जिल्हाधिकारी होणार सहखातेदार

0
नाशिक । नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गासाठी शेतकर्‍यांनी दिलेल्या जमिनीच्या मोबदल्याचे पैसे कुटुंंबातील व्यक्ती मौजमजेत उडवण्याच्या धास्तीनेच द्विधा मन:स्थितीत असलेल्या शेतकर्‍यांंसाठी जिल्हाधिकार्‍यांनी नामी उपाय शोधला आहे.

आपले पैसे नाहक जातील, अशी भीती असणार्‍यांसाठी जिल्हाधिकारी स्वत: सहखातेदार होण्यास तयार आहेत. त्यामुळे जमिनीच्या मोबदल्याच्या पैशांची कुणाला चिंता असल्यास अशा शेतकर्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांशी संपर्क साधल्यास ते या कामी संपूर्ण सहकार्य देण्याच्या तयारीत आहेत.

‘समृध्दी’ महामार्गासाठी अनेक शेतकरी जमीन देण्यास तयार आहेत. परंतु कुटुंबातील अंतर्गत वाद, सदस्यांच्या वाईट सवयी आणि मुले असल्यास त्यांच्याकडून आई-वडिलांना दमदाटी करुन पैसे मौजमजेत उडवणे, व्यसनी पतीने पैशांची उधळपट्टी करणे अशा अनेक कारणांनी कुटुंबप्रमुख इच्छा असतानाही समृध्दी महामार्गासाठी शासनाला जमीन विक्री करण्यास तयार नाहीत. असे काही शेतकरी जमीन देण्याबाबत द्विधा मन:स्थितीत आहेत. त्यामुळे प्रशासनालाही जमिनी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत.

विशेष म्हणजे शेतकर्‍यांकडून जमिनी विक्रीस संमती देण्यासह खरेदी झाल्यानंतर त्या जमिनी सहज मिळण्याची प्रशासनाला अपेक्षा होती. परंतु आता शेतकरी स्वत:च येणारे पैसे सुरक्षित नसल्याच्या तक्रारी जिल्हाधिकार्‍यांकडे करत आहेत. ‘जमीन देण्यास हरकत नाही, पण आलेले पैसे व्यर्थ खर्च होतील, भविष्यात रस्त्यावर येण्याची वेळ आमच्यावर येईल. त्यामुळे आमची जमीन आहे तशीच राहू द्या’ अशा विनवण्याही शेतकरी करत आहेत.

तथापि, अशा अडचणी असलेल्या शेतकर्‍यांंचे बँकेत सहखातेदार होण्याचा नवा उपाय जिल्हाधिकार्‍यांंनी शोधला आहे. त्यानुसार पर्यायी जमीन घेणे, उदरनिर्वाहाची काही व्यवस्था करणे किंवा घर खरेदी करणे यासह महत्वाच्या कामासाठी अथवा घरातील कर्ता व्यक्तीने पैशाची मागणी केल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांंच्या स्वाक्षरीने संबधित शेतकर्‍यांना देण्यात आलेली मोबदला रक्कम बँकेतून काढता येईल.

म्हणजे त्यांची रक्कमही सुरक्षित राहील. त्यामुळे शेतकर्‍यांनी अशी अडचण असल्यास माझ्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी.यांनी केले आहे.

या उपायामुळे जमिनीचे पैसे सुरक्षित राहून ते योग्य कामासाठी वापरता येतील. याशिवाय नाहक खर्चालाही आपोआप लगाम लागू शकतो, असे मत जिल्हाधिकार्‍यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

*