Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

शहरातील मुली, महिला आता ‘निर्भय’

Share

नाशिक । प्रतिनिधी
महिलांवरील अत्याचार, लैंगिक छळ, छेडछाड, स्त्रीविषयक गुन्हे नियंत्रित करणे आणि गुन्हेगारांची मानसिकता बदलणे या उद्देशाने पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या संकल्पनेतून शहरात 10 निर्भया पथके तयार करण्यात आली आहे. त्यांचे काम पेपरलेस असणार आहे. त्यांच्या कामकाजासाठी ‘एम पोलिस अ‍ॅप’ सुरू करण्यात आले आहे.

शहरात छेडछाड व टवाळखोरी करणार्‍या संशयितांविरुद्ध निर्भया पथक काम करणार आहे. मुलींची ज्या भागात अधिक छेडछाड होते, अशी 550 ठिकाणे निश्चित केली आहेत. या संदर्भात महिला तक्रारीसाठी 1091 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकतात. शहरातील महाविद्यालये, उद्याने, बसस्थानक, शाळा, महाविद्यालये, चित्रपटगृहे या आणि अशा ठिकाणी ही पथके काम करणार आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील महिला व महाविद्यालयीन तरुणींशी संवाद साधला असता त्यांनी या उपक्रमामुळे महिलांच्या सुरक्षेत वाढ होईल, असा विश्वास व्यक्त करत उपक्रमाचे स्वागत केले आहे.

महिलांवर होणारे अत्याचार, लैंगिक छळ, छेडछाड आणि गुन्हेगारीची मानसिकता बदलणे ही काळाची गरज बनली आहे. भर रस्त्यात मुलींची छेड काढणार्‍या टवाळखोरांना यामुळे नक्कीच चाप बसणार आहे. या पथकाची महिलांनी पुरेपूर मदत घ्यावी.
नमिरा पिरजादे

महिलांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी आणि निर्भय वातावरणामध्ये त्यांना वावरता यावे; यासाठी निर्भया पथकाची स्थापना झाली आहे ही अतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे. महिलांच्या बाबतीत छेडछाड, लैंगिक गुन्हे, रोडरोमिओंचा त्रास, सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारा त्रास यासंदर्भातील तक्रार कुठे करावी; याबद्दल आता संभ्रम राहणार नाही.
– आरती बोराडे

महिलांच्या सुरक्षिततेसाठी सुरू केलेले निर्भया पथक नाशिकमध्ये नक्कीच बदल घडवून आणेल असा विश्वास आहे. यामुळे स्त्रियांना निर्धास्तपणे वावरणे आता शक्य होईल. स्रियांवर होणार्‍या अत्याचाराविरुद्ध हा एक लढाच आहे असे म्हणावे लागेल.
-नंदिनी खंदारे

शहरात निर्भया पथकांची जी नियुक्ती केली आहे ती महिलांसाठी जमेची बाजू आहे. कारण प्रत्येक वेळी महिलेसोबत अत्याचार होत असताना मदत मिळतेच असे नसते, म्हणून निर्भया पथकांमुळे खूप मोठी हिम्मत आणि दिलासा आम्हाला मिळाला आहे
– आदिती भारती

निर्भया पथक म्हणजे आमच्यासाठी मदतीचा हात आहे. यातून महिला सबलीकरणाला चालना मिळणार आहे. शहरातील वाढती गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी हा उपक्रम नक्कीच प्रभावी ठरेल असे वाटते.
– छाया झाल्टे

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!