Saturday, April 27, 2024
Homeनाशिकआनंंदवल्लीजवळ गोदावरी पुररेषेत बेकायदा उत्खनन; नदीत माती टाकून पात्र अरुंद करण्याचा डाव

आनंंदवल्लीजवळ गोदावरी पुररेषेत बेकायदा उत्खनन; नदीत माती टाकून पात्र अरुंद करण्याचा डाव

नाशिक | प्रतिनिधी

शहरातील सातपूर विभागातील आनंदवल्ली गावालगत असलेल्या बंधार्‍याजवळ गोदावरी नदीकाठावर पुररेषेत दहा बारा दिवसापासुन बेकायदेशिर उत्खनन केले जात असुन नदीसंवर्धनासाठी उच्च न्यायालयाचे आदेश असतांना याचे उल्लंघन केले जात आहे. यासंदर्भात महापालिका अधिकार्‍यास व्हॉटसऍपद्वारे तक्रार केल्यानंतर यासंदर्भात दखल न घेण्यात आल्याने बेकायदा कामात महापालिका प्रशासनाचा सहभाग आहे का ? असा प्रश्‍न आता उपस्थित केला जात आहे.

- Advertisement -

नाशिकनगरीची दक्षिण गंगा गोदावरी नदीचे पावित्र्य कायम रहावेत आणि याठिकाणी नदीच्या पाण्याचे प्रदुषण रोकले जावे याकरिता गोदावरी गटारीकरण विरोधी मंचच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर न्यायालयाने नदी प्रदुषण मुक्ती व संवर्धनासंदर्भात राज्य शासन व महापालिकेला महत्वपुर्ण आदेश दिलेले आहे.

या आदेशानुसार शासन व महापालिका स्तरावर काम सुरू आहे. असे असतांना शहरातील आनंदवल्ली गावालगत असलेल्या जुन्या बंधार्‍याजवळ पुररेषेत गेल्या दहा ते पंधरा दिवसापासुन पुररेषेत बेकायदा मातीचे मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू आहे. हे उत्खनन करुन नदी पात्र अरुंद करीत ही माती थेट नदी पात्रात टाकली जात आहे. याद्वारे पुररेषेत अतिक्रमण केले जात तर नाही ना?

असा प्रश्‍न स्थानिक नागरिकांनी केला आहे. या गंभीर प्रकारानंतर सात दिवसापुर्वी या प्रकारासंदर्भात महापालिकेच्या संबंधीत अधिकार्‍याकडे फोटोसह माहिती देऊन तक्रार केली होती. मात्र या गंभीर प्रकाराकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. यामुळे या प्रकाराला प्रशासनाचा आशिर्वाद तर नाही ना ? अधिकारी संबंधीतांना पाठीशी घालत तर नाही ना ? असे प्रश्‍न उपस्थित केले जात आहे.

उच्च न्यायालय आदेशाचे उल्लंघन…

गोदावरी नदीचे प्रदुषण रोकण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल आहे. या दाखल याचिकेवर न्यायालयाने वेळोवेळी प्रदुषणासंदर्भात आदेश दिलेले आहे. पुररेषेत बांधकाम करणे, माती काढणे, भराव टाकणे, पात्र अरुंद करणे व अतिक्रमण करणे यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. तसेच निरी संस्थेने काही सुचना केलेल्या आहे. अशाप्रकारे एकीकडे न्यायालयाच्या आदेशाने प्रदुषण व संवर्धन केले जात असतांना, या प्रकारातून न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले जात आहे.

…म्हणुन आयुक्तांकडे केली तक्रार – पगारे

आनंदवल्ली भागातील हा प्रकार न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणार असल्याने आपण संबंधीत अधिकार्‍याला व्हॉटस ऍपद्वारे माहिती देऊन तक्रार केली. मात्र त्यांच्याकडुन अद्यापही दखल घेण्यात आलेली नाही. म्हणुनच आपण आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे तक्रार केली असल्याची माहिती गोदावरी गटारीकरण विरोधी मंचचे याचिकाकर्ते निशिकांत पगारे यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या