Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या विधानसभा निवडणूक २०१९

बागलाण मतदारसंघ – विधानसभा निवडणूक २०१९ : आजी-माजी आमदारांमध्ये चुरशीचा सामना

Share

सटाणा । शशिकांत कापडणीस

तालुक्यात रस्ते, आरोग्य, सिंचन आदी प्रश्‍नांना गती दिल्याचा दावा विद्यमान आमदार चव्हाण यांच्याकडून करण्यात येत असला तरी सटाणा शहराबाहेरून जाणारा बायपास रस्ता, पिण्याचे पाणी आदी प्रश्‍नांबाबत अपेक्षित यश प्राप्त होऊ शकलेले नाही. तालुक्याचा विकास आ. चव्हाण यांच्यामुळे खुंटल्याचा आरोप भाजपतर्फे केला जात आहे. बायपास रस्त्यासह सटाणा शहर पाणी योजना, कृषी प्रक्रिया उद्योग, औद्योगिक वसाहतीच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची ग्वाही माजी आमदार बोरसे प्रचार सभांच्या माध्यमातून देत आहेत. चव्हाण-बोरसे यांच्यातर्फे प्रचार सभा व बैठकांमधून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असल्याने राजकीय वातावरण तप्त झाले आहे.

बागलाण विधानसभा मतदारसंघात पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले आ. दीपिका चव्हाण व माजी आमदार दिलीप बोरसे यांच्यात तुल्यबळ लढत होत आहे. भाजपकडून इच्छुक असलेल्या परंतु उमेदवारी पदरात न पडलेले राकेश घोडे बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. बागलाणचा गड कायम राखण्यासाठी आ. चव्हाण प्रयत्नांची शिकस्त करीत असताना या गडावर पुन्हा झेंडा फडकवण्यासाठी भाजप-सेना युतीचे माजी आमदार बोरसे यांनी झंझावात निर्माण केला आहे. दोघांच्या लढतीत अपक्ष घोडे यांनीदेखील विजयाचा दावा केला असल्याने निवडणूक चुरसपूर्ण बनली आहे.

गत दोन दशकांपासून राष्ट्रवादीचे संजय चव्हाण व दीपिका चव्हाण तसेच भाजपचे उमाजी बोरसे व दिलीप बोरसे यांच्याभोवतीच फिरणार्‍या बागलाण विधानसभा निवडणुकीचे चित्र सद्यस्थितीत बदलण्याचा काही प्रमाणात प्रयत्न झाला. माजी मंत्री स्व. ए. टी. पवार यांच्या कन्या गीतांजली पवार यांनी भाजपकडून उमेदवारी मिळण्याच्या अपेक्षेने तालुक्यात मोर्चेबांधणी केली होती. परंतु अखेरच्या टप्प्यात भाजपने पवार कुटुंबातील राजकीय समीकरणांच्या माध्यमातून गीतांजली पवारांना निवडणुकीतून माघार घेण्यास भाग पाडले.

केंद्र व राज्यात भाजपप्रणीत लाटेत सामील होण्याच्या भूमिकेतून मध्यंतरी चव्हाण दाम्पत्यांनीही भाजप किंवा शिवसेनेत दाखल होण्यासाठी चाचपणी केली होती. चव्हाणांची शिवसेना प्रवेशाची तयारीही झाली होती. मात्र बागलाणची जागा भाजपला जाहीर झाल्याने पुन्हा एकदा चव्हाणांनी सावध भूमिका घेत राष्ट्रवादीतच आपले स्थान निश्‍चित केले.

लोकसभा निवडणुकीत दुसर्‍यांदा डॉ. सुभाष भामरे यांना खासदार करण्यात बागलाणमधून प्राप्त झालेल्या मताधिक्क्याचा प्रभाव आहे. लोकसभा निवडणुकीत विधानसभेची रंगीत तालीम म्हणूनच माजी आमदार बोरसे यांचीदेखील भूमिका निर्णायक ठरली होती. आता विधानसभा निवडणुकीत चव्हाण-बोरसे हे प्रस्थापित उमेदवार पुन्हा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यामुळे कोण बाजी मारतो याची उत्सुकता जनतेत निर्माण झाली आहे.

गत पाच वर्षांत प्रामुख्याने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ताकद कमी झालेल्या राष्ट्रवादीला नुकतीच शरद पवार यांच्यावर करण्यात आलेल्या ईडीच्या कारवाईनंतर काही प्रमाणात निर्माण झालेली सहानुभूती, केंद्र शासनाच्या कांदा निर्यातबंदी निर्णयामुळे शेतकर्‍यांमधील असंतोष आदी मुद्यांनी बळ मिळाल्याचे चित्र आहे. दुसरीकडे भाजपमध्ये खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी जोपासलेला बागलाण तालुक्यातील जनसंपर्क ही जमेची बाजू आहे.

त्यात प्रामुख्याने सिंचनाचा प्रश्‍न सोडवण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न हा प्रचाराचा प्रमुख मुद्दा बनला आहे. गेल्या २५ वर्षांपासून पाणीटंचाईचा सामना करणार्‍या शहरवासियांचा कौलदेखील महत्त्वाचा मानला जात आहे. शहरातील उमेदवाराच्या पाठीमागे नागरिक उभे राहतील की, लाटेत स्वार होतील हे पाहणे रंजक ठरेल. मतदारसंघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली असून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचार सभातून जनमत मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. राकेश घोडे या नव्या चेहर्‍याने निवडणूक रिंगणात उडी घेतल्याने अधिक चुरस निर्माण झाली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!