Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

‘मुथूट दरोडा प्रकरण : असा’ शिजला मुथूट फायन्सास दरोड्याचा कट

Share

नाशिक । खंडू जगताप 
शहरातील मुथूट दरोडा, गोळीबार प्रकरणी अटक केलेल्या मुख्य सूत्रधार जितेंद्र विजय बहादूर सिंग (रा. जौनपूर, उत्तर प्रदेश) याला खुनाच्या प्रकरणात शिक्षा भोगत असताना मुज्जफरापूर तुरुंंगात ओळख झालेल्या मनीष रॉय या गुंडाच्या मार्गदर्शनाखाली उत्तर प्रदेशमधील रामपूर (जोधपूर) येथे एका लग्नात जितेंद्र, परमेंदर, अनुज साहू यांच्या झालेल्या भेटीत 19 फेब्रुवारीला या दरोड्याचा कट रचण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

रामपूरनंतर सुरत येथे पुन्हा ते एकत्र आले होते यावेळी त्यांनी कटाचे बारकाईने नियोजन केले होते. पप्पू ऊर्फ अनुज साहू याची चुलत बहीण ही नाशिक, सातपूर औद्योगिक वसाहतीतील श्रमिक नगर येथे राहण्यास आहे. कट रचलेले सराईत चौघे तिच्याकडे काही दिवस राहण्यासाठी आल्यानंतर त्यांची ओळख मूळचा उत्तर प्रदेश येथील असलेल्या व जवळच राहणार्‍या सुभाष गौड याच्याशी झाली.

सुरक्षा संस्थेत काम करणारा सुभाष गौडला मुथूट फायनान्सची चांगली माहिती होती. उंटवाडी रोडवरील कार्यालयात एकच सुरक्षा रक्षक असल्याने याच ठिकाणी दरोड्याचा बेत त्यांनी पक्का केला होता. यासाठी सुमारे 7 वेळा रेकी करण्यासाठी सराईत नाशिकला येऊन गेले होते. 21 मे ला सर्वजण पिस्तूल तसेच इतर तयारीनिशी पुन्हा नाशिकला आले होते. ते सर्वजण सुभाष गौडकडे मुक्कामी राहिले होते. यानंतर त्यांनी पुन्हा रेकी करून 14 जून हा दिवस निश्चित केला होता.

त्यानुसार सकाळी 11 च्या सुमारास विविध ठिकाणी दुचाकी उभ्या करून ते पहिल्या मजल्यावर असलेल्या कार्यालयात आले होते. या ठिकाणी शाहू पुढे गेला. त्याची तपासणी करून सुरक्षा रक्षकाने कार्यालयाच्या दरवाजा उघडताच जीन्यात तोंडावर कापड बांधलेले व लपून बसलेले सर्वजणांनी सुरक्षा रक्षकाला ढकलून देत आत प्रवेश केला. सर्वांच्या हातात पिस्तूल असल्याने कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी शांत झाले होते. त्यांनी व्यवस्थापकास मारहाण करत लॉकरच्या चाव्यांची मागणी केली.

दरम्यान संधी साधत ऑडिटरशेजारी बसलेल्या सांजू सॅम्युअल याने जवळील सायरन वाजवला. यामुळे सर्व विचलित झाले. यामुळे त्यांनी इतरांना मारहाण सुरू केली. सांजूने अनपेक्षितपणे हल्ला करत तिघा दरोडेखोरांना खाली लोळवले. यामुळे चिडलेल्या परमेंदर सिंग याने त्यावर जवळून 5 गोळ्या झाडल्या. सायरन, गोळ्या, गोंधळ यामुळे नागरिक गोळा होण्याच्या भीतीने दरोडेखोरांनी तेथून धूम ठोकली.

मुथूट कार्यालयाच्या खालीच रोडवर उभ्या केलेल्या पल्सर दुचाकींवरून त्यांनी रामशेज शिवारात जाण्यासाठी 28 मिनीटे लागणारे अंतर अवघ्या 18 मिनीटांत पार केले. दरम्यान, त्यांनी चालत्या गाडीवरच शर्ट बदलले, तसेच दोन वेळा गाडीवरील साथीदारांची अदलाबदली करत पोलीस नाक्यावरून सहीसलामत सुटका करून रामशेज शिवारात गाड्या टाकून दिल्या. तेथून खासगी वाहनाने त्यांनी सूरत गाठले. या ठिकाणी सर्वांनी केसांची स्टाईल बदलली. तसेच दाढ्या करून कपड्यांची स्टाईल बदलून सर्व वेगवेगळ्या दिशांनी पसार झाले.

मनीष रॉय दरोडा किंग
मुज्जफरापूर तुरुंगात मुख्य सूत्रधार जितेंद्र विजय बहादूर सिंग याला भेटलेला मनीष रॉय हा उत्तर प्रदेशातील सोने दरोड्यातील किंग आहे. त्यानेच जितेंद्र या टोळक्यांना मुथूटसारख्या संस्था व त्यांच्या लुटीची पद्धत समजावून सांगत मार्गदर्शन केले होते. तर यातील अनुज साहू हा पश्चिम बंगालमधील राजकीय परिवाराशी संबंधीत आहे. त्याच्यापर्यंत दोन वेळा पोलीस पोहोचले होते. मात्र त्याला अगोदरच माहिती मिळाल्याने तो पसार होण्यात यशस्वी झाला.

5 कोटींचे सोने लूटण्याचा प्लॅन
प्रारंभी या टोळीने नाशिकसह, जळगाव, औरंगाबाद येथील मुथूट फायनान्स कार्यालयांची रेकी केली होती. अशा ठिकाणी दरोडा टाकून कोणताही रक्तपात न करता किमान 4 ते 5 कोटी रुपयांचे सोने पळवण्याचा त्यांचा कट होता, मात्र अनपेक्षित विरोधाने तो फोल ठरला. विशेषतः पूर्ण कालावधीत संशयितांनी मोबाईल फोनचा वापरच केला नव्हता.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!