‘भारत बंद’चा एसटीला फटका 3 हजार फेर्‍या रद्द

प्रवाशांचे हाल, 80 लाखांचे उत्पन्न बुडाले

0

नाशिक । पेट्रोल, डिझेलची प्रचंड दरवाढ आणि वाढत्या महागाईचा निषेध नोंदवण्यासाठी काँग्रेसने सोमवारी ‘भारत बंद’ची हाक दिली होती. त्यानुसार नाशिक शहरासह जिल्ह्यात बंद पाळण्यात आला. बंदमुळे प्रवाशांची सुरक्षितता आणि नुकसान टाळण्यासाठी एसटी महामंडळाने सकाळी 6 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत जिल्ह्यातील 13 आगार शंभर टक्के बंद ठेवले. त्यामुळे एसटीच्या 3 हजार फेर्‍या रद्द झाल्याने 80 लाख रुपयांचे नुकसान झाले. अनेक प्रवाशांचे हाल झाले. सायंकाळी 4 वाजेनंतर सर्व आगारांमधून एसटीसेवा सुरळीत सुरू झाली.

काँग्रेससह देशातील डाव्या पक्षांनी आज इंधन दरवाढीविरोधात ‘भारत बंद’ची हाक दिली होती. बंदमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शेकाप, पीपल्स रिपब्लिकन पक्ष सहभागी झाले होते. बंदला मुंबई व पुण्यात हिंसक वळण लागले. पुण्यात पीएमपीची बस जाळण्याची घटना घडली, तर मुंबईत आंदोलकांनी दगडफेक केली. बंदमुळे प्रवाशांची सुरक्षितता आणि नुकसान टाळण्यासाठी एसटी महामंडळाने 13 आगारांमधील बससेवा सकाळी 6 वाजेापासून दुपारी 4 वाजेपर्यंत बंद ठेवली होती.

सकाळपासून शहरात एकही एसटी धावली नाही. शहरासह संपूर्ण जिल्ह्याच्या बसेस बंद ठेवण्यात आल्यामुळे राज्य परिवहन महामंडळाचे दिवसभरात 80 लाख रुपयांचे नुकसान झाले. सायंकाळी 4 वाजेपर्यंत 3 हजार बसेस रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थी, नोकदार, प्रवाशांचे हाल झाले. अनेक प्रवाशांनी खासगी वाहने व रिक्षाने प्रवास केला.

‘सेवा बंद’मुळे नुकसान टळले
मराठा आरक्षणास हिंसक वळण लागल्याने एसटीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्या अनुभवामुळे प्रवाशांची सुरक्षितता आणि नुकसान टाळण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाने बससेवा बंद ठेवण्याचे आदेश 13 आगारांना दिले होते. त्यामुळे एकाही एसटी बसचे नुकसान झाले नाही. बंद संपल्यानंतर नाशिक विभागाने 13 आगारांमधील एसटीसेवा पूर्ववत सुरू केली.

LEAVE A REPLY

*