Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

लखमापूर : आई नव्या ट्रॅक्टरचे पेढे आणायला गेली; आठ वर्षांच्या चिमुरडयाचा त्याच ट्रॅक्टरखाली येऊन दुर्दैवी मृत्यू

Share

सटाणा | प्रतिनिधी 

नुकत्याच नवीन घेतलेल्या ट्रॅक्टरवरून कुटुंबियांसह मोठ्या उत्साहाने शेतात जात असतांना गतीरोधकाचा अंदाज न आल्याने ट्रॅक्टर उधळून आठ वर्षांचा एकुलत्या एक चिमुरड्याचा ट्रॅक्टरखाली आल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. बागलाण तालुक्यातील लखमापूर येथे ही घटना घडली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, महालपाटणे (ता.देवळा) येथील रहिवाशी व विधायक कार्य समिती संस्थेचे कर्मचारी विश्वनाथ खरोले यांनी सटाणा येथून काल(दि.२१) ट्रॅक्टर विकत घेतला.

ट्रॅक्टर घेतल्याचा आनंद म्हणून खरोले हे आपल्या पत्नी व दोन्ही मुलांना ट्रॅक्टरवर  बसवून आपल्या मूळगावी महालपाटणे येथे जात होते.

लखमापूर येथे खरोले यांनी पेढे घेण्यासाठी आपल्या पत्नीला एका हॉटेलवर पाठवून रहदारीला अडथळा नको म्हणून ट्रॅक्टर निंबोळा रस्त्याकडे उभे करण्यासाठी घेवून जात असतांनाच लखमापूर-निंबोळा चौफुलीवरील गतिरोधकावर ट्रॅक्टर उधळल्याने खरोले यांचा मुलगा आयुष (इयत्ता २ री मनीबाई अग्रवाल प्राथमिक शाळा,सटाणा) तोल गेल्याने तो ट्रॅक्टरवरून कोसळून खाली पडला.

काही समजण्याच्या आत आयुषवर ट्रॅक्टरचे मोठे चाक चालून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.  खरोले कुटुंबियांच्या आनंदावर क्षणार्धात विरजन पडून होत्याचे नव्हते झाले.

मोठ्या उत्साहाने नवीन ट्रॅक्टरचे पेढे घेवून आलेल्या आयुषच्या आईला आपल्या मुलाचा मृतदेह पाहण्याची दुर्दैवी वेळ आल्याने आई – वडील आणि आयुषच्या बहिणीने फोडलेला हंबरडा घटनास्थळी उपस्थित असलेल्या सर्वांनाच चटका लावून गेला.

दरम्यान घटनास्थळी उपस्थित असलेले सामाजिक कार्यकर्ते शाम बागडणे, माजी नगरसेवक छोटू सोनवणे यांनी मयत आयुषचा मृतदेह सटाणा ग्रामीण रुग्णालयात आणला. श्रीराज पाटील यांनी रुग्णवाहिका उपलब्ध करून देत आयुषचा मृतदेह मूळगावी महालपाटणे येथे रवाना करून आयुषला अखेरचा निरोप देण्यात आला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!