किसान सभेतर्फे अर्थसंकल्पाची होळी

0

नाशिक । प्रतिनिधी : केंद्र सरकारतर्फे शेतकरी आत्महत्या का करतात, याचा विचार केला जात नाही. कांदा उत्पादक शेतकरी आत्महत्या करत आहेत. झालेला खर्चही निघत नाही. दुष्काळाचे निकष बदलून शेतकर्‍यांना मदतीपासून वंचित ठेवत आहे. पीकविम्याचा लाभ शेतकर्‍यांपेक्षा पीकविमा कंपन्यांनाच फायदा होईल व रिलायन्सला फायदा होईल, अशी व्यवस्था सरकार करत आहे. देशाच्या अर्थसंकल्पात शेतकर्‍यांसाठी काही दिले नाही. स्वामिनाथन आयोग शिफारशी, शेतकरी कर्जमुक्ती, पेन्शनबाबत काही विचारच नाही. याचा निषेध बुधवारी (दि.13) किसान सभेतर्फे देशभर अर्थसंकल्पाची प्रतिकात्मक होळी करून करण्यात आला.

कांद्याला 2100 रुपये हमीभाव द्यावा. 200 रुपयांऐवजी 500 रुपयेप्रमाणे अनुदान द्यावे, दुष्काळाची कामे त्वरित सुरू करावी, मनरेगा अंतर्गत शेतकर्‍यांच्या बांधावरील कामाचा समावेश करून 300रुपये प्रतिदिनी मजुरी 8 दिवसांच्याआत द्यावी, पिकविम्यातील शेतकरी विरोधीअटी रद्द कराव्यात, कसत असलेल्या वनजमिनी, गायरान जमीन नावावर करा, भूमिहिनांना जमीन द्या, शेतकरी शेत मजुरांना पेन्शन द्या, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी व्यापक अभियान राबवून शेतकरी मदत केंद्र गावागावात सुरू करा, 2008 पूर्वी थकीत कर्जासह 2017 पर्यंतचे संपूर्ण कर्जमुक्ती करा, अशा विविध मागण्यांसाठी देशभर किसान सभेच्या वतीने अर्थसंकल्पाची प्रतिकात्मक होळी करण्यात आली.

नाशिक येथील आंदोलनात किसान सभेचे नाशिक तालुकाध्यक्ष नामदेव बोराडे, उपाध्यक्ष निवृत्ती कसबे, नंदू बोबडे, अ‍ॅड. दामोदर पागेरे, विजय दराडे, संपत थेटे, मधुकर कसबे, विठोबा घुले, दादाजी पाटील, डी. पी. पाटील, अशोक दिवे, एस. सी. गुजराथी, अ‍ॅड. समीर शिंदे, अ‍ॅड राजपाल शिंदे आदी सहभागी झाले होते.

जिल्ह्यातही होळी
किसान सभेच्या वतीने नाशिक, चांदवड, नांदगाव येथे अर्थसंकल्पाची होळी करण्यात आली. शेतकरी, कामगार विरोधी भाजप सरकारला येत्या निवडणुकीत बाजूला सारा, असे आवाहन राजू देसले (राज्यसचिव, किसान सभा महाराष्ट्र) यांनी यावेळी केले.

LEAVE A REPLY

*