Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

आंबे पिकवण्यास कार्बाइडचा सर्रास वापर; नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

Share

नाशिक | प्रतिनिधी
आंंबे लवकर पिकवण्यासाठी घातक असणार्‍या कॅल्शियम कार्बाईडचा वापर करणार्‍या विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई सुरू आहे. तथापी, दुकानदार व काही व्यापार्‍यांकडून शहरात सर्रास आंबे पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडचा वापर सुरूच असल्याने नागरिकांच्या जिवाशी खेळ खेळला जात आहे.

अक्षय्यतृतीयेपासून खर्‍या अर्थाने आंब्याचा हंगाम सुरू होतो. आंब्याच्या वाढत्या मागणीबरोबरच फसवणुकीचे प्रकारही वाढले आहेत. कॅल्शियम कार्बाईडमुळे अतिरिक्त उष्णता निर्माण होऊन आंबा लवकर पिकतो. मात्र, अशा पद्धतीने पिकवलेले आंबे खाल्ल्यामुळे तोंडाला फोड येणे, त्वचेवर दाण्यासारखे डाग पडणे, पचनसंबंधी विकार व कर्करोग होण्याचीदेखील भीती असते. फळे पिकवण्यासाठी कार्बाईडचा वापर करणे हा गुन्हा आहे.

सध्या राज्यासह परराज्यांतून मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक सुरू आहे, पण हा आंबा कोणत्या पद्धतीने पिकवला जातो, याबाबत नागरिकांनी जागरूक राहणे आवश्यक आहे. शासनाकडून यासंदर्भात जागृती केली जात नसल्याने कार्बाईडने आंबे पिकवणार्‍यांचे फावत आहे. कार्बाईडने पिकवलेला आंबा कसा ओळखावा, त्याचे धोके काय, याबाबत माहिती नसल्याने नागरिक दर्जेदार आंबा म्हणून या विषारी आंब्यांची बिनधास्तपणे खरेदी करत आहेत.

रहा सावध
गवताची अढी, भाताचे पिंजर पसरून पारंपरिक पद्धतीने आंबे पिकवण्याऐवजी काही व्यापारी मंडळी कॅल्शियम कार्बाईडचा वापर करत आहेत. पूर्वी आंब्यावर पावडर मारली जायची, त्यामुळे ओळखू येत, परंतु आता सध्या एखाद्या पुडीत कार्बाईड बांधून आंब्यांजवळ ठेवून दिले जाते. कॅल्शियम कार्बाईडच्या पुडी आंब्याच्या बॉक्समध्ये ठेवल्यास नैसर्गिकरित्या दहा दिवसांनी पिकणारा आंबा दोनच दिवसात पिकतो.

कार्बाईडचे खडे कागदात ठेवल्यास त्यातून ऍसिटिलिन गॅस बाहेर पडतो. ऍसिटिलिन गॅस 15 तासांत 200 किलो फळातील हरितद्रव्य काढून घेतो. त्यामुळे आंबा लवकर पिकतो. जास्त नफा कमावण्यासाठी लवकर आंबा पिकण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडचा वापर केला जातो. लोकांच्या जिवाशी खेळला जात असलेला हा घातक फॉर्म्युला यावर्षी अधिक वापरला जात आहे.

काबार्र्ईड घातकच
कॅल्शियम कार्बाईड विषारी आहे. त्यात फॉस्फरस अर्सेनिकचेही अंश असतात. आंब्यातून ते पोटात गेल्यास मळमळ, छातीत जळजळ, डोके दुखणे, डोळ्यासमोर अंधारी, जुलाब आदी लक्षणे दिसून येतात. पोटात अ‍ॅसिटिलीन गॅस तयार होऊन मज्जासंस्थेवर घातक परिणाम होऊ शकतात. तसेच क ॅल्शिअम कार्बाईडमुळे कॅन्सरही होऊ शकतो.
-डॉ. आनंद पवार, एमडी

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!