Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

‘दृश्यम’ चित्रपट पाहून सराईत टेंम्बर्‍याचा चुलत भावानेच काढला काटा

Share

पंचवटी | वार्ताहर

हिरावाडीतील गुंजाळबाबा नगरमध्ये एका गटारीच्या चेंबरमध्ये मंगळवार (दि.16) रोजी अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आला होता. दरम्यान हा मृतदेह सराईत गुन्हेगार विक्की उर्फ टेम्बर्‍या भुजबळचा असल्याचे उघडकीस आल्यावर पोलीस तपासात टेम्बर्‍या भुजबळचा खून त्याचा चुलत भाऊ व मित्राने मिळून केल्याचे निष्पन्न झाले आहे.

विशेष म्हणजे संशयितांनी अजय देवगणचा ‘दृश्यम’ चित्रपट पाहून भुजबळचा काटा काढल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध खुनाचा व पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी मयत विकी याचा चुलत भाऊ संशयित रोहन दिलीप भुजबळ(वय 30 रा. कालिका नगर, फुलेनगर) आणि अनिल मुन्ना भोंड (वय 31 रा, महाराणा प्रताप चौक, फुलेनगर, पंचवटी) या दोघांना अटक केली आहे.
हिरावाडीतील गुंजाळ बाबा नगर येथील विहान हॉटेल पाठीमागे गटारीच्या चेंबरमध्ये मंगळवारी(दि.16)अनोळखी युवकाचा मृतदेह पंचवटी पोलिसांना छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आला होता.

साधारण तीन ते चार दिवस चेंबरमधील पाण्यात मृतदेह राहिल्याने ओळखणे देखील मुस्किल होते. यावेळी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. घटनेनंतर हा मृतदेह कोणाचा आहे त्याचा शोध घेत असताना त्याच्या डाव्या हातावर गोदलेल्या नावामुळे सराईत गुन्हेगार टेम्बर्‍याचा मृतदेह असल्याची ओळख पटली होती.

शवविच्छेदन अहवालात कुठलीही संशयास्पद बाब आढळून आली नसल्याने पोलीस चक्रावून गेले होते. दुसरीकडे टेम्बर्‍याचा मृतदेह गुंजाळबाबा नगरातील चेंबरमध्ये कसा आला ? या ठिकाणी तो कशासाठी आला, त्याच्या बरोबर कोण होते का? त्याचा घातपात झाला का? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले जात असताना पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शोध सुरू केला होता.

यादरम्यान (दि.12) रोजी सायंकाळी कालिका माता मंदिर, फुलेनगर परिसरातील रोहन भुजबळ याचा पुतण्या प्रतीक भुजबळ याच्या आईस्क्रीमच्या दुकानात टेम्बर्‍याने आईस्क्रीम खाल्ली त्यानंतर प्रतीक भुजबळ याने त्याच्याकडे पैसे मागितले असता त्यांच्यात वाद झाला.

यावेळी रोहन भुजबळ दुकानात आला असता त्याच्या समोर टेम्बर्‍याने प्रतीक यास चॉपर दाखवून माझ्याकडे पैसे मागतो का, तुझी व्हीकेट पाडावी लागेल अशी धमकी देत निघून गेला होता. या घटनेच्या दुसर्‍या दिवशी रात्री 8 वाजेच्या सुमारास संशयित रोहन भुजबळ आणि अनिल भोंड हे दोघे कालिका माता मंदिर समोरून आपल्या बुलेट मोटारसायकलवरून टेम्बर्‍यास घेऊन जाताना रोहित येवलेकर आणि रोशन चव्हाण यांनी बघितले होते.

या दोघानी भीतीपोटी ही माहिती कुणालाही दिली नव्हती. पोलिसांनी दोघाना विश्वासात घेतल्यानंतर या घटनेचा उलगडा झाला. या जटील खून प्रकरणाचा उलगडा शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकासह पंचवटी पोलिसांनी केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे करीत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!