पार्टीसाठी पैसे नसल्याचे सांगितल्याने ‘बर्थडे बॉय’च्या डोक्यात टाकला रॉड; चौघांविरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल

0

नाशिक । प्रतिनिधी

बर्थडे बॉय आणि मित्रांमध्ये पार्टीच्या कारणावरून झालेल्या राड्यात चौघांविरोधात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काल रात्री गंगापूर शिवारातील भवर टॉवर येथे ही घटना घडली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात आपल्यावर व मित्रांवर प्राणघातक हल्ला केल्याची फिर्याद दिल्यानंतर गंगापूर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अतुल बापूराव निकम (वय-24, रा. रूम नंबर 4, पाथर्डी लिंक रोड, नाशिक) व त्याचा मित्र गणेश सुधाकर क्षीरसागर (वय 20, रा. 4, सिद्धिविनायक टॉवर, शिवाजीनगर, नाशिक) अशी या राड्यात जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.

यातील जखमी अतुल हा सराईत असून त्याच्यावर शहर पोलिसांत चोरीचे गुन्हे दाखल आहेत. अतुलने दिलेल्या फिर्यादीनुसार त्याचा मित्र बर्थडे बॉय सौरभ यादव (रा. शिवाजीनगर, गंगापूर शिवार) याचा काल (दि.12) वाढदिवस होता. त्यामुळे रात्री 9 वाजता अतुल व त्याचा मित्र गणेश हे गंगापूर शिवारातील शिवाजीनगर येथे असलेल्या भवर टॉवरजवळील हर्षल चायनिजच्या समोर आले होते.

यावेळी त्यांनी मित्र सौरभ याच्याकडे वाढदिवसाची पार्टी मागितली. त्या कारणातून सौरभ यादव व त्याचा मित्र शुभम् कुमावत (रा. अशोकनगर, सातपूर) यांनी कुरापत काढून अतुल व गणेश या दोघांना शिवीगाळ केली.

त्यानंतर सौरभने आपल्या हातातील धारदार हत्याराने अतुल निकम याच्या छातीवर व डोक्यावर वार करून गंभीर जखमी केले, तर संशयित शुभम् कुमावत याने हातातील लाकडी दांड्याने मारून प्राणघातक हल्ला केला.

या घटनेत दोघे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, या घटनेतील संशयित बर्थ-डे बॉय सौरभ यादव यानेही अतुल निकम व त्याच्या साथीदाराविरुद्ध प्राणघातक हल्ला केल्याची फिर्याद दाखल केली आहे.

त्याच्या फिर्यादीनुसार वाढदिवसाच्या पार्टीसाठी अतुल निकम व गणेश क्षीरसागर हे पैसे मागत होते. मात्र त्यांना पैसे नाहीत, असे सांगितले असता त्याचा राग येऊन त्यांनी सौरभ यादव व त्याचा मित्र शुभम कुमावत या दोघांच्या डोक्यात रॉड टाकून त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

या घटनेतील गंभीर जखमी सौरभ अशोक यादव (वय-20, रा. माऊली हाऊसिंग सोसायटी शिवाजीनगर, गंगापूर शिवार) याने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित अतुल, गणेश व सौरभ यादव हे एकमेकांचे मित्र आहेत. काल (दि. 13) बर्थडे असल्याने संशयित अतुल व गणेश यांनी सौरभकडे पार्टीसाठी पैसे मागितले; मात्र सौरभने पैसे नसल्याचे सांगताच दोघांना राग येऊन त्यांनी सौरभ व त्याचा मित्र शुभम् कुमावत यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

तसेच अतुल याने आपल्या कारमधून रॉड काढत सौरभच्या डोक्यावर व पायावर टाकून त्याला गंभीर जखमी केले, तर त्याचा मित्र शुभम् कुमावत याच्याही डोक्यात रॉड टाकून त्याचे डोके फोडत त्याला ठार करण्याचा प्रयत्न केला. याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. दाखल असलेल्या परस्परविरोधी दोन गुन्ह्यांचा तपास गंगापूर पोलीस करीत आहे. जखमी संशयितांवर उपचार सुरु आहे.

LEAVE A REPLY

*