Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकआत्मविश्वास हेच करोनाविरूद्धचे प्रमुख अस्त्र – डॉ. सुरेश जगदाळे

आत्मविश्वास हेच करोनाविरूद्धचे प्रमुख अस्त्र – डॉ. सुरेश जगदाळे

खंडू जगताप | नाशिक 

करोनाची आपत्ती संपुर्ण जगावरच कोसळली आहे. याला तोंड देण्यासाठीचा आरोग्य यंत्रणेचा विश्वास हाच या लढ्यातील मुख्य शस्त्र आहे. यासह या आपत्तीत प्रेत्येकाचा सहभाग आहे. प्रशासकीय अधिकार्‍यांची सकारात्मक टीम, लोक प्रतिनिधींचा समन्वय, नाशिककरांचे सहकार्य यातून जी सकारात्मक उर्जा निर्माण झाली आहे यातूनच आपण करोनाला पळवून लावू शकतो असा विश्वास असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी देशदूतशी बोलताना सांगितले.

- Advertisement -

सध्याचे दैनंदिन कामाचे स्वरूप काय कसे आहे ?

या करोना आपत्तीत आरोग्य विभाग हा प्रमुख विभाग आहे. तर या विभाचा प्रमुख म्हणुन माझ्यावर अधिक जबाबदारी आहे. यातून सर्व लहानसहान गोष्टींवर बारकाईने लक्ष द्यावे लागते. यामुळे सकाळी 6 ला सुरू होणारा दिवस रात्री 1 नंतरही सुरू असतो. रूग्ण, उपचार, तांत्रिक बाबी, आदेश, वरिष्ठ अधिकार्‍यांच्या बैठका, अहवाल, समन्वय डॉक्टर, परिचारीका, कर्मचारी यांच्याकडून प्रत्यक्ष अंमलबजावणी, मार्गदर्शन असे कामाचे स्वरूप असते

येणार्‍या ताणावर कशी मात करता?

कोणतेही संकट आले तरी त्याचा संयमाने, शांतपणे, धिराने सामना करायचा अशी अपणास शिकवण आहे. कुटुंबियांचा विश्वास व प्रेम, त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा, शांत मनासाठी योग, योग्य व्यायाम, संगित याद्वारे सर्व तणावावर मात करून पुन्हा नव्या जोमाने पुढील कार्यासाठी जाण्याची माझी सवय आहे.

चिंतेचे वातावरण असताना सकारात्मक्ता कशी मिळवता

संकट कितीही मोठ असो त्यावर मात करायचीच हा विश्वास प्रथमपासून बाळगला, आपण केलेले नियोजन हे शंभर टक्के अचुक असेल व आपल्या सहकार्‍यांमध्ये याचा विश्वास असेल तर कोणतेही संकट सहज परतवून लावू शकतो. हा सर्व विश्वास माझ्या सर्व सहकार्‍यांमध्ये आहे. यामुळे करोनाची कितीही चिंता वाटत असली तरी माझे सहकारी या संकटाशी दोन हात करताना कुठेही कमी पडणार नाहीत हा ऐकमेकांप्रती विश्वास हीच सकारत्मकता आहे.

तुमचे कुटुंबिय, तुमची परिस्थिती कशी हाताळता?

मी कुंटुंबाचा एक भाग असलो तरी माझ्यावरील जनतेची जबाबदारी महत्वाची आहे. याची पुर्ण जाणीव कुटुंबियांना आहे. यामुळे मी किती वाजता घरी आलो, किती वाजता बाहेर पडलो, कितीवेंळ कॉलवर बोललो याबाबत ते सर्व समजून घेतात. काळजी प्रत्येकजण करतो परंतु त्या काळजीचा दबाव माझ्यावर टाकत नाहीत. घरी गेल्यानंतर मी संपुर्ण तांत्रिक बाबी पाळतो. पुर्ण सॅनिटाइझ होऊनच स्वतंत्र खोलीत कार्यरत असतो. घरातही सामजिक अंतर पाळूनच विविध विषयावर चर्चा, गप्पा टप्पा रंगतात.

तुम्हाला कोणाचा आधार वाटतो?

या संकटाचा सामना करणार्‍या सर्व शासकीय यंत्रणेचा ऐकमेकांना आधार आहे. या सर्वात जिल्हाभराचे सुक्ष्म निरिक्षण व अंमलबाजावणी सकारात्मकपणे करून घेणार्‍या जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांचा सर्वाधिक आधार आपणास या काळात वाटातो. त्याचबरोबर या जीवावर बेतणार्‍या संकटाशी लढताना खांद्याला खांदा लावून लढणारा माझा प्रत्येक डॉक्टर, प्रत्येक कर्मचारी, शिपाई या सर्वांच्या आधारावरच आपण ही लढाई लढतोय यापेक्षा अधिक आधार कोणता हवा.

जबाबदारीचे भान, बदलणारी परिस्थिती नियोजनाचा भार हे गणित कसे संभाळता?

करोनाचे संकट चीनला सुरू झाले व ज्या वेगात ते जगभरात पोहचत होते हे पाहता या संभाव्य संकटाचा धोका आम्हाला पुर्वीच लक्षात आला होता. शासकीय आदेश मिळण्यापुर्वीच आम्ही त्या दृष्टीने तयारी सुरू केली होती. 2009 ला स्वाईन फ्लूचे संकट असेच अचानक उद्भवले होते. त्यावेळी सातारा जिल्ह्यात कार्यरत असताना त्याचा सामना करण्याचा अनुभव आता उपयोगी येत आहे. जिल्हाधिकार्‍यांसह वरिष्ठ अधिकार्‍यांनी केलेल्या नियोजनाची अंमलबाजावणी व माझ्या सहकार्‍यांच्या विश्वासतून आम्ही सर्व गणित संभाळत आहोत. ते संकट संपल्यानंतरही कायम असेल.

सहार्‍यांची, त्यांच्या कुटुृबियांची काळजी कशी हाताळता?

करोनाचा धोका जसा सर्वसामन्यांना आहे. त्यापेक्षा तो सर्वाधिक रूग्ण हाताळणारे डॉक्टर तसेच त्यांची सेवा करणार्‍या कर्मचार्‍यांना आहे. परंतु योग्य तांत्रिक पद्धतीने हाताळणी केल्यास आपण पुर्ण सुरक्षित असू हे प्रात्याक्षिकातून मी माझ्या सहकार्‍यांना दाखवून दिले. तोच विश्वास त्यांच्या कुटुंबियांमध्ये निर्माण केला. पीपी किटस सह सर्व तांत्रिक साधणे, औषधांची उपलब्धता व कामाच्या बदलत्या वेळा यातून त्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली जात आहे. आरोग्य विभागातील सर्वांसाठीच हा काळ सर्वाधिक तणावाचा आहे. हा तणाव राहणार नाही अशा पद्धतीचे वातावरण ठेवण्याचा आमचा प्रयत्न कामय आहे.

कामासाठी प्रेरणा कोठून मिळते?

या संकटात न डगमगता, एक पाऊलही मागे न हटता लढणार्‍या माझ्या सहकार्‍यांकडून, वरिष्ठ अधिकार्‍यांच्या रात्रंदिवस सुरू असलेल्या धावपळीतून कायम प्रेरणा मिळत राहते. सर्वजण रात्रंदिवस कार्यरत आहेत. मी का मागे राहायचे असे मन नेहमी सांगत रहाते. रात्री घरी येण्यास दिड दोनही वाजतात परंतु हीच प्रेरणा घेऊन पुन्हा दुसर्‍या दिवशी सकाळी 7 वाजता मी कार्यालयात हजर असतो.

कामासाठीची उर्जा व उत्सहाचे रहस्य काय?

मी हे करूच शकतो हा मनात असलेला शंभर टक्के विश्वास आपल्या कामाची उर्जा आहे. कुटुंबियांकडून मिळणारे प्रेम, त्यांचा तसेच माझ्या सहकार्‍यांचा विश्वास हीच माझ्या कामाची उर्जा व उत्सहाचे रहस्य आहे. यासह लोक प्रतिनिधींकडून, नागरीकांकडून मिळणारे सहकार्य पाहता सर्वांच्या सहकार्यातून या संकटावर आपण सहज मात करू शकतो.

- Advertisment -

ताज्या बातम्या