Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

पोळ्यासाठी बळीराजाची लगबग

Share

नाशिक । प्रतिनिधी
बळीराजाने पोळ्याची तयारी सुरू केली असून शुक्रवारीे (दि. 30) होणार्‍या या सणासाठी आवश्यक साहित्य खरेदीसाठी शेतकर्‍यांची बाजारात गर्दी होऊ लागली आहे. बैलांना सजवण्यासाठीच्या विविध प्रकारच्या साहित्याच्या दरात वाढ झाली नसल्याचा दिलासा यंदा शेतकर्‍यांना मिळाला आहे. मात्र पाहिजे तशी मागणीही नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

पोळ्याच्या दिवशी गळ्यामध्ये घुंगरमाळ, कपाळाला बाशिंग, शिंगांना वेगवेगळ्या प्रकारचे गोंडे, आकर्षक रंगाने केलेली सजावट, गळ्यामध्ये मणिमाळ अशा अनेकविध साहित्याने सजवलेल्या बैलांची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात येते. तसेच शेतकरी कुटुंब सर्जा-राजाची घरी पूजा करून त्याला नैवेद्य दाखवतात. शेतकर्‍यांसाठी आनंदोत्सवाचा असणारा पोळा सण दोन दिवसांवर आला असून त्यानिमित्त नाशिकची बाजारपेठ सजली आहे.

काबाड कष्ट करून अन्नधान्याचे उत्पादन करणार्‍या शेतकर्‍यांसाठी पोळा सण महत्त्वाचा असतो. या सणानिमित्त साहित्य खरेदीसाठी शेतकर्‍यांची गर्दीही होऊ लागली आहे. बैलांसाठी कासरा, म्होरकी, वेसण, भोंडे, रेशम, घंटी, घुंगरे, तोडे, घुंगर माळ, मुथळी, पट्टे, माळा, फुगे, भोरकडी, कंडा, शेंबी, शिंगदोरी, शिंगगोंडा, जोतं, चाबूक, मणिमाळ, जवर, गाठोडे, केसरी असे व अन्य साहित्य खरेदीसाठी शेतकरी बाजारात येत आहेत. बाजारात या साहित्याला मागणी कमी असून पाहिजे तशी मागणी नाही.

आपल्या ढवळ्या-पवळ्याला सजवण्यासाठी झुल, रंगबिरंगी गोंडे, घंट्यांच्या माळा आदी साहित्य खरेदीसाठी शेतकर्‍यांनी गर्दी केल्याचे चित्र आहे. बैलांना सजवण्यासाठी शहरातील दिंडोरीरोडवर असलेल्या मार्केट यार्डालगत सजावटीच्या साहित्याची दुकाने आहेत. आजूबाजूच्या गावातील शेतकरीवर्ग खरेदीसाठी गर्दी करीत असून बैलांच्या शिंगांना लावण्यासाठी आकर्षक रंग, गळ्यात घंटाच्या माळा, गोंडे, झुल असे साहित्य खरेदी केले जात आहे. त्यातून बाजारात उत्साह दिसून आला.

परंपरा कायम
शेतामध्ये पूर्वी जी कामे करण्यासाठी बैलांचा उपयोग होत होता त्यापैकी आता बहुतांश कामे ट्रॅक्टर किंवा आधुनिक यंत्राचा वापर करून केली जातात. त्यामुळे बैलांचे महत्त्व दिवसेंदिवस कमी होत असल्याचे प्रकर्षाने दिसते. बैलांची संख्या कमी झाल्यामुळे अडचणी भासतात. परंतु आजही ग्रामीण भागात परंपरा म्हणून पोळा सण उत्साहात साजरा करण्यात येतो.

रविवार कारंजावर गर्दी
शहरातील रविवार कारंजा येथे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात छोट्या-मोठ्या विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. त्यात नारळ, मातीचे आकर्षक बैल, पूजेसाठीचे बैल, मातीचा घोडा, पूजेचे साहित्य अशा वस्तूंचा समावेश आहे. पोळ्यासाठी शहरातील नागरिकांनी पूजेसाठी मातीचे बैल व इतर साहित्य घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे रविवार कारंजा परिसर फुलून गेला होता.

मागील वर्षीच्या पोळ्याला साहित्याचे जे भाव होते तेच यंदा कायम आहेत. तसेच साहित्याला पाहिजे तशी माग्णीही नाही.
– विकास शिंदे, विक्रेते, म्हसरूळ

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!