पोलिसांची जिल्ह्यात ‘विघ्नहर्ता बक्षीस योजना’; डॉल्बीमुक्त गणेशोत्सवाचेे आवाहन

0

नाशिक । गतवर्षीप्रमाणे ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने जिल्ह्यातील गणेश मंडळांसाठी यंदाही ‘विघ्नहर्ता बक्षीस योजना’ घोषित करण्यात आली आहे. तसेच यंदाचा गणेशोत्सव एक गाव, एक गणपतीने एकोपा साधणारा तसेच डॉल्बीमुक्त व्हावा, असे आवाहन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी केले आहे.

जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळांसाठी ‘विघ्नहर्ता बक्षीस योजना’ राबवली जाणार आहे. जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव शांततेत पार पडावा, जनतेमध्ये जातीय सलोखा कायम रहावा, तसेच गणेशोत्सव मंडळांनी विशेषत: तरुणांनी सामाजिक बांधीलकीची जाणीव ठेवून सामाजिक एकोपा वृद्धिंगत होईल, असे संदेश समाजात प्रसारित करावे, यासाठी ग्रामीण पोलीस दलाकडून या गणेशोत्सवाच्या दरम्यान आदर्श गणेशोत्सव मंडळांची निवड करून उत्कृष्ट मंडळांना विघ्नहर्ता बक्षीस योजनेंतर्गत पुरस्कार देऊन गौरवणार आहेत.

विघ्नहर्ता बक्षीस योजनेंतर्गत जिल्ह्यातील पोलीस ठाणेस्तर व उपविभागीय स्तरावर ‘विघ्नहर्ता मंडळ परीक्षण समिती’ स्थापन करण्यात आली आहे. या समित्यांमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील प्रतिष्ठीत व्यक्ती, डॉक्टर, प्राध्यापक, शिक्षक, अल्पसंख्याक सदस्य, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी यांची निवड करण्यात आली असून महिला सदस्यांचाही समावेश असणार आहे. परीक्षण समितीने पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी देवून सजावट, उत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्रम, राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित देखावे, बेटी बचाव, ग्राम स्वच्छता अभियान यावर आधारित देखावे, कार्यक्रम सादर करणार्‍या गणेशोत्सव मंडळांची गुणानुक्रमे माहिती घेऊन आदर्श गणेश मंडळाचा अहवाल जिल्हास्तरीय परीक्षण समितीस सादर करणार आहे.

जिल्हास्तरीय परीक्षण समितीचे अध्यक्ष अपर पोलीस अधीक्षक यांनी निवड केलेल्या एकूण 5 आदर्श गणेशोत्सव मंडळांना गुणानुक्रमांक देऊन प्रथम, द्वितीय, तृतीय व दोन उत्तेजनार्थ अशी जिल्हास्तरावरील बक्षिसे प्रदान करण्यात येणार आहेत. ग्रामीण जिल्ह्यातील गणेशोत्सव शांततेत पार पडावा, यासाठी सर्व पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, शांतता कमिटी, पोलीस मित्र सदस्य, प्रतिष्ठीत नागरिक यांच्या बैठका घेण्यात आलेल्या असून आदर्श गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत सहाभागी होण्याबाबतचे मार्गदर्शन करण्यात आले आहे.

गणेशोत्सव शांततेत पार पडावा, यासाठी पोलीस दलास सहाकार्य करावे, तसेच ध्वनीप्रदूषण होणार नाही, यासाठी सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी डीजे, डॉल्बीमुक्त संकल्पना राबवावी. तसेच एक गाव, एक गणपती ही संकल्पना राबवून सर्व मंडळांनी एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी केले आहे.

अशी असेल गुण मार्गदर्शिका; प्रत्येकी 10 गुण
* मंडळाने धर्मादाय आयुक्त, पोलीस दल यांचेकडून आवश्यक परवाने
* स्टेज, प्रकाश व्यवस्था, विजेची पर्यायी व्यवस्था
* रहदारीस, वाहतुकीस अडथळा
* देखावा, सांस्कृतिक कार्यक्रम यांचा विषय, दर्जा व शिस्त
* पोलिसांनी दिलेल्या अटी व नियमांचे पालन व पोलिसांना सहकार्य
* गर्दी नियंत्रण करण्यासाठी, शिस्त राखण्यासाठी व श्रींच्या मूर्तीचे संरक्षण
करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना
* दर्शनासाठी महिला- पुरुषांकरिता वेगवेगळी रांग
* सुरक्षा विषयक यंत्रणा, उपकरणे, धातुशोधक यंत्र आदी व्यवस्था
* ध्वनी प्रदूषण मर्यादेचे पालन, पर्यावरण जागरूकतेसाठी दिलेले संदेश
*ध्वनीबाबत वेळेचे पाळण्यात येणारे बंधन

LEAVE A REPLY

*