Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

चारशे ६१ आजारांवर फक्त सरकारी रुग्णालयातच उपचार

Share

नाशिक । प्रतिनिधी
खासगी रुग्णालयात विनाकारण शस्त्रक्रिया करत सरकारी योजनेतून पैसे लाटण्याचा प्रकार मध्यंतरी उघडकीस आला होता. त्यानंतर राज्यातील महात्मा फुले जनआरोग्य योजना व आयुष्मानमधील योजनेअंतर्गत असलेल्या 461 आजारांवर केवळ सरकारी रुग्णालयात उपचार केले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

त्यामुळे खासगी रुग्णालयातून विनाकारण होणार्‍या शस्त्रक्रियांवर नियंत्रण येणार असून रुग्णांच्या फसवणुकीला चाप बसणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारने आयुष्मान आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून गरिबांना आरोग्याचे कवच दिले आहे. दोन्ही योजनांची व्याप्ती वाढवली असून अनेक आजारांवर उपचार करणे आता सोयीचे झाले आहे.

केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी आयुष्मान भारत योजना राज्यात 23 सप्टेंबर 2018 रोजी सुरू झाली. आर्थिकदृष्ट्या न परवडणार्‍या अनेक शस्त्रक्रिया यामध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत 1350 आजारांवर मोफत उपचार केले जातात. या योजनेचा लाभ खासगी रुग्णालयातही मिळावा म्हणून या योजनेत काही खासगी रुग्णालये संलग्न केली आहेत. मात्र खासगी रुग्णालयात विनाकारण रुग्णांवर शस्त्रक्रिया होऊ नयेत यासाठी सरकारने 461 आजारांवरील उपचार हे केवळ सरकारी रुग्णालयात होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

दोन वर्षांपूर्वी गर्भाशय काढण्याचा सल्ला सर्रास दिला जात होता. त्यामुळे महिलांमध्ये या शस्त्रक्रियेचे प्रमाण वाढले होते. अनावश्यक शस्त्रक्रिया खासगी रुग्णालयात केल्या जाऊ नयेत, रुग्णांना विनाकारण शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागू नये यासाठी योजनेची अमंलबजावणी करतानाच सरकारने ठराविक शस्त्रक्रिया व उपचार हे केवळ सरकारी रुग्णालयातच करण्याचे धोरण आखले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!