अविश्वास ठराव बारगळला ; उद्याची विशेष महासभाच रद्द

0

नाशिक । गेल्या सोमवारपासून राज्यभर चर्चेत आलेल्या नाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात सत्ताधारी भाजपने आणलेला अविश्वास ठराव अखेर बासनात गुंडाळण्यात आला आहे. यासंदर्भातील विशेष महासभेला अवघे चोवीस तास शिल्लक असताना मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर महापौर रंजना भानसी यांनी हा ठराव मागे घेत असल्याचे जाहीर करीत संपुर्ण करवाढ रद्द करण्यासंदर्भातील तलवार म्यान केली.

आज सायंकाळी महापौरांनी आपल्या अधिकारात उद्या (दि.1) बोलावलेली विशेष महासभा रद्द केली आहे. दरम्यान, संपूर्ण करवाढ रद्द करण्याच्या मागणीवर शिवसेना, कॉग्रेस व मनसेना ठाम असून सेनेने आता भाजप विरोधातच अविश्वास आणण्यासाठी जनता दरबारात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

महापौर निवास ‘रामायण’ येथे आज सकाळी महापौरांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या आदेशानुसार आम्ही अविश्वास ठराव उद्याच्या महासभेत मागे घेणार असल्याचे सांगत महापौर म्हणाल्या, आयुक्तांनी करयोग्य मुल्य दरात 50 टक्के कपात केल्याचे शुध्दीपत्रकातून स्पष्ट करीत ते दोन पाऊले मागे आले आहे. यात शेतकर्‍यांसंदर्भातील पुर्वी असलेला 3 पैशाचा कर तसाच ठेवला आहे. अजुनही यात काही त्रुटी असुन येत्या 15 दिवसात आम्ही मुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्याकडे जाऊन त्या कमी करुन दिलासा देणार आहे. यातील काही कमर्शियल कमी करणे, शेतीवर कर शुन्य करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना सांगणार असुन ते नाशिककरांना निश्चित न्याय देतील, असेही महापौरांनी स्पष्ट केले. अशाप्रकारे आयुक्तांच्या विरोधात उतरलेल्या महापौरांसह पदाधिकार्‍यांनी आपली तलवार म्यान केली.

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यपध्दतीवर आक्षेप नोंदवत मुंढे यांच्याविरुध्द सत्ताधारी भाजपने गेल्या सोमवारी अविश्वास ठराव आणला होता. करयोग्य मुल्य दरात भरीव करवाढीसह अनेक मुद्दे पुढे करीत भाजपकडुन गेल्या दिवसापासुन आयुक्त हटविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. तर सोशल मीडीयावर मुंढे यांचे समर्थन आणि त्यांना विरोध असे सोशल वोॅर सुरू झाले होते. सोशल मीडीयावरील वॉर लक्षात घेऊन सत्ताधार्‍यांनी यात कसर राहु नये म्हणुन शहरातील दीडशेच्यावर सामाजिक संस्था, संघटनांकडुन ठरावाच्या बाजुने आयुक्त हटविण्यसाठी पत्र – निवेदन स्विकारले जात होते. सत्ताधारी भाजपकडुन आयुक्तांना हटविण्याचे शथीर्र्चे प्रयत्न अंतीम टप्प्यात आले असतांनाच हा प्रकाराच अयोग्य असल्याचे स्पष्टीकरण पालकमंत्री गिरीष महाजन देत याघडामोडीसंदर्भात आपण अनभिज्ञ असल्याचे दाखविले. यातून भाजप स्थानिक पदाधिकारी उघडे पडले होते.

याच दरम्यान आयुक्त मुंढे यांनी मुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्या चर्चा करुन जाहीर केलेल्या करयोग्य मुल्य दरात 25 ते 50 टक्के कपात केल्याचे जाहीर करीत नाशिककरांना दिलासा देत असल्याचे जाहीर केले. आयुक्तांनी स्थानिक पदाधिकार्‍यांशी कोणतीही चर्चा न करता थेट वरिष्ठ पातळीवरुन निर्णय घेत अविश्वास ठरावातील हवाच काढुन घेतली. भरीव करवाढीच्या विरोधात नाशिककरांसोबत असल्याचे रान पेटविणार्‍या सत्ताधारी भाजपने अचानक वरिष्ठ नेत्याच्या आदेशावरुन ठराव मागे घेतल्याचे जाहीर केले. या प्रकारामुळे सत्ताधारी भाजपच्या दोन भुमिका समोर आल्या आहे. करवाढीसंदर्भातील सामान्याचा रोष मात्र अद्याप कायम असल्याने या प्रकरणाचा मोठा फटका भाजपा बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

चाचपणीनंतर विशेष महासभा रद्द
महापौरांनी सकाळी आयुक्तांच्या विरोधातील अविश्वास प्रस्ताव मागे घेत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर पुन्हा पक्षनेत्यांच्या सायंकाळी आलेल्या दूरध्वनीनंतर उद्याची विशेष महासभाच रद्द करण्याच्या हालचाली केल्या. याकरिता विशेष महासभेची मागणी करणार्‍या पंधरा सदस्यापैकी 13 सदस्यांची विशेष महासभा रद्द करावीत अशा आशयाच्या पत्रावर स्वाक्षरी केल्या. तरीही कायदेशीर अडचणी येऊ नये म्हणून सल्ला घेत महापौरांनी उद्याची विशेष महासभाच रद्द केल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली.

LEAVE A REPLY

*