Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांना ‘स्कूल कनेक्ट’ द्वारे ‘अच्छे दिन’ आणणार

Share

नाशिक । भारत पगारे

अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाला सरकारी महाविद्यालयांमध्ये (पॉलिटेक्निक) प्रवेश घेणार्‍यांची संख्या वर्षानुवर्षे कमी होत असल्याचे प्रवेशांच्या आकडेवारीवरून दिसून आले आहे. ही संख्या रोडावत असून आता राज्याच्या तंत्रशिक्षण संचालनालयाने (डीटीई) इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसोबत शाळेत संवाद साधण्यासाठी ‘स्कूल कनेक्ट’ उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून, त्यांना डिप्लोमा अभ्यासक्रमाचे महत्त्व आणि त्यातून निर्माण होणार्‍या रोजगार संधींची माहिती दिली जाणार आहे. राज्यात एकूण 43 शासकीय तंत्रनिकेतन असून नाशिकमधील सामनगावरोडवर शासकीय तंत्रनिकेतन कार्यरत आहे. कॉम्प्युटर, आयटी, मेकॅनिकल, सिव्हिल अशा प्रमुख विद्याशाखा सोडल्यास इतर शाखांमध्ये विद्यार्थी प्रवेश घेत नसल्याचे चित्र आहे. खासगी पॉलिटेक्निकमध्ये विद्यार्थी प्रवेश घेत नसल्याने ते बंद होण्याच्या मार्गांवर आहेत.

तर, सरकारी पॉलिटेक्निकमध्येही गेल्या तीन वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल अशा काही विद्याशाखांमध्ये जागा रिक्त राहत आहेत. त्यामुळे रिक्त जागांमध्ये वाढ होऊ नये आणि डिप्लोमाचे शिक्षण घेऊन अधिकाधिक विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासाठी ‘डीटीई’ने ठोस पावले उचलली आहे. या नव्या उपक्रमानुसार राज्यातील सर्व शाळांमधील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसोबत चर्चासत्र, व्याख्यान, टॉक शोद्वारे संवाद साधण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी डिप्लोमाचे शिक्षण का घ्यावे, शिष्यवृत्तींची माहिती, रोजगार संधी, भविष्यातील इंजिनीअरिंगचे शिक्षण अशा सर्व बाबींची माहिती देण्यात येणार आहे. पॉलिटेक्निक कॉलेजच्या प्राचार्यांनी ‘स्कूल कनेक्ट’ उपक्रम दहावीच्या परीक्षांपूर्वी म्हणजेच 15 जानेवारीपूर्वी प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

नाशिकसह विभागातील अहमदनगर, जळगाव, धुळे व नंदुरबार येथील शाळांमध्येही ‘स्कूल कनेक्ट’ उपक्रम राबविला जाणार असून त्याबाबतची तयारी सुरू आहे, अशी महिती नाशिक विभागाचे तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक डी. पी. नाठे यांनी दिली आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!