Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

आजीच्या पाठींब्याने हर्षलच्या स्वप्नांना पंखाची जोड

Share

चांदवड : नुकताच दहावीचा निकाल लागला सून यामध्ये अनेकांनी उत्तुंग यश संपादन करत आपल्या कुटुंबियांना आनंद दिला आहे. अनेकजण हलाखीच्या परिस्थितीतून मार्ग काढत चांगल्या मार्कानी पास झाले आहेत. असाच परिस्थितीवर मात करीत आपल्या आजीची स्वप्ने उराशी बाळगून हर्षलने यश संपादन केले आहे.

वयाच्या चौथ्या वर्षी मायेची सावली गमावलेल्या तसेच उत्तुंग भरारी मारण्याची स्वप्ने बघणाऱ्या हर्षलने दहावीच्या परीक्षेत ८५% गुण मिळवत घवघवीत यश मिळवलं आहे. तो संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा विद्यार्थी असून तळेगावरोही केंद्रातून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. अतिशय गरिबीच्या परिस्थितीत त्याने वेळप्रसंगी केटरींगचे काम करत हे यश मिळवल्याने परिसरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

हर्षल दत्तात्रेय केदारे राहणार तळेगावरोही याचा जन्म होऊन अवघे चार वर्षे झालेले असतांना म्हणजेच शाळेची पायरी चढलेली नसताना आईचे आकस्मित निधन झाले. खरं तर आई हीच कुठल्याही लेकराची पहिली शिक्षिका असते आणि हाच आधार अगदी बालवयात हरपतो तेव्हा अनेकांच जीवन एक संघर्ष बनून जातं हर्षलही याला अपवाद नाहीच. अशात आजी कुसुमबाई यांनीच हर्षलची आई बनत त्याचा संभाळ करण्यास सुरुवात केली.

अगोदरच मागासवर्गीय गरीब घरात जन्म असल्याने ह्या आजीला हर्षल च्या शिक्षणासाठी वेळोवेळी परिस्थितीशी दोन हात करावे लागले. यातून कधी कांद्याच्या खळ्यावर तर कधी दुसऱ्याच्या शेतात कुसुमबाईंनी काम केले. आजीचा आपल्या शिक्षणासाठी चाललेला संघर्ष हर्षलच्या मनावर कष्टाशिवाय पर्याय नाही हे संस्कार रुजवत गेला. यामुळे पुस्तकांमध्ये रमणारा हर्षल देखील कधी लग्नात वाढपी म्हणून तर कधी सुट्ट्यामध्ये मिळेल ते काम करू लागला.

आईची उणीव, गरिबीचे चटके यातही हर्षलने अभ्यासाची कास सोडली नाही आणि म्हणूनच आज दहावीचे निकाल लागल्यानंतर हर्षल ८५ टक्के गुण मिळवत संत ज्ञानेश्वर विद्यालय तळेगाव रोही येथून प्रथम आल्याचे समजताच त्याच्या या संघर्षमय यशाचे विद्यालयाचे प्राचार्य पानसरे, शिक्षक वृंद, सरपंच साधना पाटील, सामाजिक कार्यकर्ते अंबादास केदारे भागवत वाघ आदींनी कौतुक केले.

दरम्यान हर्षल ला त्याच्या स्वप्नांविषयी विचारले असता त्याला वैमानिक बनायचं असल्याचं त्याने सांगितले, तसेच या यशाचं सर्व श्रेय तो आज्जी, काका व शिक्षकांना देतो.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!