांनी बँकेच्या अधिकार्‍यांना झापले असून पीककर्ज वाटपाची गती वाढवण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

पीककर्ज वाटपाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सोमवारी जिल्हा बँक, सहकारी, खासगी व राष्ट्रीयकृत बँक प्रतिनिधींची बैठक घेतली. यावेळी त्यांनी पीककर्ज वाटपाची गती वाढवण्याचे आदेश दिले. पावसाळा सुरू झाला असून शेतकर्‍यांनी पेरण्यांना सुरुवात केली आहे. त्यासाठी त्यांना अर्थपुरवठ्याची गरज आहे. जिल्हा बँक ही अर्थवाहिनी समजली जाते. तसेच विविध सहकारी बँका, कार्यकारी सेवा सहकारी संस्थांकडून शेतकर्‍यांना कर्जवाटप केले जाते

. मात्र यंदा पीककर्ज वाटपाचा वेग कमी असल्याचे बैठकीत निष्पन्न झाले. राज्य शासनाने केलेल्या शेतकर्‍यांच्या कर्जमाफीपोटी जिल्हा बँकेला 660 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. मात्र या रकमेचा विनियोग कर्जवाटपासाठी केला गेला नसल्याचे बैठकीत समोर आले. जिल्ह्यात 13 हजार 124 शेतकर्‍यांना 167 कोटी 24 लाख रुपये पीककर्ज वाटप करण्यात आले आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँक ही शेतकर्‍यांची जीवनदायिनी आहे. असे असताना गतवर्षाच्या तुलनेत पीककर्ज वाटप कमी झाल्याने जिल्हाधिकार्‍यांनी हे प्रमाण वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँक कर्जवाटपाचा लक्षांक पूर्ण करू शकत नसल्याने जिल्ह्यातील इतर राष्ट्रीयकृत बँकांना लक्षांक वाढवून देण्यात आला आहे. तसेच युको बँक, बँक ऑफ महाराष्ट्र व एचडीएफसी बँक कर्जवाटपात अग्रेसर असल्याचे समोर आले. स्टेट बँक ऑफ इंडिया व इतर बँकांनी कर्जवाटपात प्रगती करण्याच्या सूचना जिल्हाधिकार्‍यांनी बैठकीत दिल्या.

शेतकर्‍यांना खरीप पीककर्ज हवे असल्यास त्यांनी गावातील संबंधित बँकांशी संपर्क साधावा. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून पीककर्ज प्राप्त करावे.
– सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!