गुन्ह्यांत अडकलेल्या हातांतून साकारल्या जाताहेत आकर्षक मूर्ती

0
नाशिकरोड (संजय लोळगे)| नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील बंदीवानांकडून तयार होणार्‍या सुबक मूर्ती सध्या सोशल मिडीयावर अधिराज्य गाजवत असून या मूर्तींना नागरिकांकडून भरभरून प्रतिसाद दिला जात आहे. त्यामुळे खास दिवाळीनिमित्त आकर्षक मुर्ती घडविण्याचे काम याठिकाणी सुरू आहे.
‘फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार’ या गीतातून कलावंताच्या कलेचे दर्शन होतेच! परंतु मानवी जीवनाविषयीचे अमूल्य सार अधोरेखीत होते. कारागृहातील बंदी सागर पवार याच्या मार्गदर्शनाखाली ६ ते ७ बंदीवान सध्या आकर्षक मूर्ती घडविण्याचे काम करत असून दरवर्षी मध्यवर्ती कारागृहातर्फे आयोजित करण्यात येत असलेल्या ‘दिवाळी मेळा’मध्ये त्या विक्रीस ठेवण्यात येणार आहेत.
फायबर व मार्बलपासून तयार होणार्‍या या सुबक मूर्ती चर्चेचा विषय बनला आहे. यात देव-देवतांसह अनेक ऍण्टीक प्रकारच्या मूर्तींचा समावेश आहे.
‘विद्या विनयेन शोभते’ या महावाक्यात विनयशीलता हे एक मूल्य असून वर्तमानस्थितीत ते महत्वाचे झाले आहे. कलेला जात नसते आणि शिक्षणाला वयाचे बंधन नसते असे म्हटले जाते. शिक्षण हे मानवीय सत्याची प्रगती, परिवर्तन आणि प्रेरणा यांचे आधारस्तंभ असून त्याद्वारे ज्ञानप्राप्ती होते.
तथापि, ते ग्रहण करण्याची व त्याप्रमाणे जीवनशैली बनविण्याची जबाबदारी आपल्यावर असते. सागर याच्या मार्गदर्शनाखाली ६-७ बंदीवानांनी मूर्ती घडविण्यासाठी दाखवलेली तयारी म्हणूनच प्रशंसनीय ठरते.
दि. १४ पासून सुरू होणार्‍या दिवाळी मेळाव्यात बंदीजनांनी तयार केलेल्या वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात येणार असून त्यात स्टील, फर्निचर, टेक्सटाईल्स यासह सुबक मूर्तींचा समावेश राहणार आहे.
गुन्ह्यांमध्ये अडकलेल्या हातांतून साकारत असलेल्या वस्तूंमुळे ‘सुधारणा व पुनर्वसन’ हे कारागृहाचे ब्रीद तंतोतंत जुळल्याचे दिसून येते.
बंदिवानांमध्येही एक चांगली व्यक्ती आहे. त्यांच्यातील कलागुणांना सुयोग्य वाव दिल्यास गुन्ह्यापासून परावृत्त होऊन एक चांगली व्यक्ती बनण्याची संधी देण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे कैदी बांधवांचे शैक्षणिक सशक्तीकरण होण्यास मदत होणार आहे.
राजकुमार साळी, कारागृह अधिक्षक

LEAVE A REPLY

*