पुणेरोडवरील बजरंगवाडीत सराईताचा गळा चिरून खून

0

नाशिक । प्रतिनिधी
सराईत गुन्हेगार युवकाच्या गळ्यावर वार करून अज्ञातांनी त्याचा निर्घृण खून केल्याची घटना रविवारी (दि.10) रात्री पुणे रोडवरील बजरंगवाडीतील रस्त्यावर घडली. यामुळे परिरात भीतीचे वातावरण होते.

गजेंद्र ऊर्फ गजानन दीपक गावित (28, रा. बजरंगवाडी, पुणे रोड, नाशिक) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गजेंद्र हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील संशयित होता. त्याच्यावर शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत, गजेंद्र हा रविवारी रात्री साडेनऊ ते पावणेदहा वाजता बजरंगवाडी येथील पुणे रोडवर असलेल्या नाल्याच्या रस्त्यावर उभा होता. या वेळी अज्ञात संशयित आले; त्यांनी आपल्याकडील धारदार हत्यार काढून गजेंद्रच्या मानेवर, छातीवर, गळ्यावर, पाठीवर, तसेच पोटावर सपासप वार केले. या घटनेत गंभीर जखमी होऊन अतिरक्तस्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, गुन्हे व विशेष शाखेच्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौघुले, विभाग 2 चे सहाय्यक पोलीस आयुक्त शांताराम पाटील, मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, उपनगरचे पोलीस निरीक्षक प्रभाकर रायकर, युनिट 1 चे पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, मध्यवर्ती गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या खुनाचे नेमके कारण अद्याप समजले नसून, संशयिताचाही शोध लागलेला नाही. याबाबत मयत गजेंद्रचे वडील दीपक सीताराम गावित यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ करीत आहेत.

दरम्यान, बजरंगवाडीत घडलेल्या खूनप्रकरणी अज्ञात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, हा प्रकार पूर्व वैमन्स अथवा गुन्हेगारी वर्चस्वातून झाला असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

*