Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

सिव्हीलमध्ये सफाई कामगारांचे आंदोलन

Share

नाशिक । जिल्हा शासकीय रुग्णालयातील नवजात शिशु ंअतिदक्षता (एसएनसीयू ) विभागातील कंत्राटी कामगारांना दोन महिन्यांपासून पगार न मिळाल्याने त्यांनी आजपासून काम बंद आंदोलन सुरु केले आहे.

कामगारांनी आंदोलन पुकारल्याने एसएनसीयू आणि कांगारु माता कक्षात अस्वच्छता पसरण्यास सुरुवात झाली आहे. तसेच इतर कामेही खोळंबण्याची शक्यता वाढली आहे.

जिल्हा रुग्णालयात नियमित कर्मचारी वगळता सफाई तसेच इतर कामांसाठी कंत्राटी कामगार कार्यरत आहेत. यातील एसएनसीयू कक्षातही पाच कर्मचारी आणि एक महिला कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांना खासगी संस्थेमार्फत नियुक्त करण्यात आले आहे. या कर्मचार्‍यांना दरमहा पाच हजार रुपये पगार कंत्राटदाराकडून दिला जात आहे; मात्र ठेकेदाराकडून नियमित पगार होत नसल्याची या कामगारांची ओरड आहे.

यापुर्वी अनेकदा पगार न झाल्याने त्यांनी कामबंद आंदोलन केल्याचे प्रकार जिल्हा रूग्णालयात घडले होते. यावेळी एप्रिल व मे महिन्याचा पगार न झाल्याने सहा कामगारांनी पुन्हा आंदोलन सुरु केले आहे. यासंदर्भात त्यांनी अतिरीक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखील सैंदाणे यांच्याकडे निवेदन दिले आहे.

दरम्यान, एक्सरे काढण्यासाठी बाळास नेणे किंवा एक्सरे व इतर रिपोर्ट डॉक्टरांकडे नेणे, स्वच्छता ठेवणे, कक्षातील फरशी, भिंत, यंत्रसामुग्री पुसणे, ऑक्सिजन पुरवठा करणारी यंत्रणा बघणे, लहान बाळांच्या पेटीची स्वच्छता ठेवणे यासह विविध महत्वाची कामे हे कर्मचारी करतात; पंरतु अनियमित पगारामुळे त्यांच्या कुटुंबियांचे हाल होत आहेत. लवकरात- लवकर पगार न केल्यास हे आंदोलन असेच सुरू राहिल असा इशारा त्यांनी दिला आहे.

बालकांना धोका
एसएनसीयू कक्षात पुर्ण वाढ न झालेल्या बाळांवर उपचार केले जातात. त्यामुळे त्यांना संसर्ग होण्याचा सर्वाधिक धोका असल्याने हा कक्ष स्वच्छ ठेवणे आवश्यक असते; मात्र कामगारच नसल्याने या कक्षात अस्वच्छता पसरण्यास सुरूवात झाली आहे. यामुळे बाळांसाठी विषाणुंचा धोका वाढण्याची शक्यता आहे. यामुळे स्वच्छतेबाबत संवेदनशील समजल्या जाणार्‍या या कक्षातील कामगारांचा प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी होत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!