Type to search

Breaking News गणेशोत्सव नाशिक मुख्य बातम्या

आला रे आला रे गणपती आला; आगमन विघ्नहर्त्याचे…

Share

सन 1900 मध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी उत्सवाला सार्वजनिक रूप देण्यामागे स्वराज्याविषयी समाजात चेतना
निर्माण करण्याचा हेतू होता. संपूर्ण भारतात 118 वर्षांपासून हजारो गणेश मंडळे बाप्पांचा हा उत्सव साजरा करीत आहेत. या उत्सवात भारतीय संस्कृती आणि कलांच्या विविध शैलींचे दर्शन घडते. त्यानिमित्ताने सांस्कृतिक जाणिवा समृद्ध होतात.

प्राचीन काळापासून कोणत्याही कार्याला प्रारंभ करण्यापूर्वी, ते कार्य निर्विघ्नपणे पार पडावे यासाठी गणेशाचे पूजन करण्याची परंपरा आहे. जे भक्त गणेशाची उपासना करतात त्यांच्या कार्यात कधीही विघ्न येत नाही, असे स्कंद पुराणात म्हटले आहे. विघ्नांचा नाश करणार्‍या गणेशाला वंदन करताना वेदांमध्ये ‘नमो गणेभ्यो गणपतिभ्वयश्रवो नमो नमः’ असे म्हटले आहे. गण आणि गणांचा स्वामी श्रीगणेशाला वंदन, असा याचा अर्थ आहे. गणेशाच्या विविध रूपांचे वर्णन आढळते. परंतु ही सर्व रूपे विघ्नविनाशक असल्याचे सर्वांनीच म्हटले आहे.वराह पुराणात आणि लिंग पुराणात म्हटले आहे की, एकदा असुरी शक्तींमुळे त्रस्त झालेल्या ऋषिमुनींनी भगवान शंकराकडे मदतीची याचना केली. भगवान आशुतोषाने विनायक रूपातील गणेशाला प्रकट केले तसेच आपले शरीर कंपित करून अनेक गणांची सृष्टी निर्मिली आणि त्यांचा अधिपती म्हणून श्रीगणेशाची नियुक्ती केली.

गणेशाच्या जन्माविषयीही वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात. माता पार्वतीने आपल्या शरीरावर लावलेल्या उटण्याद्वारे काढलेल्या मळाचा एक पुतळा बनवला आणि त्यात प्राण भरले, तोच गणेश होय, ही कथा सर्वाधिक प्रचलित आहे. वराह पुराणात आलेल्या उल्लेखांनुसार, स्वतः भगवान शंकराने पंचतत्त्वांचा मिलाफ करून तन्मयतेने गणेशाची निर्मिती केली.

अप्रतीम सौंदर्य लाभलेल्या गणेशाला पाहून सर्व देवांमध्ये खळबळ उडाली. त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा अंदाज घेऊन शंकराने गणेशाच्या पोटाला मोठा आकार दिला तसेच हत्तीचे शिर प्रदान करून त्याची आकर्षकता काहीशी कमी करण्याचा प्रयत्न केला. गणेशाच्या जन्माविषयी आणखी एक कथानक ब्रह्मवैवर्त पुराणात आहे. त्यानुसार पार्वतीच्या प्रतिज्ञेमुळे खूश होऊन स्वतः भगवान श्रीकृष्णाने तिच्या पोटी गणेशाच्या रूपाने जन्म घेतला.

गणेशाच्या जन्मानंतर त्याला आशीर्वाद देण्यासाठी पार्वतीने सर्व देवीदेवतांना आमंत्रित केले. शापित असलेले शनिदेव मात्र या आमंत्रणावरून आशीर्वाद देण्यासाठी जाण्याचे सुरुवातीस टाळत होते. कारण त्यांना असा शाप मिळाला होता की, एखाद्या बालकाला पाहून ते मोहित झाले तर त्या बालकाचे शिर धडापासून वेगळे होईल. हा शाप खुद्द शनिदेवाच्या पत्नीनेच त्यांना दिला होता. शनिदेवांनी गणेशाला जेव्हा पाहिले तेव्हा गणेशाचे शिर धडावेगळे झाले आणि नंतर शंकराने हत्तीचे शिर त्याच्या धडावर लावले.

इंद्राने या बालकाला अंकुश दिला, वरुणदेवाने पाश दिला, ब्रह्माने अमरत्व दिले, लक्ष्मीने रिद्धी-सिद्धी तर सरस्वतीने विद्या प्रदान केली. अशारीतीने बालगणेश सर्वगुणसंपन्न बनला. श्रीगणेशाला पहिला लिपीकार मानले जाते. देवतांनी विनंती केल्यानंतर गणेशानेच वेदव्यास यांनी रचलेले महाभारत लिपीबद्ध केले होते. अनंतकाळापासून गणेशाला विविध नावे देण्यात आली आहेत. दुःख, भय, चिंता आदी विघ्ने गणेशाच्या पूजनाने दूर होतात, अशी धारणा आहे.
-सु. ल. हिंगणे, अध्यात्म अभ्यासक

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!