Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

Video : महापौरपदी भाजपचे सतीश कुलकर्णी तर उपमहापौरपदी भिकूबाई बागुल 

Share

नाशिक । प्रतिनिधी

राज्यातील महाविकासआघाडीचा प्रयोगाच्या धर्तीवर नाशिक महानगरपालिकेत शिवसेनेने पुढाकार घेत सत्तांतर करण्याचा मनसुबा भाजपने उधळून लावला. संकटमोचन असलेल्या माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या व्यूहरचनेतून भाजपने सेनेला अक्षरश: अर्ज माघारी घ्यावा लागला. भाजपने मनसेना आणि काँग्रेसचा वापर करत महापालिकेतील सत्ता राखली. भाजपचे खंद्दे समर्थक आणि पाच वेळा निवडून आलेले सतीश लक्ष्मण कुलकर्णी यांची महापौर आणि उपमहापौर म्हणून ज्येष्ठ नगरसेविका भिकुबाई बागुल यांची बिनविरोध निवड झाली.

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या नाशिक महापालिकेतील निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व अपक्षांनी एकत्र येत आणि माजी आ. बाळासाहेब सानप यांचे समर्थक 9 नगरसेवकांच्या जोरावर सत्तांतरचा चमत्कार करण्याचे जाहीर केले होते. मात्र काँग्रेस पक्षांने सत्तेत सहभागी करून घेण्यासाठी धरलेला आग्रह, ऐनवेळी मनसेनेने भाजपसोबत जाण्याचा घेतलेला निर्णय आणि सानप समर्थक नऊ नगरसेवकांनी भाजपला साथ देण्याचा ऐनवळी घेतलेल्या निर्णयामुळे सेनेचे तयार केलेली आघाडी भंगली.

एकूणच गुरुवारी घडलेल्या नाट्यमय घडामोडी आणि आज सभागृहातील चित्र पाहत आघाडी फुटल्याने महापौरपदाचे सेनेच्या चार उमेदवारांंसह एकूण दहा उमेदवारांनी माघारी घेतल्याने भाजपचे उमेदवार सतीश कुलकर्णी यांची महापौर म्हणून बिनविरोध निवड झाली. त्यानंतर उपमहापौरपदी भाजप प्रदेश पदाधिकारी सुनील बागुल यांच्या मातोश्री भिकुबाई बागुल यासुद्धा बिनविरोध निवडून आल्या. विरोधातील नऊ उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतल्याने बागुल यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग सुकर झाला. अशाप्रकारे गेल्या चार दिवसांपासून घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर भाजपला शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर महापालिकेतील सत्ता राखता आली.

सत्ता राखण्यासाठी महाजन ठरले संकटमोचन

भाजपचे सर्व नगरसेवक गोव्याला पोहोचल्यानंतर माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी याठिकाणी जाऊन नगरसेवकांसोबत व्यक्तिगत थेट संवाद साधत त्यांची मते नोंदवून घेतली होती. त्याचवेळी महाजन यांनी तुम्हीं एकत्र रहा, कोणत्याही स्थिती आपलाच महापौर होणार, असा शब्द नगरसेवकांना दिला होता. त्याचबरोबर सानप समर्थक नगरसेवकांच्या मागणीची दखल महाजन यांनी घेत उमेदवारी जाहीर केल्यानंतर भाजप एकसंघ ठेवण्यासोबत मनसेनेला जवळ आणण्याची खेळी महाजन यांनी खेळली. अशाप्रकारे संकटात सापडलेली महापालिकेची सत्ता संकटमोचन महाजन यांच्या व्यूहरचनेने राखली.


मनसेनेकडून मुंबईचा वचपा नाशिकमध्ये…

मुंबई महापालिकेतील मनसेनेचे पाच नगरसेवक काही महिन्यांपूर्वी शिवसेनेने गळाला लावले होते. याचा वचपा आज नाशिक महापालिकेत मनसेनेने काढल्याचे दिसून आले. याठिकाणी आघाडी करून शिवसेनेचा महापौर होणार असल्याने मनसेनेने भाजपला साथ देत मुंबईचा वचपा नाशिकला काढल्याचे दिसले. तसेच मागील पंचवार्षिक निवडणुकीत मनसेनेला भाजपला ऐनवेळी पाठींबा दिल्याने त्यांना उपमहापौर पद मिळाले होते. याच पाठींब्याची परतफेड आता मनसेनेचे केल्याचे सांगण्यात आले.

Video : महापौरपदी भाजपचे सतीश कुलकर्णी तर उपमहापौरपदी भिकूबाई बागुल

नाशिक : महानगरपालिकेत महापौरपदी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सतीश कुलकर्णी तर उपमहापौरपदी ज्येष्ठ नगरसेविका भिकूबाई बागुल यांची बिनविरोध निवड झाली आहे. महापाैरपदासाठी आज पार पाडलेल्‍या निवडणुकीत सतीश कुलकर्णी यांनी बाजी मारली असून नाशिक महापालिकेच्या सोळाव्या महापौर पदाची निवडणूक शेवटपर्यंत निर्णायकच ठरली.

Posted by Deshdoot on Thursday, 21 November 2019

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!