चणकापूर उजवा कालवा संघर्ष समितीतर्फे उमराण्यात उद्या जनजागृती रॅली

0

देवळा : चणकापूर उजवा कालव्याचे पूरपाणी येथील परसूल धरणात टाकावे, तसेच कालव्याला कायमस्वरूपी हक्काचे आवर्तन मिळावे, यासाठी चणकापूर उजवा कालवा संघर्ष समितीच्या वतीने जनजागृती व्हावी, यासाठी रविवारी (दि. २) सकाळी नऊ वाजता उमराणे येथून शिवाजी पुतळा ते पिंपळगाव (वा.) कलव्यापर्यंत मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे.

चणकापूर उजवा कालव्याचे पूरपाणी परसूल धरणात टाकून सिंचन प्रश्‍न मार्गी लावावा लागणार आहे. कारण खरीप पिकांची परिस्थिती पाण्याअभावी अत्यंत दयनीय झाली आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या बिकट आहे. उमराणे गावाला दोन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. परसूल धरणातील पाण्याचा मृतसाठाही संपत आला आहे. शेती सिंचन व जनावरे यांना पिण्यासाठी पाण्याची नितांत गरज आहे.

चांदवड तालुक्यातील राजदेरवाडीला ८७ दशलक्ष घनफूट क्षमतेचे धरण मंजूर झालेले असल्याने भविष्यात परसूल धरणात पावसाचे पाणी पुरेशा प्रमाणात येण्याची शक्‍यता फारच कमी असल्याने आपल्या हक्काचे पूरपाणी धरणात टाकण्यासाठी व शेतीसिंचनासाठी कायमस्वरूपी पाण्याचे आवर्तन मिळवण्यासाठी सर्वांनी एकत्रित लढा देण्याचे आवाहन समितीने केले असून, हे हक्काचे पाणी मिळावे, यासाठी हजारोंच्या संख्येने जनजागृती रॅलीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*