महिनाभरात शहरात अर्धाडझन खून; नवीन वर्षात खून, हल्ल्यांमध्ये झाली वाढ

0

नाशिक । प्रतिनिधी
नवीन वर्षाच्या प्रारंभापासून शहरात खूनाचे तसेच खुनी हल्ल्याचे प्रकार वाढले आहेत. महिनाभराच्या कालावधीत शहरात अर्धाडझन खून झाले असून खून रोखण्याबाबत पोलीस अपयशी ठरत असल्याची चर्चा आहे.

मागील वर्षभरात खुनाच्या घटनांमध्ये घट झाल्याचा दावा पोलीस प्रशासनाने केला असताना नवीन वर्षात मात्र 8 जानेवारी ते 10 फेब्रुवारी दरम्यान महिनाभराच्या कालावधीत 6 खून झालेे आहेत. यामध्ये एक व्यवसायिक, एक तरुणी व चार युवकांचा समावेश आहे. राजरोस घडणार्‍या खुनाच्या घटनांनी नाशिक हादरले आहे.

नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात 8 जोनवारीला इंदिरानगर भागात सहा लाखांची रोकड लुटून नेत एका मॉलच्या मालकाची संशयितांनी निर्घृण खून केल्याची घटना घडली होती. पोलीस यंत्रणाही या घटनेनी तितकीच हादरली आणि तत्काळ इंदिरानगर पोलीस ठाणे, गुन्हे शाखा, पंचवटी पोलीस ठाण्यांकडून या खुनाचा समांतर तपासाला गती दिली गेली. तरी सुमारे आठ दिवसांनी यातील संशयितांना पकडण्यात पोलिसांना यश आले. व्यवसायिकाच्या खुनाच्या दुसर्‍याच दिवशी 9 जानेवारीला कॉलेजरोडसारख्या उच्चभ्रू परिसरातील एका व्यावसायिक संकुलाच्या टेरेसवर तरुणीचा मृतदेह गंगापूर पोलिसांना आढळून आला.

18 ते 20 वयोगटांतील या तरुणीची हत्या तिच्या प्रियकरानेच केल्याचे तपासात उघड झाले. अशोक स्तंभ परिसरात विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या तिच्या प्रियकरास पंचवटी पोलिसांंनी अटके केले. या घटनेला चार दिवस पूर्ण होत नाही, तोच 15 जोनवारीला मकरसंक्रांतीच्या रात्री भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंजमाळ भागात क्षुल्लक कारणावरून टोळक्याने धारदार शस्त्राने हल्ला चढवून युवकाला ठार मारले.

तर 28 जानेवारीला उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जेलरोड भागात आत्येबहिणीच्या हळदीला आलेल्या व टोळक्याचे भांडण सोडविण्यासाठी मध्यस्ती करणार्‍या युवकाची धारधार शस्त्राने टोळक्याने हत्या केल्याची घटना घडली. आठवडाभराने 8 फेब्रुवारीला अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत भर दुपारी नवीन नाशिकच्या शुभम पार्क परिसरात गजबजलेल्या चौकात उभ्या असलेल्या एका युवकाला दोघांनी दुचाकीवरून येत भोसकल्याची घटना घडली. या घटनेला दोन दिवस होत नाही तोपर्यंत 10 फेब्रुवारीला रात्री सराईताचा नाशिक पुणे रोडवर खून झाला आहे.

या घटनांनी नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. पोलिसांंनी खूनाच्या घटनांनतर झटपट संशयितांना अटक केली आहे. मात्र अशा घटना रोखण्यासाठी कडक पाऊल उचलण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

नवीन टोळक्यांचे आव्हान
शहर पोलिसांनी गुन्हेगारी टोळ्यांंच्या म्होरक्यांना कैद केले असले तरी त्यांच्याच मार्गदर्शनाखाली शहरात विविध ठिकाणी नव्या टोळ्या कायार्न्वित झाल्याचे चित्र आहे. अनेक भागात भाईगिरी, हप्ते वसुली, अवैध धंदे करणार्‍या टवाळ्यांच्या टोळ्या कार्यरत झाल्या आहेत. त्यांच्या वर्चस्वातून असे खून होत असल्याने पोलिसांसमोर या नव्या टोळक्यांचे आव्हान निर्माण झाले आहे.

 

LEAVE A REPLY

*