गुन्हेगारी रोखण्यासाठी समीर भुजबळांची पोलीस आयुक्तांंकडे मागणी

0

नाशिक । प्रतिनिधी
शहरात वाढत्या गुन्हेगारीमुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली असून शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना राबविण्याची मागणी माजी खासदार समीर भुजबळ यांनी केली आहे. याबाबत त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळासोबत नाशिकचे पोलीस आयुक्त डॉ.रवींद्रकुमार सिंघल यांची भेट घेऊन निवेदन दिले.

यावेळी माजी खासदार देविदास पिंगळे, माजी आमदार डॉ.अपूर्व हिरे, जयवंत जाधव, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले, दिलीप खैरे, गजानन शेलार,बाळासाहेब कर्डक, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे, सुषमा पगारे, समीना मेमन,कविता कर्डक, सुरेखा निमसे, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे,बाळासाहेब वाघ,संजय खैरणार, संतोष सोनपसारे, मकरंद सूर्यवंशी, सुरेश आव्हाड, धनंजय निकाळे आदी उपस्थित होते.

समीर भुजबळ म्हणाले की, नाशिक शहरातील कायदा-सुव्यवस्था धोक्यात आली असून गेल्या दोन-तीन दिवसांत व्यापार्‍यांची लुट करून धारधार शास्त्राने ठार मारल्याच्या घटना घडल्या आहेत. त्याचप्रमाणे शहरात व्यापार्‍यांवर हल्ले करून लुट होत आहे. यातील काही घटनांबाबत सीसीटीव्हीचे फुटेज मिळूनसुद्धा गुन्हेगार सापडत नसल्यामुळे पोलिसांच्या भूमिकेबाबत संशय निर्माण होत आहे. शहरात रोज-दिवसाआड खुन किंवा खुनाच्या प्रयत्नाच्या घटना घडत आहेत. गुन्ह्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली असून खुन-दरोडे, चोर्‍या,चेन स्नॅचींग, अनैतिक व्यवसाय,जुगार यातील आरोपी हे परिसरात मोकाट फिरत आहे. गटागटांमध्ये संघर्ष वाढत असल्याने खुनाचे सत्र मोठ्या प्रमाणात सुरु आहे. त्यात पोलिसांना गुन्हेगार सापडू नये याबाबत आश्चर्यच व्यक्त होत आहे. गुन्हेगारीमध्ये वाढ झाल्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे म्हटले आहे.

गुन्हेगारांकडून कायदा व सुव्यवस्थेची लक्तरे अक्षरशः वेशीला टांगतानाची चित्रे संपूर्ण शहरात दिसत आहे. सराईत गुन्हेगारांकडून होणार्‍या मारहाणीच्या घटना,खुन,चोर्‍या यांची दहशत कायम आहे ते रोखण्यासाठी पोलीस यंत्रणेकडून केल्या जाणार्‍या उपाययोजना तोकड्या पडत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे नाशिक शहरातील सर्वसामान्य नागरीकांना दिलासा देण्यासाठी बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीरपणे विचार करून शहरातील वाढत्या गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्यात यावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा समीर भुजबळ व राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

*